दिल्ली डायरी : ‘चमकी’ ताप अन् ‘चमको’ राजकारण !

>> नीलेश कुलकर्णी ([email protected])

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये चमकीतापाने आतापर्यंत 150 पेक्षा जास्त मुले दगावली आहेत. त्यामुळे तेथील आरोग्य सेवेची दुरवस्था चव्हाटय़ावर आली आहे. अर्थात, बिहारमधील गोरगरीबांची चिमुकली अशी मरण पावत असताना राजधानी दिल्लीतील चमकोराजकारणाला मात्र त्यामुळे बाधा आलेली नाही हे आपल्याकडील राजकारण्यांच्या असंवेदनशीलतेचे आणखी एक उदाहरण म्हणावे लागेल. सत्ताधारी भाजपपासून काँग्रेससह विरोधी पक्षांपर्यंत कोणीही याला अपवाद नाही हे अधिक गंभीर आहे.

बिहारसह संपूर्ण देशात त्या राज्यातील ‘चमकी’ तापाच्या साथीचे पडसाद सध्या उमटत आहेत. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये या आजाराने 150 पेक्षा अधिक लहान मुलांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ही सर्व मुले गरीब कुटुंबातील आहेत. बिहारच्या सरकारी आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्यानेच या आजाराने तेथे अक्षरशः थैमान घातले आहे. संसर्ग झालेली मुले त्याला पटापट बळी पडत आहेत. असे असले तरी राजधानी दिल्लीतील ‘चमको’ राजकारणावर त्याचा जराही परिणाम झाला नाही. त्याला कोणताही पक्ष अपवाद नाही. लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांसाठी पंतप्रधानांनी शाही भोजनाचे आयोजन केले त्यावर आता टीका होत आहे. अर्थात इतर पक्ष आणि नेते यांचीही असंवेदनशीलता यापेक्षा वेगळी नाही. ‘सुशासन बाबू’ म्हणून ज्यांचा उदोउदो केला जातो ते बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार 150 वर मुलांचा या तापाच्या साथीत बळी जाऊनही अद्याप मौनातच आहेत. उलट मीडियावरच ते डाफरले. दुसरीकडे मोदी सरकार आणि नितीश सरकारला याबाबत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे काँग्रेससह इतर विरोधी पक्षदेखील वेगळे काहीही करताना दिसत नाहीत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह एकाही विरोधी नेत्याला बिहारमधील या दुर्दैवी कुटुंबांची भेट घ्यावी आणि त्यांचे सांत्वन करावे असे अद्यापपर्यंत वाटलेले नाही. लालू यादव यांचे चिरंजीव परदेशात ‘पर्यटन’ करीत आहेत. रामविलास पासवान यांचे चिरंजीव गोव्यात ‘पार्टी’मध्ये दंग असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. लालू यांच्या कन्या दिल्लीतील एअरकंडिशंड बंगल्यात बसून पंतप्रधानांच्या डिनरवर बहिष्कार घालण्याचे नाटक करीत आहेत. सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत सर्वांची ही नौटंकी उबग आणणारी आहे.

चमकी तापाच्या प्रकरणाने मुख्यमंत्री नितीशबाबूंच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. या एकाच प्रकरणामुळे नितीशकुमारांना भविष्यात सत्तेबाहेर जावे लागले तर आश्चर्य वाटू नये. अर्थात याप्रकरणी नितीशबाबू जनतेच्या लेखी अकार्यक्षम ठरावेत यासाठी केंद्रातील त्यांच्या दोस्त पक्ष भाजपने ‘अलिप्ततावादा’चे धोरण अंगीकारले काय, अशी कुजबूज ऐकायला मिळत आहे. केंद्र सरकार म्हणून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना मुझफ्फरपूरला पाठविण्यापलीकडे नरेंद्र मोदी सरकारने काय केले? वर्ल्ड कपमधून दुखापतीने बाहेर पडलेला क्रिकेटपटू शिखर धवन याला ‘गेट वेल सून’ असे ट्विट पंतप्रधान करतात, पण बिहारमधील गोरगरीब लेकरांचे बळी जात आहेत त्याकडे त्यांनी अद्याप लक्ष दिलेले नाही, अशी टीका होत आहे. त्यात भाजपचे बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य न ठेवता ‘‘क्या स्कोअर हुआ?’’ अशी पृच्छा भर पत्रकार परिषदेत करून राजकारण्यांच्या  संवेदनशून्यतेचे ओंगळवाणे दर्शनच घडवले. पंतप्रधान मोदी यांचे सेंट्रल हॉलमधील भाषण संवेदनशील होते. मात्र चमकी तापप्रकरणी ही संवेदनशीलता कुठे गेली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘सब का साथ सब का विकास’ हे ब्रीद असणाऱ्या सरकारच्या कार्यकाळात ते मुळीच शोभणारे नाही.

