>> सुनील कुवरे
चातुर्मासात श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. पुराणात एक आख्यायिका आहे की, किडदेव निद्राधीन असतात. म्हणजेच देवयानी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. याच काळात हिंदू धर्मात व्रतवैकल्ये, उपवास, व्रत करून देवाची कृपा आपल्यावर असावी असे प्रयत्न करतात. या चातुर्मासात श्रावण महिना येतो. श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र महिना मानले जाते. श्रावण महिना सगळ्या सृष्टीचे सौंदर्य ओंजळीत घेऊन येतो. अशा श्रावणातल्या निसर्गाने ओंजळीत न मावेल इतके दिल्यावर ते उत्साहाने इतरांशी वाटून घ्यावे, हा संदेश देण्यासाठीच श्रावणातील सण आणि व्रतवैकल्ये साजरी केली जातात.
या श्रावण महिन्यात फळाफुलांना बहर येतो. शेतकरी आपल्या शेतीची कामे करून पीक घेत असतो. श्रावण महिन्यात येणाऱ्या सण, व्रतवैकल्यानी भरलेल्या या महिन्यात प्रत्येक वाराला महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावणी सोमवार, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, जन्माष्टमी, जिवंतिकाचे पूजन, पिठोरी गौर असे हिंदू संस्कृतीचे दर्शन सण-उत्सव आपल्याला खूप काही गोष्टी देऊन जातात. म्हणून श्रावण महिन्याला ‘सणांचा राजा’ असे म्हटले जाते. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, म्हणूनच या महिन्याला श्रावण महिना या नावाने ओळखले जाते.
श्रावण अधिक जवळचा वाटतो तो माहेरवाशिणीला, माहेरवाशिणींसाठी आनंदाची पर्वणी असतो. स्त्रिया उपवास, व्रत, उपासना, नामस्मरण करतात. धार्मिक पथ्ये पाळतात. व्रतवैकल्ये, मंगलमय वातावरण यांचा मेळ साधणाऱ्या श्रावणात शिवपूजेला अंत्यत महत्त्व आहे. पहिल्या श्रावणी सोमवारपासून सोळा सोमवार केले जातात. श्रावणात 108 बेलाची पाने शिवपिंडीवर वाहिली जातात. 108 पाने न मिळाल्यास 7,9,11 अशी बेलाची पाने वाहतात. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिली जाते. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्याला तीळ, तिसऱ्याला मूग, चौथ्याला जवस, पाचवा आला तर सातू असे वाहिले जाते. यंदा श्रावणाला 5 ऑगस्ट सोमवारी सुरुवात होऊन 2 सप्टेंबर सोमवारी सांगता होत आहे. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा हा दुर्मिळ योग 71 वर्षांनंतर आला आहे. हे अंत्यत शुभ मानले जाते. तसेच यंदा पाच सोमवार आले आहेत.
श्रावणातील मधुमंगल सोहळा म्हणजे मंगळागौर व्रत. मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते. बुधवारी बुध पूजन, गुरुवारी नारायण व्रत, शुक्रवारी जिवंतिका पूजनाचे व्रत करून स्त्रिया सात देवतांच्या प्रतिमांचे पूजन करतात. जिवंतिका पूजानामुळे घरात आरोग्य, धन-सुख लाभते असे म्हटले जाते. शनिवारी मारुती पूजन, तर रविवारी आदित्य पूजन. आदित्य पूजनाला खास महत्त्व आहे. श्रावणात आयतवार पूजन ही परंपरागत चालत आलेली एक प्रथा आहे.
श्रावणातील सात वारांना जसे महत्त्व आहे तसे सणांनासुद्धा आहे. नागपंचमी श्रावणातला पहिला सण. नागपंचमीला मातीच्या नागाची किंवा नागाच्या चित्राची पूजा केली जाते. सीतला सप्तमीला स्त्रिया स्वयंपाकघरातील चुलीची पूजा करतात. धार्मिक ग्रंथाचे वाचन केले जाते. यानंतर येणारा सण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. प्राचीन काळी प्रजानन या दिवशी राजाच्या घरी जाऊन स्त्रिया राखी त्याच्या हातात बांधत असत. म्हणजे आमचे रक्षण कर असा भावार्थ आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते. जैन बांधव हा दिवस रक्षा पर्व म्हणून पाळतात. रक्षाबंधन भाऊ-बहीण यांच्या नात्यातील प्रेम, नैतिक मूल्ये जपणारा सण आहे. याच दिवशी कोळी बांधव सागराला श्रीफळ अर्पण करतात आणि सागराला प्रसन्न करून कृपादृष्टीसाठी विनवणी करतात. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी येते. संपूर्ण भारतात या सणाला अनन्य महत्त्व आहे. मथुरा, द्वारका या ठिकाणी या उत्सवाचा थाट असतो. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीकाला साजरा केला जातो. शेवटी श्रावणी अमावस्या म्हणजे बैलपोळा. बारामास ज्याच्या जिवावर शेतकरी शेत करतो त्या बैलाची पूजा करतो. आगरी लोकांमध्ये ‘पिठोरी गौरी’ साजरी केली जाते. हा दिवस मातृदिनसुद्धा पाळला जातो.
मेंदी आणि श्रावणातील अनेक सण यांचा घनिष्ठ संबंध आहे. श्रावणात धुंद निसर्गाच्या सान्निध्यात जोडीला मेंदीचा सुवास दरवळायला लागतो. मेंदी काढण्याला प्रत्येक संस्कृतीत एक वेगळा अर्थ आहे. मेंदी ही सौंदर्य खुलविते. असा हा श्रावणमास निसर्ग आणि मानवी मनावर अधिराज्य करणारा महान मास आहे.