
>> योगेंद्र ठाकूर
संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात जे पत्रकार लढले त्या लढय़ात पत्रकार आचार्य अत्रे हे अग्रस्थानी होते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा मराठी माणसाच्या भाषेचा, अस्मितेचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा लढा होता. अशा या लढय़ात आपल्या सर्व ताकदीनिशी आचार्य अत्रे पत्रकार म्हणून उतरले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात आचार्य अत्रे यांची लेखणी आणि वाणी समर्पित झाली होती. लोकमान्य टिळक, शि. म. परांजपे आदींची पत्रकारिता स्वराज्यासाठी होती. परकियांविरुद्ध होती तर आचार्य अत्रे यांचा लढा स्वतंत्र हिंदुस्थानात स्वकियांनीच महाराष्ट्रावर केलेल्या अन्यायाविरुद्धचा होता.
‘वृत्तपत्र हा जरी धंदा असला तरी पत्रकारांची वृत्ती हा मात्र एक महान धर्म आहे. धंद्याला स्वरूप द्यावे, पण धर्माचा धंदा करू नये. जनता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती व्हावी म्हणून पत्रकारांच्या लेखणीतून क्रांतिरसाच्या चिळकांडय़ा उडण्यात आणि वृत्तपत्रे ही क्रांतिरसाची कारंजी व्हावीत. जनता क्रांतीचा जयजयकार करणे हाच खरा पत्रकाराचा धर्म आहे,’ असे आचार्य अत्रेंनी एका ठिकाणी म्हटले आहे आणि पत्रकाराचा धर्म आचार्य अत्रे यांनी साप्ताहिक ‘नवयुग’ आणि ‘मराठा’मधून शेवटपर्यंत पाळला आणि त्याकाळी खऱया अर्थाने मराठी पत्रकारितेला एका उच्चस्थानावर नेऊन बसवले.
आचार्य अत्रे यांच्या लेखणीला स्वा. वि. दा. सावरकरांनी ‘मुलुख मैदानी तोफ’ म्हटले तर राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी ‘हि वॉज ए रायटर ऍण्ड फायटर ऑफ महाराष्ट्र’ असा आचार्य अत्रेंचा गौरव केला होता. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी आचार्य अत्रे यांच्याविषयी एकेठिकाणी लिहिले आहे की, ‘मिडासच्या स्पर्शाने दगडाचे सोने होते असे म्हणतात. एखाद्या विषयावर अत्र्यांनी काही लिहिले आणि ती गोळी लागली नाही असे अजून झाले नाही.’ आचार्य अत्रे यांच्या 29 वर्षांच्या पत्रकारितेत याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे.
आचार्य अत्रे यांनी 1940 साली ‘साप्ताहिक नवयुग’ सुरू केले ते त्यांनी शेवटपर्यंत म्हणजे 1962 सालापर्यंत चालवले. या 22 वर्षांच्या कालखंडात त्यांनी अनेक विषयांवर रोखठोक लिखाण केले. हा कालखंड स्वातंत्र्य लढय़ाचा आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचा होता. या कालखंडात आचार्य अत्रेंनी आपल्या धारदार लेखणीने विरोधकांना नामोहरम केले. संयुक्त महाराष्ट्र लढय़ात काँग्रेसवर, मोरारजी देसाई यांच्यावर शाब्दिक प्रहार केले. लढय़ास गती देण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी मराठी जनतेस चेतवले आणि एकत्रितपणे लढा दिला. त्यावेळी त्यांची लेखणी एखाद्या तलवारीप्रमाणे तळपत होती. ‘नवयुग’ सुरू करून साप्ताहिकांच्या क्षेत्रात एक नवे दालन उघडले. काँग्रेसचा प्रचार करणारे ‘नवयुग’ पुढे देशाच्या फाळणीनंतर काँग्रेसचे कट्टर विरोधक बनले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळात तर ‘नवयुग’मधून आंदोलनाचा जोरदार प्रचार केला.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात जे पत्रकार लढले त्या लढय़ात पत्रकार आचार्य अत्रे हे अग्रस्थानी होते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा मराठी माणसाच्या भाषेचा, अस्मितेचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा लढा होता. अशा या लढय़ात आपल्या सर्व ताकदीनिशी आचार्य अत्रे पत्रकार म्हणून उतरले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात आचार्य अत्रे यांची लेखणी आणि वाणी समर्पित झाली होती. लोकमान्य टिळक, शि. म. परांजपे आदींची पत्रकारिता स्वराज्यासाठी होती. परकीयांविरुद्ध होती तर आचार्य अत्रे यांचा लढा स्वतंत्र हिंदुस्थानात स्वकीयांनीच महाराष्ट्रावर केलेल्या अन्यायाविरुद्धचा होता.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा एस.एम.जोशी, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, अप्पा पेंडसे, सेनापती बापट आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवला गेला. ही सगळी मंडळी लढाऊ बाण्याची, मराठी भाषाभिमानी होती. या नेतृत्वाच्या मागे जनशक्ती उभे करण्याचे काम आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’तील पत्रकारितेने केले.
