
>>द्वारकानाथ संझगिरी
चेतन प्रतापिंसग चौहान अखेर कोव्हीडचा बळी ठरला. तो पत्रकारांना नेहमी विचारायचा, की माझं पूर्ण नाव का तुम्ही देत नाही? कारण त्या नावातून राजपूतत्व सिद्ध होत असे. राजपूत असल्याचा चेतन चौहानचा अभिमान हा राणा प्रतापपेक्षा कमी नव्हता. मी राजपूत आहे, ही भावना त्याने अनेकदा व्यक्त केली आहे. आयुष्यभर तो लढलाही राजपूतासारखा. आणि गेलाही कोरोना विषाणूशी लढत लढत. त्याच्या शरीराचा एक एक बुरूज कोसळत गेला. त्याचं क्रिकेटचं आयुष्यही लढण्यात गेलं. यश- अपयश हे त्याच्या आयुष्यात श्रावणातल्या ऊन-पावसासारखं चंचल होतं. तो आधी महाराष्ट्रासाठी खेळला आणि रणजीत खोऱ्याने धावा केल्या. 1969 साली न्यूझीलंडविरुद्ध त्याला टेस्ट कॅप मिळाली. पहिली कसोटी धाव काढताना घड्याळ 25 मिनिटे पुढे सरकलं होतं. मग ब्रुस टेलरला त्याने त्याची लाडकी स्क्वेअर कट हाणली आणि चौकार वसूल केला. त्याच्या कसोटी धावांचं बँक अकाऊंट उघडलं गेलं. मग थेट षटकार ठोकला. हे सर्व त्याने ब्रुस टेलर या चांगल्या गोलंदाजाविरुद्ध केलं. त्यानंतर मात्र त्या मालिकेत सांगण्यासारखं त्याच्याकडे काहीही नव्हतं. दोन कसोटीनंतर तो वगळला गेला. मग त्याच वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला एक कसोटी मिळाली. तिथेही फारशी काही कमाई झाली नाही. तो वगळला गेला.
तो रणजीत परतला आणि त्याने थेट 873 धावा केल्या. पुन्हा कसोटीचा दरवाजा ठोकला. तो त्याच्यासाठी पुन्हा उघडला. त्याला इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने मिळाले. पण काहीच रोमहर्षक घडलं नाही. पुनश्च: हरिओम म्हणत त्याने रणजीत लढाई सुरूच ठेवली. यावेळी मात्र त्याने एक महत्त्वाची गोष्ट केली, तो महाराष्ट्रातून रणजी खेळायला दिल्लीत गेला. बिशन बेदी हा त्या वेळेला दिल्लीचा कॅप्टन होता. बेदीला तो हवाच होता. कारण बेदीला त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे गुण दिसले. तो खेळपट्टीवर कुतुबमिनारसारखा उभा राहायचा. प्रतिस्पर्धी गोलंदाजीला थकवायचा. आणि वेगापासून तर कधीच पळाला नाही. िंकबहुना दिल्लीचा एक जबरदस्त संघ तयार होण्यास चेतन चौहानचा वाटा खूप मोठा होता. तसा त्याचा जन्म उत्तर प्रदेशचा आहे. वडील आर्मीत होते आणि त्यांची बदली पुण्याला झाली. त्यामुळे चेतन चौहानमधला क्रिकेटपटू वाढला पुण्यात आणि महाराष्ट्रात. आणि मग पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढलेल्या माणसाने दिल्लीत तख्त राखलं.
