लेख – तंत्रज्ञानातील मत्तेदारीला शह देण्याचा प्रयत्न

>> महेश कोळी

संगणक आणि मोबाईल क्रांतीनंतर बदललेल्या तंत्रज्ञान विश्वात ऑपरेटिंग सिस्टीम हा गाभा आहे, परंतु या क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट, गुगल, ऍपल या  कंपन्यांची मत्तेदारी आहे. संगणकांचा विचार करता विंडोजचा वरचष्मा दिसतो; तर स्मार्टफोन्सवर अँड्रॉईडचे अधिराज्य दिसते. या मत्तेदारीला शह देण्यासाठी हिंदुस्थानने पहिले पाऊल टाकले आहे. भारओएस ही स्वदेशी प्रणाली हिंदुस्थानने विकसित केली असून ती अँड्रॉईडला शह देणारी आहे. ती वापरल्यास गुगल प्ले-स्टोअरची गरज संपुष्टात येणार आहे. कारण भारओएसचे स्वतंत्र ऍप स्टोअर असेल. या नव्या ओएसची उपयुक्तता, कार्यक्षमता कितपत प्रभावी आहे यावर ती अँड्रॉईडचा कसा मुकाबला करेल हे ठरेल.

गेल्या काही दिवसांपासून भारओएस खूपच चर्चेत आहे. नुकतीच या ऑपरेटिंग सिस्टीमची चाचणी झाली. यावेळी केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होत्या. मंत्र्यांनी स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करणाऱ्या टीमचे अभिनंदन केले. केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या ऑपरेटिंग सिस्टीमची चाचणी केली. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयएम) मद्रासने ही ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली आहे. भारओएस ही एक मुक्त आणि मुक्तस्रोत ऑपरेटिंग सिस्टीम असून ती विकसित करण्यासाठी हिंदुस्थान सरकारने अर्थसहाय्य केले आहे. स्मार्टफोनमधील परदेशी ऑपरेटिंग सिस्टीमवरील अवलंबित्व कमी करणे आणि स्थानिक पातळीवर विकसित तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे हे या उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

भारओएस कोणत्याही नो डिफॉल्ट ऍप्ससह (एनडीए) येत नाही. याचा अर्थ असा की, त्यात पूर्वीपासून डाऊनलोड केलेले कोणतेही ऍप्स नाहीत. वापरकर्ते त्यांना अपेक्षित असणारे ऍप्स डाऊनलोड करू शकतात. म्हणजेच आपल्या डिव्हाईसवर ऍप्सना असलेल्या परवानग्यांवर आपल्याला अधिक नियंत्रण ठेवण्याची संधी दिलेली आहे. याचे कारण असे की, आपण आपल्या डिव्हाईसवरील ठरावीक वैशिष्टय़ांसाठी किंवा डेटा ऍक्सेससाठी ज्या ऍप्सवर आपल्याला भरवसा आहे, तेवढीच ऍप्स  मोबाईलवर डाऊनलोड करू शकतो. ही ऑपरेटिंग सिस्टीम संस्थागत खासगी ऍप स्टोअर सेवेवरून (पीएएसएस) डाऊनलोड केल्या जाणाऱ्या ऍप्सच्या बाबतीत विश्वसनीयता नसल्यास ती डाऊनलोड न करण्याची संधी देते. पीएएसएस सुरक्षा आणि गोपनीयतेच्या मानकांची पूर्तता करणाऱ्या ऍप्सच्या सूचीमध्ये सामील होण्याची संधी हे ऍप देते. भारओएस ही प्रणाली अँड्रॉईड ओपन सोर्स प्रोजेक्टवर  आधारित आहे, त्यामुळे ती काही अंशी गुगलच्या अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमसारखीच आहे. अँड्रॉईड आणि भारओएस यांच्यातील मुख्य फरक असा की, भारओएसमध्ये कोणतेही पूर्व-इन्स्टॉल केलेले ऍप्स नाहीत. वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीचे ऍप्स डाऊनलोड करण्याची संधी या प्रणालीत आहे.

भारओएसचे वापरकर्ते त्यांना ज्या ऍप्सचा वापर करण्याची इच्छा आहे, अशा ऍप्सच्या एपीके फाईल डाऊनलोड करू शकतात आणि वापरकर्त्यांना या फाइल्स इंटरनेटवर उपलब्ध होऊ शकतात, परंतु एपीके फाइल्स धोकादायक असण्याचीही शक्यता असते आणि एपीके फाइल्स डाऊनलोड न करण्याचा सल्ला गुगलकडून वापरकर्त्यांना दिला जातो. आयओएस प्रणालीबद्दल बोलायचे झाल्यास ती ऍपलच्या मालकीची ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि भारओएसचे त्याच्याशी काहीही साधर्म्य नाही. भारओएस सर्व अँड्रॉईड ऍप्सवर चालू शकते. अर्थात कंपनीने स्मार्टफोन वापरकर्त्यांपर्यंत कसे पोहोचायचे याची योजना अद्याप जाहीर केलेली नाही. ऑपरेटिंग सॉफ्टवेअर लोकांसाठी कधी उपलब्ध होईल, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. नियमित स्मार्टफोन वापरकर्त्यांना ही प्रणाली उपलब्ध होणार आहे की नाही, हेही आतापर्यंत समजू शकलेले नाही.

