
>> सनत्कुमार कोल्हटकर
भारत-अमेरिका या दोघांमधील व्यापार करारामधील एक अडसर ठरलेल्या जनुकीय बदल केलेल्या बी-बियाण्यांना भारताचा असणारा तीव्र विरोध हे एक महत्त्वाचे कारण समोर आले आहे. अमेरिका त्यांच्या शेतमालाची आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्राची भारताला होणारी निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु जनावरांना जनुकीय बदल केलेल्या पिकांचे खाद्यान्न म्हणून पुरवायला भारताचा प्रखर विरोध आहे. या जनुकीय बदल केलेल्या (जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स) बी-बियाण्यांचे मानवी शरीरावर होणारे विपरीत परिणाम कोणते याचा घेतलेला हा आढावा.
पश्चिमी देशांमध्ये प्रयोगशाळेमध्ये बी-बियाण्यांमध्ये जनुकीय बदल करून उत्पादित केली जाणारी धान्ये आणि बी-बियाणे यांचे फायदे कोणते यांचा विचार केल्यास अशा बी-बियाण्यांमुळे प्रचंड उत्पादन होते असे बी-बियाणे उत्पादकच सांगतात. या बी-बियाण्यांमुळे जी रोपे तयार होतात, त्यांच्यावर कीड अथवा रोगांचा प्रादुर्भाव होत नसल्याने खराब उत्पादने आणि त्यामुळे होणारे नुकसान टाळता येते.
जगाच्या वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरविताना अडचण येऊ नये म्हणून ही अशी जनुकीय सुधारित बी-बियाणे बाजारात आणली जातात असा या बी-बियाण्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा दावा असतो, पण या अशा बी-बियाण्यांच्या उत्पादनाला विरोध करणाऱयांचा दावा असा आहे की, या जनुकीय सुधारित बी-बियाण्यांच्या उत्पादनांना कीटक खाऊ इच्छित नाहीत. जर कीटकांना हे खाण्यायोग्य वाटत नसेल ते मनुष्य प्राण्याला खाण्यायोग्य कसे हा अत्यंत तार्किक आणि अनुत्तरित प्रश्न आहे. या अशा जनुकीय सुधारित बी-बियाण्यांमुळे उत्पादित होणाऱया अन्नधान्यामुळे मानवी शरीराला आवश्यक प्रथिने आणि इतर तत्सम गोष्टी मिळत नसतील तर या अशा उत्पादित खाद्य पदार्थांचा उपयोग काय? जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक शास्त्रज्ञांनी अशा जेनेटिकली मॉडिफाईड बी-बियाण्यांच्या मानवी शरीरावर होऊ शकणाऱया परिणामांबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त केलेली आहे.
पण अशा खाद्यान्नाला प्रोत्साहन देणाऱया अमेरिका आणि इतर पश्चिमी देशांना ही बी-बियाणे इतर देशांना विकण्यात बराच रस दिसतो आहे. दुष्काळ, पिके वाया जाणे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावर जेनेटिकली मॉडिफाईड फूड उतारा ठरेल असा अमेरिकेतील जैव तंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) मधील तज्ञांचा दावा आहे. अमेरिकेत अशी जेनेटिकली मॉडिफाईड अन्नोत्पादने सर्रास वापरली जातात आणि यामुळे अमेरिकेत लहान मुलांपासून मोठय़ा पुरुषांपर्यंत फास्ट फूडसोबतच जी जाडेपणाची व्याधी पसरलेली आहे, त्या व्याधीमागेही अशी अन्नोत्पादने सर्रास खाण्यामुळे होतात का? हाही एक संशोधनाचा विषय आहे. सोयाबीन, बटाटे, वांगी, पपई, सफरचंद, अननस ही जनुकीय बदल करून अमेरिकेमध्ये उत्पादित करण्यात येणारी वानगीदाखल काही फळे आहेत.
वर्षानुवर्षे आणि पिढय़ान्पिढय़ा माणसाच्या खाद्यान्नाच्या सवयी प्रस्थापित झालेल्या आहेत. साल 1999 च्या अखेरपर्यंत अमेरिकेतील खाद्यानांमधील 2/3 खाद्यान्ने ही जनुकीय बदल केलेली होती. अमेरिकेत सेंद्रिय अन्न (ऑरगॅनिक फूड) आणि जनुकीय बदल केलेले फूड हे वेगळे दर्शविले जात नाही. युरोपियन देशांचा आग्रह असा आहे की, जेनेटिकली मॉडिफाईड फूड उत्पादनांना वेगळे लेबल लावले जावे, जेणेकरून ग्राहकांना त्याची माहिती व्हावी. मोन्सेन्टोसारख्या अमेरिकेतील बी-बियाण्यांच्या उत्पादनातील अग्रेसर पंपनीने या जेनेटिकली मॉडिफाईड बी-बियाण्यांच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूकच फक्त केली नसून त्यांच्या उत्पादनात मोठी आघाडी घेतलेली आहे. याला जैव तंत्रज्ञान न म्हणता जैव अभियांत्रिकी (जेनेटिकल इंजिनीअरिंग) हा शब्दप्रयोग वापरला जातो. थोडक्यात टेलर मेड जनुकीय बदल असे म्हणता येते.
