निमित्त – संघर्ष आत्मकथेचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम, [email protected]

प्रसिद्ध चित्रकार आणि लेखक राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मचरित्राला यंदाचा प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. गावगाडय़ातील कष्टकरी माणसांचे चित्रण करीत आयुष्यातील संघर्ष अतिशय समंजस दृष्टिकोनातून मांडणाऱ्या लेखनाचा हा गौरव आहे.

मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची आणि महत्त्वपूर्ण घटना म्हणजे राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथनाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. या सन्मानामुळे मराठीतील वास्तववादी, प्रामाणिक आणि सामाजिक भान असलेल्या लेखनाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

‘काळ्यानिळ्या रेषा’ हे आत्मकथन केवळ वैयक्तिक अनुभवांचे कथन नसून समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांच्या आयुष्याचा जिवंत दस्तऐवज आहे. लेखकाने आपल्या बालपणापासूनच्या संघर्षमय प्रवासाचे चित्रण करताना सामाजिक विषमता, आर्थिक अडचणी, अपमान आणि मानवी संवेदनांचा वेध घेतला आहे. या सगळ्या अनुभवांना त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता थेट आणि प्रामाणिकपणे मांडले आहे. या आत्मकथेत गावकुसा बाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि वास्तवाशी भिडणे व झगडणे हे फार समंजसपणे, संयतपणे व प्रभावीपणे लेखक मांडतो.

पुण्यातील राजहंस प्रकाशनाने राजूचे आत्मकथन प्रकाशित केले आहे. याआधी त्यांनीच प्रकाशित केलेली चार पुस्तके साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेली आहेत. याबाबतीत राजहंसनेही आनंद, समाधान व्यक्त केले आहेच.

 पुस्तकाचे लेखक मनस्वी चित्रकारही आहेत. गावकुसाबाहेरची ही व्यथा, वेदना चित्रातून ठळकपणे येत राहते. लेखक जेव्हा काही सांगू पाहतो आणि सोबत चित्रांचीही भाषा असते, तेव्हा  या आत्मकथनास वेगळे मूल्य प्राप्त होतेच. या पुरस्काराने खान्देशाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. बाविस्कर जळगावातील पी.एम.मुंदडा शाळेतून चित्रकला शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्यातील चित्रकाराने लेखकास चांगली सोबत केली आहे. गावकुसाबाहेरची माणसं आत्मकथनात आणताना कधी बॅन्डवाला येऊन जातो, तर कधी टोपल्या विणणारा लेखनाचा नायक राजू येतो. हा युवा असताना आयुष्याशी दोन हात करीत असतो, अर्थात सोबतीला संघर्ष कायम असतोच. लेखनाची भाषा विलक्षण प्रत्ययकारी असून यातील जगणं, उपेक्षा, अवहेलना काळीज पिळवटून टाकते. या आत्मकथनाची सर्वात मोठी ताकद म्हणजे साधी, ओघवती आणि भिडणारी भाषा तर आहेच, एवढेच नाही तर वाचकाला कृत्रिमतेचा लवलेशही जाणवत नाही. उलट प्रत्येक प्रसंग वाचताना तो त्या वास्तवात शिरतो आणि त्या वेदना, संघर्ष आणि आशा अनुभवतो. लेखकाचा आवाज कुठेही आक्रोश करत नाही, पण शांतपणे मनाला भिडतो. हीच या आत्मकथनाची वैशिष्टय़पूर्ण ताकद आहे. ‘काळ्या’ आणि ‘निळ्या’ रेषा ही या पुस्तकातील मध्यवर्ती प्रतीके आहेत. या रेषा म्हणजे आयुष्यावर उमटलेल्या जखमा, वेदना आणि अन्यायाचे ठसे. त्या केवळ वैयक्तिक नाहीत, तर व्यापक सामाजिक वास्तवाचे प्रतिनिधित्व करतात.

मराठी साहित्यात आत्मकथनाची समृद्ध परंपरा आहे. किती म्हणून नावे सांगावीत. ‘उपराकार’ लक्ष्मण माने, ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड, ‘बलूतकार’ दया पवार, ‘आठवणींचे पक्षीकार’ प्राचार्य प्र. ई. सोनकांबळे, ‘अक्करमाशी’कार शरणकुमार लिंबाळे. ‘काळ्या निळ्या रेषा’ हे आत्मकथन आपल्या वेगळ्या आशय, मांडणी आणि प्रामाणिकतेमुळे विशेष ठरते. आत्मभान आणि आत्मशोध याचा नेमकी अर्थ संगती लाऊन संयतपणे विद्रोह मांडतानाच आत्मचिंतन करणारे सत्य आत्मकथन म्हणजेच ‘काळ्या निळ्या रेषा’ होय.

या सन्मानामुळे केवळ राजू बाविस्कर यांचा गौरव झाला नाही, तर समाजातील वास्तवाला भिडणाऱ्या साहित्य प्रवाहालाही नवी ऊर्जा मिळाली आहे. हे आत्मकथन म्हणजे उपेक्षित वंचित आयुष्याचा जिवंत दस्तऐवज आहे, असे म्हणावे लागेल.

 ‘काळ्या निळ्या रेषा’ हे आत्मकथन म्हणजे दुर्लक्षित समूहाच्या वेदनेचा आक्रोश आहे. त्यातून दुर्लक्षित समूहाचे कष्टमय जगणं आपण मांडले आहे आणि त्याचीच साहित्य अकादमी पुरस्काराने दखल घेतली आहे, ही आपल्यासाठी आनंदाची बाब होय. पुस्तकांना आजपर्यंत अनेक पुरस्कार लाभले, पण साहित्य अकादमी पुरस्काराचा आनंद शब्दांत वर्णन करता येणार नाही.

– राजू बाविस्कर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक