
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांचा ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. ‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. लालकृष्ण आडवाणी यांचे भाजपमधील आणि त्याहीपेक्षा देशाच्या राष्ट्रीय राजकारणातील तसेच समाजकारणातील काही दशकांचे योगदान पाहता त्यांचा ‘भारतरत्न’ने गौरव होणे यात अस्वाभाविक काही नाही. त्यामुळे आडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार दिला म्हणून त्यांच्या राजकीय विरोधकांच्याही पोटात दुखण्याची शक्यता तशी कमीच. आडवाणी हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर ‘भारतरत्न’ने गौरवले जाणारे भाजपचे दुसरे ज्येष्ठ नेते. खरे तर वाजपेयी आणि आडवाणी हे दोघेही तसे समकालीन. दोघांचीही नाळ रा. स्व. संघाशीच जोडलेली. मात्र दोघांचीही कार्यशैली आणि प्रतिमा भिन्न. वाजपेयी हा भाजपचा ‘मवाळ’, तर आडवाणी हा आक्रमक चेहरा. रा. स्व. संघ असो, पूर्वीचा जनसंघ असो की आताचा भारतीय जनता पक्ष, दोघांचेही योगदान महत्त्वाचे. तरीही पंतप्रधानपदापासून ‘भारतरत्न’ पुरस्कारापर्यंत वाजपेयी हे आडवाणींपेक्षा जास्त ‘नशीबवान’ ठरले. खरे तर भाजपचा राजकीय आलेख पेंद्रातील सत्तेचे स्वप्न पाहण्याइतपत 1990 च्या दशकात नेला तो लालकृष्ण आडवाणी यांनी. आता अयोध्येत जे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभे राहिले आहे त्याचे बीजारोपण केले ते रामजन्मभूमी आंदोलन आणि नंतर आडवाणी यांच्या ऐतिहासिक रथयात्रेने. त्यामुळेच भाजपची झेप दोन खासदार यावरून आधी 86 नंतर 121 आणि 1996 मध्ये 161 पर्यंत जाऊ शकली होती. पुढे वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार पेंद्रात सत्तेवर आले त्यावेळी आडवाणी यांना उपपंतप्रधान आणि गृहमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते. ‘लोहपुरुष’ म्हटल्या जाणाऱया आडवाणी यांची नोंद ‘सर्वाधिक काळ गृहमंत्रीपदावर राहिलेले नेते’ अशी झाली. लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपददेखील त्यांनी सर्वाधिक काळ भूषविले. कराचीमध्ये जन्मलेले आडवाणी हेदेखील अनेकांप्रमाणे फाळणीनंतर भारतात आले. 1941 मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले. 1951 मध्ये भारतीय जनसंघाचे सदस्य बनल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ झाला. 1967 मध्ये ते पहिल्यांदा दिल्ली महानगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि नंतर त्यांच्या राजकीय वाटचालीने मागे वळून पाहिलेच नाही. 1941 मध्ये ‘संघ स्वयंसेवक ते 2004 मध्ये देशाचे उपपंतप्रधान’ हा आडवाणी यांचा प्रवास आदर्शवत असाच आहे. 2014 पर्यंत म्हणजे ‘मोदी काळ’ सुरू होईपर्यंत भाजपमध्ये आडवाणी यांचाच शब्द प्रमाण होता. मात्र त्यांचे पक्षातील स्थान मधल्या काळात घसरणीला लागण्यामागे त्यांच्याबाबत घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडीच कारणीभूत ठरल्या. ‘रथयात्रे’ने त्यांना आणि भाजपला मोठे राजकीय यश मिळवून दिले खरे, पण आडवाणी यांची प्रतिमा ‘कट्टर हिंदुत्ववादी नेता’ अशी निर्माण झाली. त्यांना पंतप्रधानपद न मिळण्यात ही प्रतिमाही अडथळा बनली होती. पुढे पाकिस्तान दौऱयावर असताना मोहम्मद अली जीना यांचे केलेले काwतुक आणि जीना यांच्या कबरीला दिलेली भेट त्यांच्या भाजपमधीलच नव्हे तर एकूण राजकीय कारकीर्दीसाठी ‘टर्निंग पॉइंट’ ठरली. ‘जीना कौतुका’ची किंमत त्यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा त्याग करून मोजावी लागली. नंतर त्यांचे भाजपमधील महत्त्व कमी करण्याचेही प्रयत्न झाले. 2014 नंतर सुरू झालेल्या मोदी काळात तर आडवाणींसह सर्वच ज्येष्ठ भाजप नेत्यांना ‘मार्गदर्शक मंडळ’ म्हणून चौकटीबाहेर ठेवण्यात आले. ज्यांनी पक्षाला सत्तास्थापनेपर्यंत आणून ठेवले त्या आडवाणींना मिळालेली उपेक्षेची वागणूक प्रचंड चर्चेची ठरली. तरीही त्यांचा मागील सात-आठ वर्षांचा काळ तसा विजनवासातच गेला. अर्थात त्यामुळे लालकृष्ण आडवाणी या नावाचे रा. स्व. संघ, जनसंघ, भाजप आणि राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व, योगदान तसेच वलय कमी होत नाही. आता भाजप भले सलग दोनदा सत्तेत आला असेल, परंतु त्याला सत्तेच्या जवळपास पोहोचण्यासाठी लायक आणि सक्षम करणारा, सत्ताशिखरापर्यंत भाजपला मार्ग दाखविणारा कणखर नेता म्हणून लालकृष्ण आडवाणी यांचेच नाव घ्यावे लागेल. पिंबहुना आज जे स्वतःला भाजप आणि केंद्रीय सत्तेचे ‘मालक’ समजत आहेत, त्यांनाही आजचे दिवस त्यांचे ‘पालक’ आडवाणी होते म्हणूनच दिसले. आज भाजपच्या राजकारणात नीतिमत्तेला भिंग लावून शोधावे लागेल. मात्र वाजपेयी आणि आडवाणी यांच्या काळात असे चित्र नव्हते. लालकृष्ण आडवाणी यांचा ‘भारतरत्न’ पुरस्काराने झालेला गौरव हा त्यांचे आठ दशकांतील अथक परिश्रम आणि नीतिमान कारकीर्दीचा ‘सन्मान’ म्हणता येईल.


























































