लेख – वाचनाची पेरणा इतरांना देतो तो खरा वाचक!

>> प्रसाद कुळकर्णी

विविध पुस्तकांचं वाचन केलं, पण वेळेला काहीच आठवत नसेल, वाचनाने आपल्या आचार-विचारात काही फरक पडत नसेल, मिळालेल्या ज्ञानाचा मी इतरांना उपयोग करून देत नसेल तर त्या भरमसाट वाचनाचा काय उपयोग? जो वाचक उत्कृष्ट, वेचक साहित्याचा, वाङ्मयाचा, काव्याचा आनंद वाचनातून घेतो, वाचलेलं आपल्या हृदयी उतरवतो आणि आपल्याला मिळालेलं ज्ञान स्वतःपुरतं न ठेवता इतरांना वाचनाची प्रेरणा देतो तो खरा वाचक.

भारतरत्न अब्दुल कलाम अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ज्ञानसाधनेत गढून जात होते. म्हणूनच 15 ऑक्टोबर ही त्यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. वाचनाने आपल्या जाणिवा समृद्ध होतात, आकलनशक्ती अधिक खोल होते, अनुभव विश्व अधिक व्यापक होतं. अनेक प्रतिभावान लेखकांनी लिहून ठेवलेल्या सकस साहित्याने आपल्या जगण्याला नवा अर्थ मिळत असतो.

वाचनाची व्याख्या कशी करता येईल? तर आकलनासह केलेलं ध्वनी उच्चारण म्हणजे वाचन. वर म्हटल्याप्रमाणे वाचनामुळे माणसाचा आंतरबाह्य विकास तर होतोच, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, विकसित होतो, वाचनामुळे शहाणपण वाढीला लागतं, स्मृती वाढते.

वाचनाने माणूस प्रगल्भ होतो का ?

तर नक्कीच होतो, परंतु वाचलेलं संपूर्ण अर्थासहित, मन हृदयापर्यंत पोहोचलं, उमगलं आणि समजलं तर.

उदा. दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत असताना किंवा दोघांत काही चर्चा सुरू असताना एकमेकांचे मुद्दे लक्षपूर्वक न ऐकता त्यातल्या सकारात्मक नकारात्मक गोष्टी समजून न घेता ते ध्वनी उच्चारण फक्त कानाआडून जात राहिलं तर ते ऐकणं लक्षपूर्वक होत नाही. तसंच वाचन करताना ते समजून, त्यामधले बारकावे, शब्दांमागचा अर्थ जाणून घेऊन, आशय विषयाचा अभ्यास करून वाचणे हे झालं वाचावे नेटके. थोडक्यात, मी किती पुस्तकं वाचली या संख्येपेक्षा कशी वाचली, त्यातून मला काय गवसलं, मी काय शिकलो, माझ्या ज्ञानात काय भर पडली, त्यातून मला काय प्रेरणा मिळाली हे जाणून घेणं महत्त्वाचं. विविध पुस्तकांचं वाचन केलं, पण वेळेला काहीच आठवत नसेल, वाचनाने आपल्या आचार विचारात काही फरक पडत नसेल, मिळालेल्या ज्ञानाचा मी इतरांना उपयोग करून देत नसेल तर त्या भरमसाट वाचनाचा काय उपयोग? अशांना पढतमूर्ख म्हणतात. तो वाचनाने समृद्ध झालेला नसतो ना, त्याच्या विचार कक्षा रुंदावलेल्या असतात. तो यंत्रमानवासारखा डोळ्यांनी वाचलेलं इतरांना सांगत सुटतो, पण स्वतः मात्र ज्ञानपात्रात गटांगळ्या खात असतो. ‘विद्या विनयेन शोभते’ असं म्हटलं जातं. आपण डोळ्यांनी अनेक पुस्तकं वाचतो, परंतु वाचलेलं मनात, हृदयात आणि कृतीत उतरतं का? जसं खूप गाणारा गवय्या नसतो किंवा खूप खाणारा खवय्या नसतो, तर रसिकांच्या कानाना, मनाला आणि हृदयाला जो आपल्या सुरांनी आनंद देऊन तृप्त करतो तो खरा गवय्या आणि ‘खा खा’ करत न सुटता जो चव घेऊन खातो तो खवय्या. तसंच जो वाचक उत्कृष्ट, वेचक साहित्याचा, वाङ्मयाचा, काव्याचा आनंद वाचनातून घेतो, वाचलेलं आपल्या हृदयी उतरवतो आणि आपल्याला मिळालेलं ज्ञान स्वतःपुरतं न ठेवता इतरांना वाचनाची प्रेरणा देतो तो खरा वाचक.

अनेकदा अति वाचनातून, ज्ञानलालसेमधून विद्वत्तेचा अहंकार बळावतो. ज्ञानाने समृद्ध होत असताना माणूस लीन व्हायला हवा, पण समृद्ध आणि अहंकारी यामधील अगदी पुसट रेषा कधी ओलांडली जाते हे कळतही नाही.

प्रकांड योगी, चराचर सृष्टीला आपल्या कह्यात ठेवणाऱया योगी चांगदेवांच्या मनी ज्ञानदेवांच्या भेटीची इच्छा झाली. आपल्या भेटीची आगाऊ सूचना देण्यासाठी ज्ञानेश्वरांना पत्र पाठवण्याची वेळ आली तेव्हा त्यावर मायना काय लिहावा? हा प्रश्न पडल्यामुळे कोरं भूर्जपत्रच त्यांनी रवाना केलं, पण ज्ञानदेवांनी त्या कोऱया पत्राचा जराही उपहास न करता म्हटलं की, हा चांगदेव कोऱ्या भूर्जपत्रासारखा स्वच्छ, नितळ मनाचा आहे. त्यांना आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची गरज आहे हे जाणून त्यांनी त्या कोऱया पत्रावर ओव्या लिहिल्या. कोऱया पत्रालाही हृदयापासून जाणून घेणारे आणि त्यावर चांगदेवांना जाग आणणारे शब्द लिहिणारे ज्ञानदेव आपल्याला वाचकाने कसं वाचावं याचा धडा देऊन जातात. लेखकाचे फक्त शब्द न वाचता त्या शब्दांमध्ये लपलेला अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे वाचन.

मित्रांनो, या वर्षीच्या वाचन प्रेरणा दिनाला आपल्या मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाची पार्श्वभूमी आहे. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या समस्त जगात खूप आनंद पसरला, आपल्या मराठी भाषेला राजमान्यता मिळाली, पण यावर आपली जबाबदारी काय, आपलं कर्तव्य काय, तर…

‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’

हा बाणा न विसरता मराठी साहित्य, वाङ्मय वाचू या. मराठी शाळांना ऊर्जितावस्था आणू या, मराठी वाचन संस्कृतीची प्रेरणा घेऊ या आणि इतरांना देऊ या आणि ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे,

‘माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।’