ठसा – बी. सरोजा देवी

>> दिलीप ठाकूर

दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांत भूमिका करणाऱया काही कलाकारांची काही ठळक वैशिष्टय़े असतात. ती वैशिष्टय़े विशेषतः साठ व सत्तरच्या दशकात सातत्याने नायिकेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री बी. सरोजा देवी यांची होती. त्यांनी कन्नड, तामीळ व तेलुगू भाषेतील चित्रपटांत सातत्याने भूमिका साकारल्या. दक्षिणेकडील चित्रपट निर्मिती संस्थांनी निर्माण केलेल्या हिंदी चित्रपटांतून हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अनेक नायकांसोबत भूमिका केल्या. त्या नृत्यात कमालीच्या प्रगत होत्या. इतकेच नव्हे तर बी. सरोजा देवी यांनी कन्नड, तेलुगू चित्रपटांत नेसलेल्या साडय़ा,

फॅशनेबल वस्त्रे आणि सौंदर्य प्रसाधने यांची स्त्रियांना भुरळ पडली व त्यांनीही त्याच प्रकारचे कपडे, सौंदर्य प्रसाधने अंगीकारली. एखाद्या अभिनेत्रीचे हे यशाचे सर्वोत्तम परिणाम मानले जाते. यालाच स्टार म्हणतात व त्या बी. सरोजा देवी नक्कीच होत्या. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील त्या सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होत्या. सरोजा देवी यांना पद्मश्री (1969) व पद्मभूषण (1992) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांत सोळाव्या व सतराव्या वर्षी अनेक अभिनेत्री चित्रपटसृष्टीत पाऊल टाकतात त्याप्रमाणेच सरोजा देवी यांना वयाच्या 17 व्या वर्षी कन्नड चित्रपट ‘महाकवी कालिदास’ (1955) मध्ये पहिली संधी मिळाली. तेलुगू चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘पांडुरंग महात्यम’ (1957) द्वारे पदार्पण केले. ‘नादोडी मन्नन’ (1958) या तामीळ चित्रपटाने त्यांना तामीळ चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री केले आणि त्या दीर्घकाळ त्या स्थानावर टिकून राहिल्या. सरोजा देवी यांनी हिंदी चित्रपटांतही भूमिका साकारल्या. त्यात ‘पैगाम’ (1959) मध्ये दिलीप कुमारसोबत, ‘ससुराल’ (1961) मध्ये राजेंद्र कुमारसोबत, ‘बेटी बेटे’ (1964) मध्ये सुनील दत्तसोबत आणि ‘प्यार किया तो डरना क्या’ (1963) मध्ये शम्मी कपूरसोबत नायिकेची भूमिका साकारली. राज कपूरसोबत ‘नजराणा’ (1961) साठी सरोजा देवी यांच्यावर काही दृश्ये चित्रितही झाली, परंतु दिग्दर्शक सी. व्ही. श्रीधर यांच्याशी काही कारणास्तव झालेल्या वादामुळे त्यांच्या जागी वैजयंतीमालाची निवड झाली. मात्र हिंदीतही आघाडीच्या अभिनेत्यांची नायिका साकारण्यात सरोजा देवी यांना यश प्राप्त झाले. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटसृष्टीत बी. सरोजा देवी यांनी व्यावसायिक यशाचे अनेक विक्रम प्रस्थापित केले. एम. जी. रामचंद्रन यांच्या भाग्यवान नायिका अशी त्यांची ओळख निर्माण झाली. या जोडीने 26 तामीळ चित्रपटांत नायक-नायिका म्हणून काम केले. हा एक विक्रमच. त्याशिवाय शिवाजी गणेशन व सरोजा देवी जोडीचे ओळीने 22 तामीळ चित्रपट सुपर हिट ठरले. स्त्रियांना त्यांच्या ड्रेसिंग सेन्सची आवड होती आणि त्यांच्या साडय़ा व ब्लाऊज, दागिने, केशरचना यांची मुली, स्त्रियांनी मोठीच नक्कल केली. 1960 च्या दशकात ‘एंगा वीट्टू पिल्लई’ (1965) आणि ‘अनबे वा’ (1966) या तामीळ चित्रपटांमधील त्यांच्या साडय़ा आणि सौंदर्य प्रसाधने महिलांमध्ये लोकप्रिय होत्या. त्यातही विशेष उल्लेखनीय गोष्ट तो कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांचा काळ असूनही बी. सरोजा देवी यांच्यासारख्या साडय़ांचे आकर्षण वाटले. त्यानंतर सत्तरच्या दशकात याचे प्रमाण अधिकाधिक वाढत गेले. पतीच्या निधनानंतर 1985 मध्ये त्यांनी एक वर्ष चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तसेच कुटुंबाबाहेरील लोकांनाही त्या भेटल्या नाहीत. त्यांनी 1987 मध्ये पुन्हा चित्रीकरण सुरू केले. त्यानंतर ‘लेडीज हॉस्टेल’ हा चित्रपट यशस्वी ठरला, परंतु सरोजा देवी यांनी आणखी पाच वर्षे कोणताही नवीन चित्रपट स्वीकारला नाही. त्यानंतर काही चित्रपटांतून भूमिका साकारल्या. अभिनयाशिवाय त्यांचा चित्रपटसृष्टीतील अन्य गोष्टींतही सहभाग होता. 1998 आणि 2005 मध्ये सरोजा देवी यांनी चित्रपट निर्णायक मंडळाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी कर्नाटक चित्रपट विकास महामंडळाच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले. सरोजा देवी बंगळुरूमध्ये स्थायिक झाल्या होत्या. तिथे त्या सामाजिक कार्यात सहभागी होत असत. त्यांनी त्यांच्या पती आणि आईच्या नावाने अनेक देणगी शिबिरे आयोजित केली होती. त्या धर्मादाय ट्रस्ट, पुनर्वसन केंद्रे आणि आरोग्य कार्यक्रमांमध्येदेखील सहभागी होत. बी. सरोजा देवी कन्नड चित्रपटसृष्टीत ‘अभिनय सरस्वती’ (अभिनयाची सरस्वती) आणि तामीळनाडूत तामीळ चित्रपटसृष्टीतील ‘कन्नडथु कन्ना पैंगली’ (अभिव्यक्तीची सरस्वती) म्हणून ओळखल्या जात असत.