बहनों और भाईयों

222

>> शिरीष कणेकर

आमची पिढी अमीन सयानी व त्याच्या ‘बिनाका गीतमाला’वर पोसली. (सगळीच माणसं पं. भास्करबुवा बखलेंच्या गाण्यावर, सावरकरांच्या शब्दांवर, गणपतराव बोडसांच्या अभिनयावर, चिं. वि. जोशींच्या विनोदावर, केशवसुतांच्या कवितेवर, सी. के. नायडूच्या फलंदाजीवर, बालगंधर्वांवर कशी पोसली जाणार? तरी वाटतं आम्ही खूपच बरे. आताची पिढी मिकाच्या गाण्यावर, सनी लिऑनच्या आरस्पानी दर्शनावर, मुद्दाम जागोजाग फाडलेल्या जीन्सवर आणि कशाकशावर देव जाणे पोसली जात्येय. जाऊ द्या. अपनी अपनी किस्मत है…)

मी शाळा कशीबशी संपवत आलो असताना अमीन सयानी आमच्या आयुष्यात ‘छा गया था’. एका बसक्या व भसाडय़ा आवाजाच्या मास्तराला सॉरी, शिक्षकाला – आम्ही अमीन सयानी म्हणायचो. शिक्षकावरचा राग व अमीन सयानीवरचं प्रेम यातून दिसायचं. त्या शिक्षकाला अमीन सयानी म्हणणं म्हणजे नळातून येणाऱ्या पाण्याला नायगारा म्हणण्यासारखं होतं.

उन्हाळय़ाच्या सुट्टीत मी पुण्याला मावशीकडे जायचो. माझा वेळ सत्कारणी लागावा म्हणून मला टिळक रोडवरच्या मा. का. देशपांडे (‘हत् तेरी माका’ असा आचार्य अत्रेंनी त्यांच्यावर अग्रलेख लिहिला होता.) यांच्या इंग्रजीच्या क्लासेसना घातलं होतं. (त्या काळी सर्वच मुलांचं इंग्रजी लेचंपेचं असायचं. आता मुलांचं मराठी ‘वीक’ असतं.) नेमका बुधवारी तो क्लास असायचा. घरोघरी अमीन सयानीचा जादुभरा आवाज मोहमयी जाळं विणत असायचा व एका पाठोपाठ एक धमाल गाणी वाजत असायची. आम्ही मात्र एका खोलीत डांबलेल्या अवस्थेत इंग्रजीचे उभे आडवे वार झेलत असायचो. वडील काय करतात, या प्रश्नावर एक मुलगी अडखळत म्हणाली होती, ‘सर, दे आर…’ हाऊ मेनी फादर्स डू यू हॅव डिअर?’ मा. का.नं छद्मी आवाजात विचारले. माझे कान मात्र खिडकीतून येत असलेल्या अमीन सयानीच्या आवाजाकडे लागले असायचे. परिणामी वारंवार माझे कान इंग्रजीतून पिळले जायचे. आश्चर्य म्हणजे मला वेदना मात्र मराठीतूनच व्हायची. तोंडातून बाहेर पडणारी अस्फुट किंकाळी कुठल्याही एका भाषेची गुलाम नव्हती. आज मा. का. देशपांडेंचा क्लास म्हटला की शिकवलेलं काही आठवत नाही. फक्त हुकलेली ‘बिनाका गीतमाला’ आठवते. ती हुकू दिल्याबद्दल आता मीच स्वतःचा कान पिळतो. मराठीतून. ‘बिनाका गीतमाला’पेक्षा मा.कां.चा क्लास महत्त्वाचा होता? रबिश! (म्हणजे काहीतरीच).

त्या काळी घरात रेडियो हे एकमेव करमणुकीचं साधन होतं. (काही घरांत तेही नव्हतं. बायकोची टकळी हीच करमणूक मानावी लागे.) अशा काळात अमीन सयानीची ‘बिनाका गीतमाला’ ही पर्वणी होती. जणू ईश्वरी देणगी होती. आज त्याचं महत्त्व कळणार नाही. तेव्हा माणसं बुधवारकडे डोळे लावून बसायची. जेवणंबिवणं आठच्या आधी उरकायची किंवा नऊनंतर जेवायचं. आठ ते नऊ हा एक तास अमीन सयानी के नाम होता. आज ‘चोटी के पायदान पर’ कुठलं गाणं असेल यावर चर्चा रंगायच्या. ब्रह्मानंदी टाळी लागायची. कुंडलिनी जागृत व्हायची. ‘बहनों और भाईयों’ हे अमीन सयानीचे परवलीचे शब्द कानावर पडायचे आणि एक गोड शिरशिरी अंगावर यायची. जग एवढं पुढे गेलं, सायन्स एवढं प्रगत झालं, टी.व्ही. आला, कॉम्प्युटर आला पण ‘बिनाका गीतमाला’ची जादू पुन्हा अवतरली नाही.

