हरि आणि हराचा संगम – श्री औंढा नागनाथ

>> निळकंठ कुलकर्णी

याम्ये सदड़े नगरे तिरम्ये विभूषिताङ विविधैश्व भोगै: ।
सद्भक्तिमुक्तिप्रदमीशमेकं श्रीनागनाथ शरण प्रपद्ये ।।

श्लोकांतील पाठ नागेश दारूकावने असा आहे आणि त्याप्रमाणे द्वारकेजवळचे लिंग ते हेच ज्योतिर्लिंग होय, असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे. गोमती द्वारकेपासून थेट जाणाऱ्या रस्त्यावर बारा तेरा मैलावर पूर्वोत्तर रस्त्यावर हे स्थान आहे. औंढा नागनाथ हेच नागेश ज्योतिर्लिंग होय, असे दक्षिणेतील लोकांचे म्हणणे आहे.

कथा –

प्राचीन काळात एक दारुका नावाची राक्षसीण होती. तिने पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले. पार्वती तिच्या तपाला प्रसन्न झाली आणि तिला एक वन दिले. हे वन फार चमत्कारी होते. दारुका जिथे जाईल तिथे ते वन तिच्या मागे जात असे. या वनात तिचा पती दारुकसोबत ती राहत होती. दारुका आणि दारुक यांना आपल्या शक्तीचा खूप गर्व झाला होता. हे दोघे सर्व लोकांचा अमानुषपणे छळ करत होते. अनेक ब्राह्मणांना यांनी ठार केले होते. तर काही ब्राह्मणांना बंदी ठेवले होते बंदी केलेल्या ब्राह्मणांमध्ये एक ब्राह्मण शिवभक्त होता. कारागृहात तो शंकराची उपासना करू लागला. ही गोष्ट जेव्हा दारुक राक्षसाला समजली. तेव्हा त्याने शिवभक्त ब्राह्मणांला ठार मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेला. काही काळानंतर ब्राह्मण शिवभक्ताने पुन्हा शंकराची उपासना सुरू केली.

दारुकाला हे समजताच तो धावत आला. त्याने लाथेने पूजा मोडून टाकली तो ब्राह्मणांना ठार मारू लागला. त्यानंतर सर्व ब्राह्मणांनी शंकराचा धावा केला. त्याच क्षणी महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी दारुक आणि दारुका राक्षसांचा वध केला. त्यानंतर महादेव ब्राह्मणांना म्हणाले की, मी येथेच नागेश ज्योतिर्लिंगाच्या रूपाने कायमचे वास्तव्य करेन. तेच ठिकाण आज नागनाथ किंवा नागेश ज्योतिर्लिंग नावाने प्रसिद्ध आहे. मंदिराच्या भोवती जे अरण्य आहे त्याला दारुकावन असे म्हणतात.

ऐतिहासिक माहिती –

पांडवांतील धर्मराजाने हे मंदिर बांधले. महाराष्ट्रातील संत नामदेव व त्यांचे गुरू विसोबा खेचर यांची प्रथम भेट या मंदिरात झाली. यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे हेमांडपंती शैलीचे मंदिर आहे. देवळाच्या आतील भागात शंकर, पार्वती, गणेश, यती यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. पांडवांच्या अज्ञातवासात युधिष्ठिराने हे बांधल्याचे मानले जाते. या मंदिरातील लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या मंदिराच्या पिंडी समोर नंदीची मूर्ती नाही नंदीश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे.

मंदिराच्या आवारात 12 ज्योतिर्लिंगांची छोटी छोटी मंदिरे असून 108 महादेवाची मंदिरे आणि आणखी 68 महादेवाच्या पिंडी आहेत. याशिवाय वेदव्यासलिंग, भंडारेश्वर, नीलकंठेश्वर, गणपती, दत्तात्रय, मुरलीमनोहर दशावतार यांची देखील मंदिरे आहेत. भगवान शंकर व विष्णू या ठिकाणी एकत्र आल्याने या स्थानास व येथील महादेवास हरिहरात्मक लिंग संबोधण्यात आले आहे.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या