दिल्ली डायरी – आसाममध्ये भाजप बेचैन का?

<<< नीलेश कुलकर्णी >>>

आसाममध्ये पुढील वर्षी एप्रिलमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र भाजप तेथे प्रचंड बेचैन आहे. ही बेचैनी इतकी की, विविध विकासकामांच्या नावाखाली सध्या पंतप्रधानांचे आसाम दौरे वाढले आहेत, पण या दौऱ्यात ते विकासाऐवजी बांगलादेशी घुसखोरांवर बोलत आहेत. आसाममध्ये 2021 मध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकणाऱ्या भाजप व सरमा यांना धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घ्यावा लागतोय यातच त्यांचे अपयश सामावलेले आहे.

आसाम हा काँग्रेसचा एकेकाळी अभेद्य बालेकिल्ला होता. मात्र काँग्रेसमधल्याच हेमंत बिस्वा सरमा यांना गळाला लावून भाजपने पहिल्यांदा काँग्रेसला सुरुंग लावला आणि नंतर आसाममधल्या काँग्रेसच्या सत्तेला. आसाममध्ये भाजप सत्तेत आली त्याला आता दहा वर्षे पूर्ण होतील. या दहा वर्षांत लौकिकार्थाने काय बदलले याचे उत्तर भाजपकडे नाही. नाही म्हणायला भाजपचे पहिले मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसाममध्ये विकासात्मक कामे केली. मात्र काँग्रेसमधून ‘आयात’ हेमंत सरमा यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिलेले असल्याने सरमांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा त्यांचे आश्वासनकर्ते अमित शहा यांनी पूर्ण केली. काँग्रेसमध्ये असताना सरमा यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी जंग जंग पछाडले होते. मात्र, तरुण गोगोईंपुढे त्यांची डाळ शिजली नव्हती. आता त्याचे उट्टे सरमा हे तरुण यांचे चिरंजीव खासदार गौरव गोगोईंविरोधात बदल्याचे राजकारण करून काढत आहेत. गौरव यांना काँग्रेसने आसामच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यामुळे सरमा अधिकच चिंतेत आहेत. काहीही करून गोगोईंची लोकप्रियता वाढता कामा नये यासाठी सरमा वेगवेगळे फंडे अवलंबत आहेत. गौरव यांचे पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचा आरोप करून सरमा यांनी चिखलफेक सुरू केली आहे. हे करताना आसाममध्ये हिंदू-मुस्लिम ‘ध्रुवीकरण’ कसे होईल, याकडे सरमा यांचा कटाक्ष आहे. आसाममध्ये 2021 मध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकणाऱ्या भाजप व सरमा यांना धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घ्यावा लागतोय यातच त्यांचे अपयश सामावलेले आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत हेमंत बिस्वा सरमा यांना हिंदुत्वाचा गंध नव्हता. मात्र भाजपमध्ये आल्यापासून ते भलतेच आक्रमक झाले आहेत. इतकेच नाही तर ईशान्येकडचा पक्षाचा चेहरा बनले आहेत. घुसखोरीचा मुद्दा असो की त्यासंबंधीच्या कायद्यांचा, सरमा यांनी कायमच आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने मीडियात चर्चेत राहणे हाही त्यांचा आवडता छंद आहे. त्यासाठी पूरक असा पक्ष त्यांना मिळालेला असल्याने ते हिंदुत्व वगैरेवर प्रवचने झोडत असतात. गौरव गोगोईंचे पाकिस्तान कनेक्शन शोधण्यासाठी त्यांनी एक समितीही नेमली. मात्र अजून तरी समितीला गोगोईंचा पाकिस्तानात गेलेला धागादोरा हाती लागलेला नाही. मात्र तरीही काहीही करून गोगोईंना अडकवायचेच, या ईरेला मुख्यमंत्री पेटलेले आहेत. गौरव गोगोईंचा लोकसभा निवडणुकीत जोरहट मतदारसंघात पराभव करण्यासाठी सरमा यांनी प्रचंड पैसा व यंत्रणेचा वापर केला होता. इतके करूनही 2024 च्या निवडणुकीत गौरव हे दीड लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले होते. या निकालानंतर भाजपचेच एक आमदार मृणाल सैकिया यांनी ‘‘पैसा, यंत्रणा व अहंकाराची भाषा निवडणूक जिंकून देऊ शकत नाही’’, अशी जहरी टीका केली होती. ती टीका खिलाडू वृत्तीने स्वीकारून सरमा यांनी आपली कार्यपद्धती बदलली असती तर मुस्लिमांचे व घुसखोरांचे भय दाखवून नरेटिव्ह सेट करण्याची वेळ त्यांच्यावर आज आली नसती. केंद्रातले अकरा व राज्यातले भाजपचे दहा वर्षांचे सरकार हे डबल इंजिन सरकार असल्याचा मोठा प्रचार आसाममध्ये करण्यात आला होता. मात्र हे इंजिन पटरीवरून उतरू लागले आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा ‘सिग्नल’ पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आसामात काय काय होते ते दिसलेच!