नड्डा अन् ओम बिर्ला

jp-nadda-om-birla

देशाच्या राजकारणात या आठवडय़ात दोन राष्ट्रीय नेत्यांचा उदय झाला. भाजपने आपल्या घटनेत तरतूद करून पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी जगतप्रकाश नड्डा यांची नियुक्ती केली. पहिल्या मोदी सरकारात ‘आयुष्मान भारत’ नावाची यशस्वी योजना राबविण्याचे श्रेय तत्कालीन आरोग्यमंत्री या नात्याने या नड्डांचे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ‘कोण हे नड्डा?’ असा प्रश्न अनेकांना पडावा अशी स्थिती होती. नाही म्हणायला हिमाचलमध्ये मंत्री असताना नड्डांनी चांगली कामगिरी केली होती, मात्र प्रेमकुमार धुमल यांच्यांशी छत्तीसचा आकडा असल्याने त्यांना हिमाचल सोडावे लागले आणि हीच त्यांच्यासाठी सुवर्णसंधी ठरली. उत्तर प्रदेशमध्ये अमित शहा यांच्या बरोबरीने सामाजिक समीकरणे जुळविण्यात व डावपेच टाकण्यात हे नड्डा आघाडीवर होते. त्यांच्या रणनीतीमुळेच मायावती व अखिलेश ही ‘बुआ-भतीजा’ जोडी सपशेल अपयशी ठरली. त्याची बक्षिसी नड्डा यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्षपद या रूपात मिळाली आहे. एकीकडे नड्डा यांचे प्रमोशन होत असताना राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांना अचानक धनलाभ व्हावा तसे लोकसभेचे प्रतिष्ठsचे सभापतीपद मिळाले. लोकसभेचा केवळ पाच वर्षांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या बिर्लांनी सात-आठ टर्म असलेल्या अनेक ढुढ्ढाचार्यांना मागे टाकत लोकसभेचे अध्यक्षपद मिळवले. नम्र व संयमी बिर्ला हे कोटय़ात अन्नदानासाठी ख्यातकीर्त आहेत. कोटय़ात कोणी उपाशी आहे हे समजले की, बिर्ला तिथे जातीने जायचे किंवा कोणाला तरी पाठवून त्याच्या अन्नपाण्याची व्यवस्था लावायचे. अशा अनेकांचे ‘आशीर्वाद’ बिर्ला यांना लोकसभा सभापतीपदाच्या आसनापर्यंत घेऊन गेले यात शंकाच नाही.

चंद्राबाबू व जगनमोहन

chandrababu

पाच उपमुख्यमंत्री नेमून आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ‘साऊथ इंडियन सिनेमा’मध्ये शोभेल अशा पद्धतीने आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे. दिल्लीकरांचे ‘ब्लू आईड् बॉय’ अशी सध्या जगनमोहन यांची ओळख आहे. त्यावेळी त्यांचे कट्टर विरोधक चंद्राबाबू नायडू यांचे मात्र ग्रहमान भलतेच फिरले आहे. चंद्राबाबूंनी भाजपशी काडीमोड घेतला आणि विरोधी आघाडी स्थापण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते सध्या  सरकारच्या रडारवर आहेत. त्यामुळेच ते विदेशात असताना त्यांचे राज्यसभेतले खासदार गळाला लावण्यात आले. अर्थात  चंद्राबाबूंची साथ सोडणारे हे खासदार म्हणजे साधू किंवा महंत नव्हेत. उलट यापैकी सीएम रमेश यांची ओळख आंध्रचे विजय मल्ल्या अशी आहे. भाजपच्याच नरसिंहा या प्रवक्त्यांनी अशी टीका अलीकडेच केली होती. त्यांचे उद्गार हवेत विरण्याआधीच भाजप नेतृत्वाने गोमूत्र शिंपडून विविध घोटाळ्यांत अडकलेल्या रमेश यांच्यासह वाय. एस. चौधरी यांचे पायघडय़ा घालून स्वागत केले. राजकारणात हे चालायचेच. मात्र ज्या चंद्राबाबूंनी आंध्रला वेगळी ओळख निर्माण करून दिली, ‘सायबर सिटी’ म्हणून जगभरात हैदराबादला एक वेगळे महत्त्व मिळवून दिले त्या चंद्राबाबूंचे योगदान जनतेने एखाद्या निवडणुकीत त्यांना झिडकारले किंवा पराभूत केले म्हणून नाकारता येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या