पैठणी आणि फुटबॉल

>> शिरीष कणेकर

सकाळी सकाळी पार्वतीकाकू (‘पैठणी’फेम) फतकल मारून जमिनीवर बसल्या तेव्हाच शंकररावांनी ताडलं की, आज पैठणी दर्शनाचा योग दिसतोय. त्यानुसार पार्वतीकाकूंनी पलंगाखालून पत्र्याची टंक बाहेर ओढली. तिची गंजलेली कडी काढून त्यांनी हलक्या हातानं पैठणी बाहेर काढली. आता पैठणी डोळे भरून न्याहाळता न्याहाळता जावेचा व नणंदेचा उद्धार करायचा हा रिवाज होता. पूर्वी मुलूखमैदान तोफ (म्हणजे पार्वतीकाकू) प्रामुख्याने सासूबाईंवर गोळे डागत. मरून त्या यातून सुटल्या याचा पार्वतीकाकूंना राग यायचा. आपल्या पाठीवर पार्वतीकाकू आपल्यालाही लाखोली वाहत असणार असा शंकररावांना दाट संशय होता. शेजारच्या बन्याबापूंना पार्वतीकाकूंवर नजर ठेवायला सांगावं असाही विचार त्यांच्या मनात डोकावून गेला. दुसऱयाच क्षणी तो विचार त्यांनी सोडून दिला. बन्याबापूंना पार्वतीकाकूंवर नजर ठेवायला सांगणं म्हणजे चोराच्या हातात जामदारखान्याच्या चाव्या देण्यासारखं होतं. बन्याबापूंना काय, निमित्तच हवं होतं…

‘‘वर्ल्ड कप फुटबॉल फ्रान्सनं जिंकला तर मी माझी पैठणी नेसेन असा मी मनाशी पण केला होता’’ पार्वतीकाकू स्वप्नाळू नजरेनं पैठणीकडे पाहत व तिच्यावरून हळुवार नजरेनं हात फिरवीत म्हणाल्या. फायनलमध्ये क्रोएशियाविरुद्ध गोल मारल्यावर फ्रान्सच्या एम्बापेनं फुटबॉलवरून असाच हात फिरवताना पार्वतीकाकूंनी स्वतःच्या डोळय़ांनी टीव्हीवर पाहिलं होतं.

‘‘काय?’’ शंकरराव कोर्टाचा बेलिफ पुकारतो तसे ओरडले. खालच्या कोर्टात आयुष्यभर कारकुनी केल्यावर शंकरराव स्वतःला बॅरिस्टर समजायला लागले होते, ‘‘काय? तुला फुटबॉलमध्ये गती केव्हापासून निर्माण झाली?’’

‘‘पहिल्यापासून. तुम्ही मला बघायला आलात तेव्हा तुम्ही ‘मोहन बगान’कडून फुटबॉल खेळता असं मला सांगण्यात आलं होतं. लग्न झाल्यावर मला कळलं की, तुम्ही कोर्टात कारकुनी करता. माझी सपशेल फसवणूक झाली. मी तुमच्याच कोर्टात तुमच्याविरुद्ध केस करणार होते. मग म्हटलं जाऊ दे, पदरी पडलं आणि पवित्र झालं. माझ्या नशिबात फुटबॉलवाला नाही तर तपकीरवाला होता.’’

पार्वतीकाकूंची कैफियत ऐकून शंकरराव अवाक झाले. इतके की, तपकिरीचा बार भरायलाही ते विसरले. असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं.

‘‘…अन् क्रोएशिया जिंकला असता तर?’’ शंकररावांनी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.