जेन झी आणि ‘डीयू’चे निकाल

देशातील जेन झी सध्या तरी धार्मिक व जातीय ध्रुवीकरणाच्या प्रेमात आहे हे दिल्ली विद्यापीठातील निवडणूक निकालावरून दिसून येते. या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत एनएसयूआयला फक्त एक जागा मिळाली. वाईट तेही नाही. त्यापेक्षा हे की, काँग्रेसप्रणीत अध्यक्षपदाचा उमेदवार हा पन्नास टक्क्यांहून अधिक मतांनी पराभूत झाला. या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांचा आपापला अजेंडा होता. सचिन पायलट, दीपेंद्र हुड्डा हे त्यांचा गोल सेट करत होते, तर कन्हैया कुमार विरुद्ध इतर सगळे असेही चित्र या निवडणुकीत पाहायला मिळाले. याउलट विद्यार्थी परिषदेने शिस्तबद्ध रणनीती आखून मोठा विजय मिळविला. राहुल गांधी अत्यंत प्रामाणिकपणे भाजपविरोधात जनतेमध्ये जाऊन जागर करत आहेत. त्याला प्रतिसादही मिळत आहे. मात्र काँग्रेसमधले प्रस्थापित पुढारी राहुल यांच्या या सगळ्या मेहनतीवर पाणी ओतताना सातत्याने दिसत आहेत.

प्रियंका गांधींची ‘कमिटमेंट’

खासदार प्रियंका गांधी सध्या आपल्या केरळमधील वायनाड या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. तब्बल 12 दिवसांपासून मतदारसंघात त्या तळ ठोकून होत्या. वायनाड हा तसा दूरचा मतदारसंघ. प्रियंका या तिकडून निवडणूक लढवतील, अशी कोणतीही शक्यता नव्हती. मात्र राजकीय समीकरणे अशी बनली की, राहुल यांच्या पाठोपाठ त्यांनी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवली व प्रचंड मताधिक्याने जिंकलीदेखील. त्यानंतर प्रियंका या मतदारसंघासाठी गांभीर्याने काम करताना दिसत आहेत. त्याचबरोबर केरळमधील राजकारणातही रस दाखवत आहेत. वायनाडच्या काँग्रेसमध्येही मोठी गटबाजी आहे. त्याचा बंदोबस्त प्रियंका आपल्या पद्धतीने सध्या करत आहेत. वायनाडच्या दौऱ्यात काँग्रेसच्या दोन्ही गटांना कोणतीही कल्पना न देता ‘समांतर यंत्रणा’ उभी करून प्रियंका काम करत आहेत. काँग्रेसमधील गटबाजीमुळे गेल्या दहा वर्षांपासून पक्ष सत्तेबाहेर आहे. केरळमध्ये निवडणुका दृष्टिपथात आहेत. या वेळीदेखील सत्तेबाहेर जावे लागले तर पक्षाची अवस्था दयनीय होईल. त्यामुळे केरळच्या राजकारणात पक्षाच्या ‘कम बॅक’साठी प्रियंका यांनी वायनाडमध्ये मुक्काम ठोकला आहे. प्रियंका गांधींची ही मेहनत काँग्रेसवाले सार्थकी लावतात की वाया घालवतात हे समजायला अजून अवकाश आहे.

[email protected]