मी उद्योजिका

542

>> दीपा मंत्री

आजची सक्षम स्त्री ! ती प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करते आहे. मग उद्योग क्षेत्रात तरी ती कशी मागे राहीलआजची गृहिणीदेखील घरातील अखंड व्याप सांभाळून स्वतःचा छोटासा उद्योग सुरू करू शकते.

नोकरी करत नाही पण किमान आपला छोटासा व्यवसाय असावा असे अनेकांच्या मनात येत असेल. पण हा व्यवसाय कसा करावा हा प्रश्न सतावत असेल तर मग घरच्या घरी एखादा छोटासा व्यवसाय करता येऊ शकतो. म्हणून एकटीने करता येईल अशा व्यवसायाबद्दल जाणून घेऊया.

आज गृहिणी घर सांभाळून अगदी व्यवस्थितपणे व्यवसाय करु शकतात. जर लघु उद्योग करायचा असल्यास व्यापार, उत्पादन आणि विक्री याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे असते. एखादा नवीन उद्योग करायचा असल्यास त्यांनी स्वतःला काय आवडतं हे पाहावे. जे करताना आनंद मिळतो तीच तुमची आवड असते. कोणाला ज्वेलरी डिझायनिंग आवडेल, कोणाला वेगवेगळ्या साडय़ा विकायला आवडतील, कोणाला मार्केटिंगमध्ये रुची असेल तर कोणाला खाद्यपदार्थ बनवण्याची आवड असते. त्यामुळे आपली आवड काय आहे यासाठी स्वतःची स्वतः पारख करणे महत्त्वाचे असते.

नवोदित महिलांसाठी

ज्या महिलांना नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे अशांसाठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आहेत, संस्था आहेत. आम्ही महाराष्ट्र व्यापारी पेठ भरवतो. त्याची मी अध्यक्ष आहे. गेली तीस वर्ष आम्ही व्यापारी पेठ भरवतो. त्याचा उद्देशच तो आहे की नवोदित महिलांना व्यवसायाकडे वळवणे. त्यासाठी आम्ही आमच्या मंडळाचे सदस्य करुन त्यांना स्टॉल देतो. आमच्या पतपेढीतून त्यांना लोन देता, मार्केट देतो, जाहीराती देतो, सगळं आम्ही देतो. त्यांचंकाम असतं की तुम्ही तुमच्या बोलण्याने जे ग्राहक आले आहेत त्यांना तुमचे उत्पादन विकणे. साधारण गणपतीच्या आठ दिवस आधी व्यापारी पेठ सुरु होते. मग गणपतीला लागणाऱ्या वस्तू कोणत्या, त्या ग्राहकांना कशा विकायला हव्यात.

तुम्हाला दागिन्यांचा व्यवसाय करायचा असेल तर दागिने होलसेलमधून आणायचे आणि थेट विकायचे किंवा तुम्ही स्वतः डिझायनर ज्वेलरी तयार करुन विकू शकता. पण कुठलाही व्यवसाय करण्यासाठी आधी त्याविषयी माहिती घेऊन त्याचा कोर्स करा, क्लासेस लावा. क्लासेसमधल्या प्रत्येकाला सारखे शिकवले जाते. पण मग इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचे असेल तर स्वतःची काहीतरी वेगळी डिझाईन तयार करायला हवी. वेगळी कल्पना सुचली पाहिजे. इतरांपेक्षा माझी ज्वेलरी सगळ्यांमध्ये कशी उठून दिसेल यासाठी प्रयत्न करायला हवा. व्यवसाय करताना कच्चा माल कुठून मिळेल, मार्केट सर्व्हे काय आहे या सगळ्याची इत्यंभूत माहिती घेणे आवश्यक आहे. आपल्या ग्राहकांची गरज काय आहे, सध्या कोणता ट्रेण्ड सुरु आहे, त्यांना काय आवडेल हा विचार करुन जर पाऊल उचलले तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी साध्य होतील.

