।। तुका झालासे कळस ।।

1223

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

विठोबाच्या ओढीने असंख्य वारकरी मैलोनमैल वाट तुडवीत पंढरीला पोहोचतात. तरी सगळय़ांनाच त्या परब्रम्हाचे दर्शन कुठे होते…? असंख्य जण कळसाचे दर्शन घेऊन वारी सुफळ संपूर्ण करतात.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने वैष्णवांची मांदियाळी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाली आहे. पंढरीचा पांडुरंग म्हणजे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. दिंडय़ा, पताकांच्या राशींसह लाखो वारकरी सावळय़ा विठ्ठलाचा धावा करीत टाळ-मृदंगांच्या गजरात पंढरीला निघाले आहेत. पंढरी म्हणजे भूवैकुंठ! या भूवैकुंठात खेळ मांडला जातो भक्तीचा. ही भक्ती अर्थातच भागवत धर्माने प्रेरित झालेली भक्ती. ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया। नामा तयाचा किंकर। तेणे केला हा विस्तार। जनार्दन एकनाथ। खांब दिला भागवत। तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।

अशा या भागवत धर्माचे भक्तिपीठ म्हणजे पंढरपूर. लाखो वारकरी पंढरीत एकत्र येतात तेव्हा सर्वांना विठुरायाचे प्रत्यक्ष दर्शन होणे जवळ जवळ अशक्य असते. अशा वेळी भाविक भक्त कळसाचे दर्शन घेतात. ‘तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस’ ही वारकऱयांची श्रद्धा असते. पंढरी म्हणजे भाविकांची दुसरी काशीच!
बहिणाई म्हणतात,
उदंड ऐकिला, उदंड गाईला।
उदंड देखिला। क्षेत्र महिमा।।
पंढरीसारखे नाही क्षेत्र कोठे।
जरी ते वैकुंठे दाखविले।।
ऐसी चंद्रभागा। ऐसा भीमातीर।
ऐसा विटेवरी। देव कोठे।
ऐसे वाळवंट। ऐसी हरिकथा।
ठाई ठाई देखा। दिंडीभार।।
ऐसे हरिदास। ऐसे प्रेमसुख
ऐसा नामघोष। सांगा कोठे।।
बहेणि म्हणे आम्हा। अनाथा कारण।
पंढरी निर्माण। केली देवे।।
‘पुंडलिकाच्या भावार्था। गोकुळाहुनी हाल येता’, ‘गीता जेणे उपदेशिले, ते हे विटेवरी माऊली’ असा विठ्ठलाचा आणि पंढरीचा महिमा. पंढरी हे साक्षात वैकुंठ असल्याचा उल्लेख संत तुकाराम महाराजांनी केला आहे. पंढरीत देव उभा उभी भेटतो ही तुकाराम महाराजांची श्रद्धा होती. ते म्हणतात-

पंढरीचा महिमा। देता आणिक उपमा।।1।।
ऐसा ठाव नाही कोठे। देव उभाउभी भेटे।
आहेति सकळ। तीर्थें काळें देती फळं।
तुका म्हणजे पेंठ। भूमिवरी हे वैकुंठा।।

पंढरीचे वर्णन केवळ फळ देणारे तीर्थक्षेत्रच नव्हे, तर भक्तीची पेठ असल्याचे वर्णन तुकाराम महाराजांनी केले आहे. पंढरी भक्तीची पेठ आहे. तसेच संताचे माहेरघर आहे म्हणूनच संत म्हणतात ‘माझे माहेर पंढरी’ या माहेराच्या आठवणींमध्ये दंग झालेल्या तुकाराम महाराजांनी आपल्या माहेरच्या विठुरायाच्या प्रपंचाचे मोठे रसाळ वर्णन केले आहे-
पंढरिये माझे माहेर साजणी।
ओविया कांडणी गाऊं गीती।।
राही रखुमाबाई सत्यभामा माता।
पांडुरंग पिता माहियेर।।
उद्धव अक्रूर व्यास आंबऋषी।
भाई नारदासी गौरवी न।।
गरुड बंधु लडिवाळ पुंडलिक।
याचे कौतुक वाटे मज।।
गरुडाचा उल्लेख अन्य विठुरायाच्या लेकुरवाळय़ा गोतावळय़ासोबत केला गेला आहे. वारकरी पांडुरंगाचे दर्शन घेण्याआधी नामदेव पायरीचे दर्शन घेतात. गरुड खांबाला मिठी मारतात. अर्थात मंदिरात प्रवेश करणे अशक्य झाले तर मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत ‘पांडुरंग, पांडुरंग’ नामघोष करीत आनंदाश्रू ढाळतात. एकमेकांच्या पाया पडतात. कारण पंढरीत प्रवेश करताच माणसाचे ‘मी पण’ एखाद्या पिकल्या फळासारखे गळून पडते. वारकरी परस्परांच्या पाया पडतात, कारण ‘उठा उठी अभिमान। जाय ऐसे स्थळ कोण।। ते या पंढरीसी घडे। खळा पाझर रोकडे।।’ ही त्यांची श्रद्धा असते. पंढरीत आल्यावर गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष असे द्वैत संपते. पंढरीत सर्वच जीवन्मुक्त होतात अशी संतांची धारणा आहे. ‘तुका म्हणे नाही वर्ण अभिमान। अवघेचि जीवन्मुक्त लोक।। पंढरीत शांति क्षमा अंगी विरक्ती सकळ। नैराश्य निर्मळ नारी नर।।
अशी अवस्था सर्वांची होते. वारीला महावैष्णववीर आनंदकल्लोळात पंढरीला नामगजर करतात.
आषाढी कार्तिकी हो गरुड टकयांचे भार।
गर्जती नामघोषे महावैष्णव वीर।।
असे दृश्य पंढरीत पाहायला मिळते.
पंढरपूरला गुढी नेण्यासाठी अवघे संत आणि भक्त अधीर असतात, किंबहुना ही त्यांच्या जीवीची आवडी असते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
‘माझ्या जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी। पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुण वेधिले।। जागृती स्वप्न सुषुप्ति नाठवे। पाहता रूप आनंदी आनंद साठवे। बापरखुमादेवीवरू सगुण निर्गुण। रूप विटेवरी दाविली खुण।।
पंढरीत आज सुसज्ज दर्शन मंडप असून लाखो भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरीही वारकऱयांचा विठ्ठल केवळ मंदिरात नव्हे, तर त्यांच्या अंतःकरणात आहे. सावताचा मळा राखणारा, जनाबाईसोबत जात्यावर दळण दळणारा, गोरोबाकाकाबरोबर मडकी घडविणारा विठ्ठल म्हणजेच ज्याचा त्याचा विठ्ठल. त्याचे दर्शन म्हणजेच त्याच्या मंदिर कळसाचे दर्शन!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या