
>> साबीर सोलापुरी
वर्धा येथे 2024 मध्ये पार पडलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘कविकट्टा’ नवोदित कवींच्या आणि काव्य रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. त्याचे कारण असे की, ‘कविकट्टय़ात’ कविता सादर केलेल्या 96 निवडक कवींचा ‘शहाण्णव’ हा अतिशय देखणा, सुबक, आकर्षक अजोड प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती साहित्यप्रेमी डॉ. पी. डी. पाटील यांच्या औदार्यातून आणि ‘कविकट्टा’ प्रमुख राजन लाखे यांच्या पुढाकारातून हा कवितासंग्रह सिद्ध झाला आहे.
डॉ. पी. डी. पाटील हे उदार अंतकरणाचे, कवितेवर निस्सिम प्रेम करणारे, कवींविषयी प्रचंड आस्था असणारे रसिक. त्यांचे साहित्य आणि समाजभान सदैव जागृत असते. वर्धा येथे रंगलेल्या ‘कविकट्टा’ व्यासपीठास पाटील यांनी भेट दिली होती. ही भेट लाखमोलाची, अविस्मरणीय ठरली. त्या वेळी व्यासपीठावरून त्यांनी कवींशी संवाद साधताना 96 निवडक कवितांचा संग्रह काढण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यांनी या आश्वासनाची परिपूर्ती करत या कवितासंग्रहाचे शानदार प्रकाशन केले. यात सहभागी कवींचा त्यांनी यथोचित गौरव केला.
‘शहाण्णव’ हा रुबाबदार, दिमाखदार, दर्जेदार वाङ्मयीन मूल्यप्राप्त कवितासंग्रह. हा अनोखा उपक्रम नवोदित कवींना प्रेरणा, चालना देणारा आहे. प्रस्तुत कवितासंग्रह वाचताना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण कवितेचे अंतरंग डोळ्यांसमोर तरळत राहते. कवितेची मांडणी कलात्मकतेने करण्यात आली आहे. राजन लाखे यांचे प्रत्येक कवितेसोबतचे अक्षरलेखन आणि चित्रे खूपच बोलकी आहेत. यात अभंग, अष्टाक्षरी, द्विपदी, गीत गझल, मुक्तछंद असे जवळपास सर्वच काव्य प्रकार हाताळण्यात आले आहेत. प्रत्येक कवितेचा घाट आणि आकृतिबंध उत्तम प्रकारे आविष्कृत झाला आहे.
यातील ऋण या कवितेत नीरज आत्रम लिहितात,
ऋण फेडू या भारतमातेचे
नतमस्तक होऊ तिच्या चरणी
तन, मन, धन अर्पण करू
देह जाण्याआधी सरणी
डॉ. शिवाजी शिंदे (सोलापूर) यांची ‘प्रार्थना’ आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे. हेव्यादाव्यांमुळे माणसे माणसापासून दूर जात आहेत. भेदाभेद दिवसागणिक वाचालला आहे. जातीधर्माच्या नावाने विद्वेषाची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे एकात्मतेला तडा जाण्याची भीती वाटत आहे.
नको भेदाभेद, न रहावा वाद
टिकावी अभेद्य, एकात्मता
बाप हा घरचा कर्ता पुरुष असतो. कुटुंबाचे सारे उत्तरदायित्व तो आपल्या खांद्यावर पेलत असतो. कोणत्याही परिस्थितीत तो खंबीरपणे उभा असतो. तो रागीट किंवा निष्ठूर नसतो. त्याच्या अंतरातही मायेची माया असते. आईचे रूप त्याच्या काळजात दडलेले असते. रखरखत्या उन्हातान्हात बाप कष्टाच्या घामाने त्याची करूण कहाणी लिहितो, पण तो कुणाला वाचून दाखवत नाही. सुमेळ साळवे (जळगाव) ‘बापामधली माय’ ही त्यांची कविता लक्षवेधक आहे.
बापामधली माय तू, जाणुन घे रं राजा
कव्हा कळंल रं तुला, त्या भोळ्या बापाची भाषा
दुसऱयांची उणीदुणी कायात, दुसऱयांना दूषणे देण्यातच माणसाचे आयुष्य सरून जाते. या नसत्या उठाठेवीत तो आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाही. आपण स्वतच्या अंतकरणात डोकावून पाहिल्यास आपल्याला बऱयाच त्रुटी दिसू लागतात. दुसऱयांच्या आयुष्यात डोकावण्याचा अट्टहास करता कामा नये. कोण चूक, कोण बरोबर हे ठरविण्याचा आपणास अधिकार नाही. वेळ वाया घालविण्यापेक्षा आयुष्याचा मनसोक्त आनंद लुटावा. आनंदाचे गाणे गात मस्त जीवन जगावे असे ऋषभ कुलकर्णी (छत्रपती संभाजीनगर) यांना वाटते.
कोण चुकीचे कोण बरोबर नंतर पाहू
आयुष्याचे गाणे…आनंदाने गाऊ
रंगांच्या धुमश्चक्रीत आज माणूस माणसाच्या जिवावर उठला आहे. आता झेंडेसुद्धा जातनिहाय झाले आहेत. हिरवा, भगवा, निळा, पिवळा झेंडा हातात घेऊन तो त्याच्या मालकाचा अजेंडा राबविण्याचा खुलेआम प्रयत्न करतो. त्यात रक्तपात घडतो तो बेकसूर माणसाचाच. जातीचा गर्व करणारा मेल्यानंतर मात्र त्याच्या सोबतीला कुठल्याच जातीच्या रंगाचा झेंडा जात नाही. त्याला एकटय़ालाच सरणावर जावे लागते. या सरणावरच्या सत्याकडे राजेश काटोळे (अकोला) यांनी लक्ष वेधलंय.
चितेवरची लाकडे कशी अचानक बोलली
सांग म्हणे मुर्दाड माणसा तुझी जात कुठली?
ही निवड अगदी अचूक म्हणायला हवी. सर्वच कवितांवर भाष्य करणे जागेअभावी शक्य नाही. या संग्रहातील प्रत्येक कविता वैशिष्टय़पूर्ण आणि सर्वांगसुंदर आहे. शहाण्णव कवितांवर रसग्रहणासह स्वतंत्रपणे पुस्तक लिहिता येण्यासारखे आहे. आशय, विषयाच्या बाबतीत या कविता इतक्या व्यापक, समृद्ध आहेत. संयोजकांनी याचा विचार केल्यास काव्य रसिकांना उत्मोत्तम वाङ्मयीन मेजवानी मिळू शकेल असे मनापासून वाटते.
शहाण्णव कवितांचा संग्रह
संपादन ः राजन लाखे
प्रकाशक ः डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे
पृष्ठे ः 122, ह मूल्य ः 400 रु.




























































