लेख – स्तिमित करणारी जिद्द!

>> दिलीप जोशी  ([email protected])

एक क्षण असा येतो, सारा मोहर गळून जातो’ अशी पाडगावकरांची एक कविता आहे. त्यातली आणखी एक ओळ म्हणजे ‘वाटत असते जीवन म्हणजे गणिताचे लांबट पुस्तक.’ थोडक्यात काय, ‘आयुष्याचं गणित’ जटील होत चाललेल्या काळात निराशा मनाला घेरते. बरं, सभोवतालचं वातावरणही उत्साह, उभारी देण्याला पोषक नसेल तर मनातला अंधार अधिकच गडद होत जातो. सात अब्ज माणसांच्या ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे?’ हा समर्थांचा प्रश्न कायमचाच आहे. गरीबांची दुःखं वेगळी, श्रीमंतांची वेगळी, कोणाला तर सुखच टोचत असतं. सुखी माणसाचा ‘सदरा’ म्हणूनच आजवर तरी कोणाला सापडलेला नाही.

त्यातच आता निसर्गाचे प्रकोप जगाला वेठीला धरतायत. म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम, दोन्ही प्रकारचं जीवन कष्टप्रद होत चाललंय. पिचलेली माणसं या ना त्या समस्यांनी ग्रासलीयत आणि निराश होतायत असं सार्वत्रिक दृश्य आहे. दिखाऊ सुखाच्या आवरणाखाली वेदनेचा चेहरा लपलेला अनेकदा दिसतो.

मग करायचं काय? आयुष्यभराची अडथळय़ांची शर्यत पार करताना जीव मेटाकुटीला येतो, तेव्हा प्रसन्नतेने जगण्याची ऊर्जा आणायची कुठून? डोळे मिटून ज्यांच्या मार्गाने निश्चिंतपणे जावं अशा व्यक्ती बहुधा इतिहासाच्या पुस्तकातच दिसतात. आदर्श कुणाचा ठेवायचा? परंतु अशा या जगातही आज अनेक साधीभोळी माणसं कमालीच्या जिद्दीने जगताना दिसतात. प्रसिद्धीचं वलय त्यांच्याभोवती असत नाही, पण त्यातलं क्वचित कुणीतरी ‘प्रकाशात’ येतं आणि आपल्याला ‘ऊर्जा’ देऊन जातं.

पंधरा-वीस वर्षांपूर्वी एका वृद्धाची कथा प्रसिद्ध झाली होती. नव्वदीच्या घरातल्या त्या वृद्धाने नातवाबरोबर शाळेत नाव घातलं. त्या छोटय़ा गावातले मास्तरही त्याच्या मुलांपेक्षा लहान. सारेच परस्परांना ओळखणारे. या आजोबा-पणजोबा वयाच्या व्यक्तीला वर्गात ‘शिकवणं’ त्यांनाच संकोचून टाकू लागलं तेव्हा म्हातारबुवा हसून म्हणाले, विसरून जा माझं वय. बालपणापासून शिक्षणाची आवड होतीच. विपरीत परिस्थितीने ती पूर्ण केली नाही. आता धरदार ठीक चाललंय आणि शिक्षणाचं वय पाच काय नि पंच्याएWशी काय? पाहू किती लक्षात राहतं ते. सोबत लहानगा नातू आहेच रोज माझा अभ्यास घ्यायला. पुढे एकेक परीक्षा उत्तीर्ण होत ते एकदम शालान्त परीक्षेला बसले आणि पास झाले. साऱ्या गावाला आपण ‘पास’ झाल्यासारखा आनंद झाला. त्यांच्या शिक्षणाने गावकऱ्यांच्या मनात ऊर्जा पेरली आणि पाटी-पेन्सिलकडे पाठ फिरवणारे ‘पाठ’ गिरवू लागले!

एका माणसाची अशी जिद्द अनेकांना अंधाराच्या गर्तेतून क्षणात बाहेर करते. अनेक वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध व्यक्तीची मुलाखत घेताना जीवनातील यशापयशाबद्दल विचारलं तेव्हा ते उद्गारले, ‘‘मी यशापयशाच्या नव्हे, समाधानाच्या मार्गाने निघालो होतो. यश-अपयश तर आयुष्यात येणारच. पण आपलं पाऊल योग्य दिशेला पडतंय याचं समाधान पहिल्या पावलापासूनच मिळतं.’’ त्यांचा हा संदेश लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी इतक्या अलिप्तपणे यशापयशाकडे पाहता आलंच असं नाही, पण निराशा मात्र कधी वाटली नाही. अंधारातच तारे प्रकाशमान दिसतात, तशा काही व्यक्ती सभोवतीच्या कल्लोळात आपला जीवनस्वर मंजूळ करत असलेल्या आढळतात.

केरळमधली भागीरथी अम्मा त्यापैकीच एक. वय वर्षे 105. या वयात या पणजीने जिद्दीने चौथीची परीक्षा दिली आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली! हॅटस् ऑफ! दुसरं काय म्हणणार! तिचं शतायुषी आयुष्य काही सुखाची भरलेली घागर नव्हती. मन विषण्ण व्हावं असे चटके बालपणापासूनच बसत होते. बालवयातच मातृसुखाला पारखी झालेली भागीरथी क्षणात ‘मोठी’ होऊन आपल्या लहान भावंडांचा सांभाळ करू लागली. तारुण्यात पदार्पण करताना त्या काळच्या प्रथेप्रमाणे विवाह झाला. वयाच्या तिशीपर्यंत सहा मुलं पदरी पडली आणि नवरा गेला. पुन्हा सारा अंधार. तो अंधार ‘पिऊनच’ ती ठामपणे उभी राहिली. आपल्याला ‘मिळणारा’ अंधारच तिने मनातून नष्ट केला. आयुष्य उताराला लागलं. सारं काही ठीक झालं. पण पाटी-पेन्सिल घेऊन अक्षरं गिरवण्याची आस पूर्ण व्हायची राहिली. भागीरथी साक्षरता अभियानात सामील झाली आणि 105व्या वर्षी चौथीची परीक्षा देऊन आपण ज्ञानार्थी असल्याचं तिनं सिद्ध केलं. अशी ही कुठे कुठे विखुरलेली माणसं. सूर्याचं तेज नसेल कदाचित त्यांच्यात, पण काजव्यासारखी स्वयंप्रकाशी जरूर असतात. त्यांना मनोमन अभिवादन करायला हवं.

आपली प्रतिक्रिया द्या