
>> तृप्ती कुलकर्णी
आज उत्तम कलाकार होण्याचा ध्यास घेणारे अनेक आहेत, पण उत्तम आस्वादक रसिक होण्याचा ध्यास घेणारे मात्र अपवादात्मकच आहेत. नांदेडचे विश्वाधार देशमुख हे असेच एक उत्तम आस्वादक आणि लेखक होय. नुकतंच त्यांनी लिहिलेलं ‘पसायधन’ नावाचं पुस्तक वाचनात आलं आणि ‘काव्य शास्त्र विनोदेन, कालो गच्छति धीमताम्’ या जुन्या संस्कृत लोकांची आठवण झाली.
पोटापाण्यासाठी एखादं काम करणं ही आपली प्राथमिक गरज आहे आणि बऱयाचदा भौतिक सुखसमृद्धीसाठी आपल्याला तिथे तडजोड करावी लागते, परंतु त्यानंतर उरलेल्या वेळात आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी, व्यक्तित्त्व खुलण्यासाठी आपण काय करतो यावर आपल्या मानसिक सुखाची परिभाषा आणि व्याप्ती ठरते. आजच्या भवतालातल्या अस्वस्थ परिस्थितीचं मूळही यात दडलेलं असावं. तंत्रज्ञानाच्या सोयीमुळे मिळणारा वेळ सत्कारणी कसा लावावा या गोंधळात ‘पसायधन’सारखं पुस्तक उत्तम पर्याय आहे.
याच्या नावाबाबत लेखक म्हणतो, ‘प्रार्थनेतून प्रसादाच्या रूपात प्राप्त झालेलं धन आहे.’ ही प्रार्थना, प्रेम नक्की काय हे वाचताना लक्षात येतं की, प्रार्थना, सदिच्छा, आशीर्वाद मिळण्याची काही विशिष्ट ठिकाणंच असली पाहिजेत असं नाही. त्या कुठेही मिळू शकतात. अगदी साध्या गोष्टीतसुद्धा, फक्त तशी दृष्टी मात्र आपल्याला हवी. या दृष्टीतून लिहिलेलं हे पुस्तक निरनिराळ्या कलाकृतींचं मनोज्ञ आस्वादक समीक्षण आहे. भारतीय आणि अभारतीय मिळून एकूण 22 कलाकृतींचा यात समावेश आहे. त्यांनी आपल्याला काय दिलं… कसं समृद्ध केलं… तसंच एका कलाकृतीची नाळ दुसरीशी कळत-नकळतपणे कशी जोडली आहे.
समकालीन वा भिन्नकालीन कलाकृती. त्यातले कलाकार, कलाकृतींच एकमेकींशी असलेलं साधर्म्य, वेगळेपण आणि काळानुरूप त्यात होत गेलेला बदल हा नेमका टिपल्यामुळे हे लेखन फारच रंजक झालं आहे.
या सुंदर साहित्यिक दस्तावेजात केवळ कलाकृतींची गुंफण नाही, तर त्या निर्मिती मागच्या कार्यकारण भावाचीही गुंफण आहे. विविध काळातील सामाजिक मानसिकतेचा नकळत तुलनात्मक अभ्यासही आहे. दुनिया गोल आहे असं म्हणताना ‘वैचारिक बदलांचीही पुनरावृत्ती होते’ हे फार कमी वेळा आपण लक्षात घेतो. ते यातून प्रकर्षाने दिसतं. उदा. नारायण सुर्वेचा मार्क्सबाबा लेखात मुथूवेल करुणानिधी आणि काल मार्क्स यांच्याबाबत त्यांनी केलेलं भाष्य व त्याच वेळेला नारायण सुर्वे यांनी मार्क्सवर केलेली कविता ही वाचली तर काही घटनांमधला कार्यकारण भाव किती मिळताजुळता असतो हे दिसून येतं.
ओघवती लेखनशैली, विलक्षण समृद्ध भाषा तसंच विषयाची मांडणी अधिक सहजपणे कळावी म्हणून नोंदवलेली काही सामाजिक निरीक्षणं सारे काही दाद देण्याजोगेच आहे. ‘गब्बर सिंह ये कहकर गया…’ लेखात ते म्हणतात, ‘शाळा आणि सिनेमा ही दोन्ही शिक्षणाला प्रभावित करणारी माध्यमे. पहिले औपचारिक, तर दुसरे अनौपचारिक. परंतु यापेक्षाही एक अतिशय विलक्षण साम्य या दोहोंमध्ये आहे. दोहोंतून मिळणाऱया शिक्षणाचे स्वरूप अर्धवट, एकांगी आणि वरपांगी आहे. वस्तुस्थिती दर्शविण्यापेक्षा कल्पनारम्यतेची महापूर मात्रा देण्यात दोहोंची खासियत आहे.’ तसंच ‘लतीफः प्रेमाची परिभाषा उलगडणारा नायक’मध्ये म्हणतात, ‘आपण प्रेम साक्षरता बेतास बात असलेल्या समाजात राहतो’ सुरुवातीचं असं वाक्य या लेखाचा नूरच बदलून टाकतं. याबरोबरच ‘विंदांचा धोंडय़ा न्हावी’मध्ये म्हणतात, ‘कविता झिरपत झिरपत समाज मनात उतरावी असे पूरक पर्यावरणच आपण तयार करू शकलेलो नाही. आमचा एकंदर जीवन व्यवहार आणि बहुतांशी साहित्य व्यवहार विरुद्ध दिशेला तोंड करून फुरंगटून बसलेला असल्याने वेळोवेळी घटस्फोटाचे असे प्रसंग उद्भवत राहतात’ हे वाचल्यावर साहित्य समाज जीवनाचं प्रतिबिंब आहे हे बहुचर्चित वाक्य आठवून विरोधाभासाने हसू उमटतं. आजची साहित्यिक स्थिती पाहिली तर हे वाक्य साहित्याच्या वर्मावर बोट ठेवणारं आहे. सध्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गदारोळात आणि माहितीच्या विस्फोटात किती, काय, कसं आणि का वेचावं या प्रश्नांना उत्तर म्हणून हे पुस्तक अतिशय बोलकं आहे.