डेव्हिड फ्लेमिंग हे जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांनी या जनुकीय तंत्रज्ञानाचा उपयोग करून बनविल्या जाणाऱया बी-बियाण्यांच्या उत्पादनाबद्दल शंका व्यक्त केली आहे. जनुकीय फेरफार हे अनावश्यक असून ते अपायकारकच ठरू शकतात असे ते सांगतात. नाथन बटालियन हे याच क्षेत्रातील दुसरे शास्त्रज्ञ, तर या जैव तंत्रज्ञानावर टीका करताना हे तंत्रज्ञान अणु तंत्रज्ञानापेक्षाही धोकादायक आहे असे सांगतात. याच बटालियन यांनी अशा जनुकीय बदल केलेल्या बी-बियाण्यांमुळे होणाऱया विपरीत परिणामांची यादीच केलेली आहे. या अशा बी-बियाण्यांमुळे फक्त मानवी आरोग्यच नव्हे, तर शेतजमीन, पर्यावरण, राजकीय, सामाजिक परिणाम होऊ शकतात असे ते सांगतात. तसेच नवनवीन विषाणू, जिवाणू यांची व्युत्पत्ती ते विविध अॅलर्जी पुढे येऊ शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. निसर्गचक्राशी होणाऱया या खेळामुळे अथवा त्यातील ढवळाढवळीमुळे अनेक विपरीत गोष्टी समोर येऊ शकतात. शेतकऱयांनी फक्त या जेनेटिकली मॉडिफाईड बी-बियाण्यांपासून मिळणाऱया वाढीव उत्पादकतेवर लक्ष न ठेवता गुणवत्तेवर प्रामुख्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
भारताची प्रचंड लोकसंख्या बघता अमेरिकेतील या क्षेत्रातील कंपन्यांना या बाजाराची भूल पडली असल्यास नवल नाही. अमेरिकेत अशा जनुकीय बदल केलेल्या बी-बियाण्यांच्या यादीत मका, सोयाबीन, कापूस बियाणे अग्रेसर आहेत. मोन्सॅन्टो वगळता या अशा बी-बियाण्यांच्या उत्पादन क्षेत्रात डय़ूपॉन्ट, फार्मासिया, सिंजेंटा, डो केमिकल्स, अव्हेन्टिस ही इतर प्रसिद्ध कंपन्यांची नावे समोर येतात. या कंपन्यांची अनेक पेटंट्सही आहेत. या कंपन्यांकडून बी-बियाणे विकत घेणाऱया शेतकऱयाला या कंपन्यांसोबत करार करावे लागतात, जेणेकरून ही बी-बियाणे त्या शेतकऱयाला बाहेरील बाजारात विकत घेता येत नाहीत. या विदेशी कंपन्यांचे भारतातील कंपन्यांशी करार आहेत, पण त्या कराराची व्याप्ती काय याची कोणाला कल्पना नाही.
अमेरिकेकडून तेथील शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात सबसिडी दिली जाते. या सबसिडीमुळे अमेरिकेतील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा उद्योग, कृषी उत्पादन, पोल्ट्री उद्योग यांच्या उत्पादनाच्या भारतातील विक्री किमतींशी भारतीय उत्पादक स्पर्धा करू शकणार नाहीत. त्यामुळे वर उल्लेखलेल्या क्षेत्रातील भारतीय उद्योजकांना संरक्षण देणे हे भारत सरकारचे प्रथम कर्तव्य असेल हे निश्चित. त्यामुळे अमेरिकेने कितीही आणि कोणत्याही प्रकारे भारतावर दबाव आणला तरी भारताने त्या दबावापुढे झुकता कामा नये. भारताला खिजवण्यासाठी अमेरिकेकडून पाकिस्तानला भेट देण्यापासून ते त्यांना प्रचंड मदत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तरीही भारताने व्यापार करारातील आपल्या भारताच्या शर्तींवर ठाम राहणे गरजेचे असणार आहे.