‘‘तरीही पैठणी नेसलेच असते’’ पार्वतीकाकू तोंडभर हसून म्हणाल्या, ‘‘क्रोएशियाच्या आयव्हान पेरिसिकनं डाव्या पायानं मारलेल्या किकवर केलेला गोल पाहताना माझ्या चष्म्यावर आनंदाचा गहिवर जमा झाला होता. याला आनंदाश्रू म्हणतात. आपली अंजू लग्न करून लंडनला गेली तेव्हा विमानतळावर माझ्या डोळ्यात असेच आनंदाश्रू तरळले होते. तुमचं कुठं लक्ष असतं म्हणा? तुम्ही आणि तुमची तपकीर. अंजू अगदी चंद्रावर गेली असती तरी तुम्ही तपकिरीचा बार भरण्यात दंग असता. नरेंद्रजी मोदी व राहुलजी गांधी एका ताटात जेवायला बसले तरी तिकडे ढुंकून न पाहता तुम्ही तपकीर ओढत बसला असतात. जळली मेली ती तपकीर! तुमचं तपकिरीशी लग्न झालंय हे मला आधीच कळलं असतं तर द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याबद्दल बन्याबापूंच्या मदतीनं मी तुम्हाला फरफटत कोर्टात खेचलं असतं. तुम्ही कारकुनी करायचात त्याच कोर्टात. मी म्हणते, नाक आहे की केराची टोपली?’’

पार्वतीकाकू त्यांच्या आवडत्या विषयाकडे वळल्यावर शंकरराव पुढील भडीमार टाळण्यासाठी घाईघाईने म्हणाले, ‘‘तू वर्ल्डकप फायनल बघण्यासाठी मुकेशला ‘कंपनी’ का नाही दिलीस?’’

‘‘कुठली कंपनी? तुमची कंपनी म्हणजे तपकीर.’’ पार्वतीकाकू तडकून म्हणाल्या, ‘‘…अन् कोण हा मुकेश?’’

पार्वतीकाकूंच्या मनात आलं की, बन्याबापूंचं नाव मुकेश तर नसेल? कधी गाताना ऐकलं नाही.

‘‘मुकेश अंबानी गं, नीताचा घो. आपण आपल्या वाण्याच्या ओळखीनं मुकेशला गाठू शकलो असतो. अमिताभ बच्चन नाही का, मुकेशबरोबर गेला होता?’’

‘‘अमिताभचा सर्व खर्च मुकेशनं केला असेल का?’’ पार्वतीकाकूंनी कुतुहलानं विचारलं, ‘‘आपला वाणी आपलं टिटवाळ्याचं तिकीटही काढणार नाही.’’

‘‘हो, पण अमिताभचा खर्च कोणी केला हे आपल्या वाण्याला माहीत असणार. आलिया भटचं काय चाललंय हे श्रद्धा कपूरला माहीत असतंच. तसेच बिझिनेसवाले एकमेकांची खबर ठेवून असतात.’’

‘‘तरी मी अंजूला सांगत होते की, नवरा मॉस्कोतला बघ. पुतिनच्या नात्यातला कोणीतरी मिळाला असता. मग ती मुकेश व अमिताभसह फायनलला बसलेली टीव्हीवर दिसली असती. चाळीतल्या ढमाल्या बायकांच्या अंगाची नुसती लाही लाही झाली असती. शिवाय अंजू मॉस्कोत रशियन सॅलॅडही शिकली असती.’’

‘‘उद्या हिंदुस्थाननं वर्ल्डकप फुटबॉल जिंकला तर तू काय करशील?’’

‘‘उद्या?’’

‘‘उद्या म्हणजे आणखी शंभर-दोनशे वर्षांनी. आधी ‘क्वालिफाय’ तर होऊ द्या.’’

‘‘पैठणी माझा जीव की प्राण आहे’’ पार्वतीकाकू म्हणाल्या, ‘‘पण आपला संघ जिंकल्याच्या आनंदात मी ती बोहारणीला देऊन टाकीन.’’

‘‘…आणि मी माझी तपकिरीची डबी खिडकीतून फेकून देईन’’ शंकरराव निर्वाणीचं बोलले

आपली प्रतिक्रिया द्या