वस्तूचे उत्पादन करणे फार सोपे आहे. पण त्याची विक्री हे तुमचं खरं कौशल्य असतं. मार्केट सर्व्हे तुम्हाला असायला हवा. मार्केटमध्ये सध्या कसली चलती आहे. ट्रेण्डच्या विरोधात जाऊन द्यायचे तर त्याच्यातले वेगळेपण काय आहे. सर्वसामान्यांपेक्षा काय हटके दिलं तर लोकांना आवडेल. हे शोधता आले पाहिजे. आज मोठय़ा प्रमाणात सोशल मिडीयाची मदत होते. घरबसल्या अनेक गोष्टींची माहिती मिळते. ऑनलाईन आहे. तिथे तुम्हाला बारीक बारीक गोष्टींची माहिती मिळते.

सणउत्सवांबाबत अपडेट राहायला हवे

सण उत्सवांचे दिवस असल्यावर महिन्याभराने कोणता सण येणार हे माहीत असणे गरजेचे आहे. कारण सणांच्या दिवशी त्या प्रकारचे कपडे, दागिने शोधत असतात. उदाहरणार्थ, संक्रात आली तर त्याची तयारी नोव्हेंबरपासून करायला हवी. काळे कपडे, हलव्यांचे दागिने हे आधी तयार करायला हवे. संक्रांतीच्या तोंडावर दागिने बनवायला घेतले तर त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे कुठले सण येत आहेत, काय इव्हेंट असतात या सगळ्या गोष्टींबाबत अपडेट राहायला हवे.  त्याने फायदाच होतो.

व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य

  • जो व्यवसाय करणार त्याची प्राथमिक माहिती असणे आवश्यक.
  • ट्रेण्ड माहीत असणे आवश्यक.
  • संभाषण कौशल्य चांगले असायला हवे.
  • जो दिखता है वही बिकता है… त्यामुळे तुमचं पहिलं प्राधान्य आधी ती वस्तू चांगल्यात चांगली कशी होईल याला असायला हवे. त्याचे पॅकेजिंग चांगले असले पाहिजे.
  • मुक्याचे सोनंही विकलं जात नाही, पण बोलणाऱ्याची मातीही विकली जाते. तुम्ही ग्राहकांशी कसे बोलता, त्यांना वस्तू घेण्यास कसे प्रवृत्त करता हे तुमच्या संभाषण कौशल्यावर अवलंबून असते.
  • इतरांपेक्षा माझी वस्तू कशी आणि किती वेगळी आहे, त्यात काय खुबी आहे. जेणेकरुन समोरच्या व्यक्तीने ती घ्यावी. हे फार कठिण काम असते. अगदी नवीन लोकांना सुरुवातीला अडचणी येतात. ते कौशल्याने हाताळणे हीदेखील एक कला आहे.
  • बऱ्याचदा असे होते की एखादा ग्राहक शंभर साडय़ा दाखवायला सांगतात आणि त्यातली एखादी घेतात किंवा घेतही नाही. अशावेळी पेशन्स महत्वाचे असतात. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून ग्राहकांशी वागणे महत्वाचे असते. ग्राहकाला हवे ते दाखवणे आपले कामच असते. नाही आवडले तर आपण त्यात काही करु शकत नाही. अशावेळी शांतपणे त्यांना हसतमुखाने निरोप द्यावा.

सरकारी योजना

  • सरकारी योजनांमध्ये असे बरेच कोर्सेस आहेत. त्याने स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करु शकता.
  • तुमच्या वॉर्डमध्ये त्याची नोंदणी केल्यावर त्या बचत गटांना सरकारतर्फे मोफत प्रशिक्षण दिले जाते. उदाहरणार्थ ज्वेलरी मेकिंग, ’टेलरिंग , पर्सेस शिवायचे प्रशिक्षण, फाईल बनवण्याचे प्रशिक्षण, अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण आहे, साबण, मेणबत्ती अशा अनेक गोष्टी आहेत जे सरकारतर्फे मोफत शिकवले जाते. इथे जाऊन तुम्ही शिकू शकता.
  • याची चौकशी करायची असल्यास पालिकेच्या वॉर्डमध्ये गेलात की तिथे जनसंपर्क अधिकारी असतो त्याला भेटायचे. त्यांच्याकडून माहिती घेऊन बचत गट रजिस्टर करावे लागते.

लेखिका महाराष्ट्र व्यापारी पेठेच्या अध्यक्ष आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या