बावन्न साली सुरू झालेल्या ‘बिनाका गीतमाला’नं ‘रेडियो सिलोन’वर आणि त्यानंतर विविध भारतीवर बेचाळीस वर्षे धुमाकूळ घातला. ‘बिनाका गीतमाला’च्या अफाट लोकप्रियतेमुळे अमीन सयानीनं ‘एस. कुमार का फिल्मी मुकाबला’, ‘सॅरिडॉन के साथी’, ‘बोर्नव्हिटा क्विझ काँटेस्ट’, ‘शालीमार सुपरस्टार जोडी’, ‘म्युझिक फॉर द मिलियन्स’ (बी.बी.सी. वर्ल्ड सर्व्हिस), ‘संगीत पहेली’ (रेडियो ट्रूने स्वित्झर्लंड) हे हिंदी चित्रपट व चित्रपट संगीत या विषयांशी जोडलेले कार्यक्रम सादर केले. ‘बिनाका गीतमाला’ सिलोनमध्ये तयार होते अशी आमची समजूत होती. मग कळलं की, मुंबईत रिगल सिनेमाच्या मागे एका खोलीत ती बनत होती. जय अमीन सयानी!

आज अमीन सयानी 86 वर्षांचा आहे. कमरेतून वाकलाय. त्याला अनेक रोगांनी ग्रासलंय. बोलताना बसावं लागतं, पण एकदा का त्यानं बोलण्यासाठी तोंड उघडलं की तोच चिरपरिचित आवाज ऐकायला येतो. सेम टु सेम. वाटतं कुठल्याही क्षणी तो म्हणेल – ‘बहनों और भाईयों, तो अगली पायदान की तरफ बढते है…’ स्त्रीमुक्ती वगैरे गोष्टी अस्तित्वात नव्हत्या आल्या. तेव्हा सदुसष्ट वर्षांपूर्वी या माणसानं ‘बहनों व भाईयों’ अशी निवेदनाला सुरुवात करून स्वतःची पाठ न थोपटता महिलांना सहजगत्या प्राधान्य दिलं.

अलीकडेच मुंबईतील एका संस्थेने अमीन सयानीचा सत्कार केला. उत्तम उपक्रम. पण ‘बिनाका गीतमाला’तली ‘चोटी के पायदान पर’ असणारी गाणी सादर करणारे ‘चोटी के पायदान पर’ नसतील तर अवसानघात होणारच. माझा एक महामिश्किल मित्र म्हणाला, ‘देव काय मूर्ख होता की ज्याने रफी, तलत, मुकेश, मन्ना डे, किशोरकुमार हे वेगळे व भारी आवाजवाले गायक जन्माला घातले? रफी ऐकताना तलतचा भास होतोय किंवा तलत ऐकताना मुकेश वाटतोय ही शक्यताच निर्माण होत नाही आणि इथे कार्यक्रमात एकच पुरुष सगळय़ांच्या आवाजात गाणार? ‘ये जिंदगी उसीकी है’ या गाण्याचे लचके तोडत सी. रामचंद्रच्या आत्म्याला क्लेश देत व साक्षात लताचा अवमान करीत कोणी कन्यका गाणार असेल तर ते खपवून घेणं अवघड. मी उठून गेलो.
गव्हर्नर विद्यासागर राव यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचे प्रयोजन मला कळू शकले नाही. (बुजुर्ग संगीतकार खय्याम किंवा गायिका आशा भोसले त्यासाठी योग्य नव्हते का?) अमीन सयानी सोडून सर्व विषयांवर बोलायचं अशी कसम खाऊन ते आले असावेत. (जर्मनीत किती विद्यापीठांत संस्कृत शिकवतात ही बहुमोल पण विषयाशी काडीचा संबंध नसलेली माहितीही त्याच कसमेचा भाग असावा.)

माझ्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाला मी विद्यासागर रावना बोलावलं असतं तर रस्त्यावरचे खड्डे, पाण्याचा अपव्यय, कुक्कुटपालन, ‘नासा’मधील नोकऱया, भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण, पैठणी साडय़ांची निर्यात, भिकाऱयांचा बंदोबस्त, फेरीवाल्यांची समस्या यावर त्यांनी अभ्यासपूर्ण भाषण केलं असतं. ऐकता ऐकता मी शंभर वर्षांचा झालो असतो. अमीन सयानीही शंभरीच्या जवळ पोहोचल्यासारखा दिसला.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या