भारओएस सेवेची गोपनीयता आणि सुरक्षितता यांची काही संस्थांमार्फत सध्या चाचणी घेतली जात आहे. ही गोपनीयता वापरकर्त्यांची संवेदनशील माहिती हाताळताना आवश्यक असते. अशा वापरकर्त्यांना फाईव्ह-जी नेटवर्कद्वारे क्लाऊड सेवांमध्ये प्रवेश मिळणे अपेक्षित आहे. भारओएस हे जेएएनडीके ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने तयार केलेले सॉफ्टवेअर आहे. ही कंपनी आयआयटी मद्रास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज फाऊंडेशनने विकसित केली आहे. दुसऱ्या शब्दांत, आयआयटी मद्रासने स्थापन केलेलीच ही कंपनी आहे. स्मार्टफोन कंपन्यांशी या प्रणालीसाठी कशा प्रकारे संपर्क साधला जाणार आहे, हे अद्याप कंपनीने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी ही प्रणाली कधी उपलब्ध होईल, हेही निश्चित नाही. सर्वसामान्यांना ती उपलब्ध होईल की नाही, याबाबतही स्पष्टता नाही. अँड्रॉईडला समांतर अशी ही प्रणाली विकसित केली असली तरी दोन्हीपैकी सरस प्रणाली कोणती हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारओएस प्रणाली वापरल्यास गुगल प्ले-स्टोअरची गरज संपुष्टात येईल. कारण भारओएसचे स्वतंत्र ऍप स्टोअर असेल. जी ऍप हिंदुस्थानी लोकांसाठी विशेषत्वाने उपयुक्त आहेत, त्या ऍप्सवर भारओएसकडून अधिक लक्ष केंद्रित केले जाणेही शक्य आहे. अनेक डिव्हाईस आणि ऍप्सना अँड्रॉईड प्रणाली सपोर्ट करते, परंतु भारओएस प्रणाली कोणकोणत्या ऍप्सना आणि डिव्हाईसना सपोर्ट करते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोठय़ा टेक कंपन्यांनी जे बिझनेस मॉडेल स्वीकारले आहे, ते पाहता नवीन ऑपरेशन सिस्टीमला व्यावसायिक यश मिळणे ही खूपच कठीण गोष्ट होऊन बसली आहे. गुगलच्या अँड्रॉईड सिस्टीमचाच विचार केला तर ती सिस्टीम सुमारे 3 अब्ज स्मार्टफोनना सपोर्ट करते. स्मार्टफोनमध्ये ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसच्या (एपीआय) माध्यमातून सर्व सॉफ्टवेअर प्रोग्राम कम्युनिकेट केले जातात. ऍप विकसित करणाऱ्यांसाठी ही बाब महत्त्वाची असते, परंतु आपल्या प्रोप्रायटरी एपीआय आणि हँडसेट कंपन्यांसोबत करार करून गुगलने ऍप तयार करणाऱ्यांचा मार्ग खडतर करून ठेवला आहे.

भारओएस ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारे स्मार्टफोन तयार करा, असे स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांना सांगणेही सोपे असणार नाही. आणखी एक अडचण अशी की, हिंदुस्थानातील बहुतांश अँड्रॉईड फोन सध्या चिनी कंपन्याच विकत आहेत. या चिनी कंपन्या आपले फोन हिंदुस्थानी ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित करतील याची शक्यता जवळजवळ शून्यच आहे. नवीकोरी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करणे आणि अँड्रॉईडसह आयओएसला आव्हान देणे हे खूपच अवघड काम आहे. त्यासाठी आर्थिक पाठबळ तर हवेच; शिवाय डेव्हलपर्सचा पाठिंबा असणेही आवश्यक आहे. आयफोनच्या आयओएस प्रणालीचा दबदबा कंपनीच्या स्वतःच्या प्ले-स्टोअरमुळेच निर्माण झालेला आहे. ऍपलने प्ले-स्टोअरचा शोध लावला नव्हता; परंतु ऍपलने प्रत्येक ऍप डेव्हलपरला एका जागी आणून जोडले. त्याचा फायदा कंपनीला मिळाला. गुगलने थर्ड पार्टी स्टोअरऐवजी साइडलोडिंगचा मार्ग निवडला होता. आज मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये 71 टक्के जागतिक वाटा अँड्रॉईड प्रणालीचाच आहे. त्यामुळे भारओएस ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्यात आलेले यश ही अत्यंत चांगली बातमी असली तरी ती प्रत्यक्षात मोबाईलमध्ये येण्याचा मार्ग आजमितीस तरी खडतरच दिसत आहे.

(लेखक संगणक अभियंता आहेत.)