लोकधन – चिपटे, मापटे, आदुली…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृषिजन संस्कृतीमध्ये शेती, माती, शिवार, गाईगुरं यांना महत्त्व असते. नव्हे नव्हे, तोच त्यांचा प्राण असतो. अशा या खेडय़ातली लोकभाषाही तशीच रांगडी असते. तिथे विनिमयासाठी वस्तूंची देवाणघेवाण असते. शहरी मापे तिथे नसतात, तर स्वतःची साधने असतात. त्यामुळे दैनंदिन संभाषणात बोलीभाषेमध्ये बोलताना लोकमापनांच्या संबंधित शब्दप्रयोग करत असतात. त्यामुळे ती बोली समृद्ध होते.

 कृषिजन संस्कृतीमध्ये शेती, माती, शिवार, गाईगुरं यांना महत्त्व असते. नव्हे नव्हे, तोच त्यांचा प्राण असतो. शेती करणे म्हणजे खेडणे. खेडणारे जिथे राहतात ते खेडे.

अशा या खेडय़ात राहणाऱया, शेती करणाऱया शेतकऱयाच्या घरी जित्राबं (जनावरं ) असणारच. त्यात शेळ्या, मेंढय़ा, गाई, म्हशी, बैलापासून कोंबडय़ा, मांजर, कुत्रे असणारच. घरात डोकावलं तर चूल, वैल, दुरडी, उतरंड, गाडगे – मडके, धान्य साठवायची (शेणाने सारवलेली) कणगी असतेच. कोंबडय़ा डालायला डालगं, तण काढायला खुरपं किंवा विळा असतो. शेतीची अनेक अवजारं असतात. उदा. तिफन / कुळव /कोळपं /नांगर / चाडं/ टिकाव / फावडं / घमेले इ.

मग अशा या खेडय़ातली लोकभाषाही तशीच रांगडी असते. तिथे विनिमयासाठी वस्तूंची देवाणघेवाण असते. शहरी मापे तिथे नसतात, तर स्वतःची साधने असतात. त्यामुळे दैनंदिन संभाषणात बोलीभाषेमध्ये बोलताना लोकमापनांच्या संबंधित शब्दप्रयोग करत असतात. त्यामुळे ती बोली समृद्ध होते. उदा.

फुटकी कवडी, मणभर लाकूड, गुंजभर सोनं, पसाभर धान्य,

काकणभर सरस, कासराभर सूर्य, चार पखाली पाणी, बोटभर चिंधी, डेचकीभर ताक इ., तर उदाहरण देण्यासाठी किंवा म्हणणे पटवून देण्यासाठी वजनमापासंदर्भात काही म्हणीही वापरतात. उदा. कणभर करणं मणभर सांगणं, चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला, शेरास सव्वाशेर, खिशात नाही धेला आणि जालन्याला चला.

 याप्रमाणे सहज बोलता बोलता आपल्याला लोकमापनांच्या साधनांचा उल्लेख ऐकायला मिळतो.

आपल्या वाडवडिलांच्या काळात वापरल्या जाणाऱया मोजण्याच्या किंवा मापनांच्या साधनांबद्दल विचार करताना काही मुद्दे आठवतात-

अ ) सोने, चांदी व औषधे मोजण्याची मापे –

दूध – तांबडय़ा रंगाची गुंज एका बाजूला काळी असते. काही पांढऱया रंगाच्याही असतात. गुंजेचा पाला पानात खातात.

गुंज…आठ गुंजा एक मासा, बारा मासे एक तोळा

वरील तिन्ही चिजा मौल्यवान असल्याने मापेही सूक्ष्म असतात.

आ) धान्य मोजण्याची मापं ः

धान्य मोजण्यासाठीची बरीचशी मापे आता कालबाह्य झालीयत, पण एकेकाळी ती व्यवहारात प्रचलित होती.

उदा. दोन नेळवी = एक कोळवे

दोन कोळवी = एक चिपटे

दोन चिपटी = एक मापटे

दोन मापटी = एक शेर

दोन शेर = एक अडशिरी

दोन अडशिऱया = एक पायली

सोळा पायल्या = एक मण

वीस मण = एक खंडी

सर्वात मोठे माप खंडीचे होते. त्याहून लहान मण व त्याखालोखाल पायली, अडशिरी, शेर, मापटे, चिपटे, कोळवे व निळवे अशी उतरंड होती. एका खंडीत वीस मण बसत. मणात मात्र दोन प्रकार होते. चाळीस शेरी तर दुसरा सोळा पायल्यांचा म्हणजे चौसष्ट शेरी. त्यालाच बंगाली मण म्हणतात. काही प्रांतांत तो बारा पायल्यांचाही असे म्हणे. पायली हे परिमाण चार शेराचे तर अडिसरी (अडशेरी) जरी अडीच शेराचे असावयास हवे. तरी प्रत्यक्षात दोन शेराचे असे. म्हणजे एका पायलीचा अर्धा भाग. मापटे, चिपटे, कोळवे व निळवे ही शेरापासून अर्ध्या पटीने कमी होत जाणारी मापे होती. धान्य जसे मापाने घेत असू तसे दूध, तेल असे द्रव पदार्थही अर्थातच मापाने घेत.

आठवा म्हणजे मापटे. हे प्रत्येकाच्या घरी असते. आठव्याच्या साहाय्याने धान्य मोजताना पुढील मापे वरीलप्रमाणे वापरली जातात. वेगवेगळ्या भागात वेगळी नावे आहेत.

अर्धा आठवा – एक निठवा

अर्धा निठवा – एक चिपटे

दोन आठवे – एक शेर (एक किलो)

चार आठवे – एक आधुली

आठ आठवे – एक पायली

एक पायली – साडेपाच किलो

वीस पायली – एक क्विंटल

सपाट आठव्याचा अर्धा किलो होतो.

इ) पैसे: व्यवहारात चलन वापरताना

तीन पै म्हणजे एक पैसा किवा एक पै असायची.

माझी आई सांगते की, इंग्रजांच्या राज्यात तांब्याचे पैसे होते. ते राज्य गेल्यावर पांढरे पैसे आले.  एक पै वापरात येण्याआधी एक पैसा म्हणजे तांब्याचा भोकपडय़ा पैसा असायचा. भोकपडय़ा पैशाला मध्यभागी एक छिद्र असायचे आणि ते साठवताना तारेत अडकवून ठेवावे लागायचे.

दोन पैसे मिळून एक ढब्बू पैसा व्हायचा आणि

दोन ढब्बू पैसे मिळून एक आणा व्हायचा.

दोन आण्यांची एक चवली तर

दोन चवल्यांची एक पावली किंवा चार आणे व्हायचे.

दोन पावल्या म्हणजे एक अधेली किवा आठ आणे तर

दोन अधेल्या म्हणजे एक रुपया किवा सोळा आणे असायचे.

याचप्रमाणे खोली मोजण्याचे साधन म्हणून ‘परसभर’ या शब्दाचा वापर केला जाई. परसभर म्हणजे एक पुरुषभर उंचीचे होय. वापरात असलेल्या वस्तूंचाही वापर केला, जाई. उदा. वाटीभर दही, सुपभर धान्य, बादलीभर पाणी, नखभर, तीळभर, भाकरी मोजण्यासाठी कोर, अर्धी, चवड. कांडे – दोन कांडे, पळीभर, पितळीभर इ.

आता या मापनांच्या लोकसाधनांची नावे अवशेषरूपाने शिल्लक राहिली आहेत, परंतु आठवा, पायली, मण हे आजही वापरले जातात.

[email protected]