आचार्य अत्रे यांनी लिखाणात भाषेचा सूर एकच ठेवला नाही तर प्रसंगानुरूपे भाषेचा बाज बदलत गेला. त्यांच्या बातम्या आणि अग्रलेखांचे मथळे वाचले की जाणवते मराठातील ‘द्विभाषिकाचा रेडा दूध देईल का? हाय मोरारजी!, खुन्या मोरारजीचे खोटे उपोषण, नेहरूनंतर कोण? सदोबा कान्होबा पाटील यांचा राजीनामा’ असे काही मथळे साक्ष देतात.
स. का. पाटील गिरगाव चौपाटीच्या सभेत म्हणाले की, मुंबई महाराष्ट्राला यावच्चंद्रदिवाकरौ मिळणार नाही. त्यावर आचार्य अत्रे यांनी अग्रलेखातून चांगलाच समाचार घेतला. त्या अग्रलेखात लिहिले, ‘सदोबा म्हणतात की, चंद्र-सूर्य आकाशात असेपर्यंत संयुक्त महाराष्ट्र मिळणार नाही. चंद्र-सूर्य काय सदोबाच्या बापाचे नोकर आहेत का? स. का. पाटीलांना जागा दाखवली. 1962 साली चीनने देशावर आक्रमण केले आणि त्या आक्रमणापुढे देशाची नामुष्कीची माघार सुरू झाली. तेव्हा पंतप्रधान नेहरू यांनी यशवंतराव चव्हाणांना देशाचे संरक्षण स्वीकारण्यास बोलावले, तेव्हा ‘हिमालयाच्या मदतीस सह्याद्री धावला’ असा लेखाचा मथळा देऊन यशवंतराव चव्हाणांचा गौरव केला. त्यांचा रोष व्यक्तीविरुद्ध नव्हे तर वृत्तीवर होता.
संयुक्त महाराष्ट्र लढय़ादरम्यान अत्रेंच्या सा. नवयुगमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांतजी ठाकरे यांची व्यंगचित्रे लक्षणीय असत. ते महाराष्ट्र द्वेष्टय़ांचा समाचार व्यंगचित्रांतून घ्यायचे. त्यांच्या कुंचल्यांचे फटकारे तत्कालीन राजकारण्यांना बसले होते. आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध चांगले होते. एकदा अत्रे-ठाकरे वाद गाजला होता, तरी राजकीय शत्रुत्व बाजूला ठेवून अत्रेंच्या निधनानंतर 22 जून 1969 च्या सा. मार्मिकमध्ये ‘असा पुरुष होणे नाही’ हा लेख लिहून बाळासाहेबांनी आचार्य अत्रेंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ वर्णन केलं होतं आणि माणुसकीचं दर्शन साऱया जगाला घडवलं होतं.
आचार्य अत्रे यांना पत्रकारितेत दिल्लीश्वरांशीच झुंज द्यावी लागत होती, असे नव्हे तर द्विभाषिक राज्याची तळी उचलून धरणारे, मराठी मनात बुद्धिभेद करणाऱया भांडवलदारी पत्रकारितेविरुद्धही लढावे लागले. आचार्य अत्रेंची लेखणी कधी तलवार बनली तर कधी गदा बनली. राजकारणात जे जे नाठाळ भेटले त्यांच्यावर अत्रेंनी लेखणीचा बडगा उगारला आणि त्यांना वठणीवर आणले. अत्रेंनी लोकभाषेच्या प्रतिष्ठsचा, लोककल्याणाचा लढा लेखणीच्या ताकदीवर लढवून देदीप्यमान यश संपादित केले आणि पत्रकारितेत अन्यायाविरुद्ध लढण्याचा मार्ग दाखवला. आचार्य अत्रेंनी साहित्यिक, नाटककार, संपादक, चित्रपट संवाद-लेखक, निर्माते, वत्तृत्व आदी क्षेत्रांवर आपला आगळावेगळा ठसा उमटवला असला तरी संयुक्त महाराष्ट्र लढय़ासाठी पत्रकार म्हणून दिलेल्या योगदानाला महाराष्ट्राच्या इतिहासात तोड नाही.























