त्या काळातल्या क्रिकेटपटूंत त्याचा फिटनेस उत्तम होता. दहा किलोमीटर धावून मग तो दिवसभर फलंदाजी करू शकायचा. 1975-76 साली त्याने पुन्हा एकदा धावांचा नैवैद्य निवड समितीला दाखवला. नैवैद्याचं पान तर पहा – हरयाणाविरुद्ध 158 धावा, पंजाबविरुद्ध 200 आणि मग कर्नाटकविरुद्ध 147. या धावा करताना त्याचा जबडा फ्रॅक्चर होता. त्याला तोंडात घास घेता येत नव्हता. तो स्ट्रॉने फक्त सूप व फळांचा रस पिऊ शकायचा. या सर्व धावा त्या डाएट फुडवर केलेल्या आहेत. त्यानंतर निवड समितीला प्रसन्न होण्यावाचून पर्यायच नव्हता. तो हिंदुस्थानी संघातून ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर गेला. दौऱ्यावर व्हिक्टोरियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये त्याने 157 धावा उभारल्या. उभारल्या असंच म्हणायला पाहिजे. आणि त्यासुद्धा एकावर एक वीट ठेवून भिंत उभारणाऱ्या गवंड्याच्या संयमाने. काम चोख होण्यासाठी त्याने 517 मिनिटे घेतली. आणि जोखीम वजा करून टाकण्यासाठी फक्त दोन चौकार मारले. विकेट देणं हे इमान देण्यापेक्षा वाईट कृत्य त्याला वाटत असावं. पण त्याने पर्थ कसोटीत 88 धावा केल्या. त्यानंतर 1981पर्यंत त्याने मागे वळून पाहिलं नाही.
त्याच्या रूपाने सुनील गावसकरला त्याचा सर्वोत्कृष्ट जोडीदार सापडला. दोघांच्या कितीतरी मोठ्या भागीदाऱ्या मला आठवतात. पाकिस्तानात लाहोरला 192, मग हिंदुस्थानात वेस्ट इंडीजविरुद्ध मुंबईला 117 आणि 153 धावांची भागीदारी. 1979 साली इंग्लंडविरुद्ध ओव्हलवरची 213 धावांची भागीदारी निव्वळ अविस्मरणीय होती. या भक्कम पायामुळे 438 धावांचं टार्गेट हिंदुस्थानने जवळजवळ राखलं होतं. फक्त नऊ धावा कमी पडल्या. ही मॅच न जिंकण्याचं दु:ख तो नेहमी बोलून दाखवायचा.
मग ती मेलबर्नवरची गावसकरबरोबरची गाजलेली 165 धावांची भागीदारी! ते सुनीलला शतकाच्या वाटेवर असताना लिलीच्या गोलंदाजीवर पायचीत देणं, सुनीलने चेतनला पॅव्हेलियनमध्ये घेऊन जाण्याचा घेतलेला निर्णय या सर्व नाट्यामध्ये चेतनची भूमिका फार महत्त्वाची होती. सुनील चेतनलाच पॅव्हेलियनकडे सतत ढकलत होता. आणि तो सुनीलपासून दूर पळत होता. त्याने जर सुनीलचं ऐकलं असतं आणि सीमारेषा ओलांडली असती तर नियमाप्रमाणे ती मॅच ऑस्ट्रेलियाच िंजकली असती. ऑस्ट्रेलियाला दिलेलं ते फुकट दान ठरलं असत. नंतर ती कसोटी आपण जिंकली. त्यामुळे चेतनची भूमिका किती महत्त्वाची होती हे जाणवलं. ऑस्ट्रेलियातल्या त्या तीन कसोटींतल्या मालिकेत चेतन चौहानने लिली, पास्कोसमोर दोनशे एकोणपन्नास धावा केल्या. तिथून हिं दुस्थानी संघ न्यूझीलंडला गेला. तिथे चेतनने 78, 36 आणि 7 अशा धावा केल्या. आणि त्यानंतर तो बाहेर फे कला गेला तो कायमचा. तो का फे कला गेला याचं कारण मला कधीच कळलं नाही. तो वृत्तीने आक्रमक नव्हता. त्याच्याकडे स्क्वेअर कट, हूकसारखे आक्रमक फटके असले तरी एकू णच फटक्याचा त्याचा भाता हा मर्यादितच. पण त्याच्याकडे अमर्याद गटस् आणि टेम्परामेण्ट होतं. बचाव चांगला होता. सुनीलबरोबर त्याची जोडी जमलेली होती. 59 डावांत त्या दोघांनी मिळून 3022 धावा केल्या होत्या. त्यात दहा वेळा शतकी भागीदारी उभारली होती. आणि काय हवयं! बरं, जगातल्या सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांसमोर त्याने धावा केल्या होत्या. आणि इंचभरसुद्धा पळाला तर कधीच नव्हता. आणि गोलंदाज कोण होते? इम्रान, सर्फराज, लिली, थॉम्पसन, पास्को, हॉग, हेडली, विलीस, बॉथम, क्लार्क वगैरे वगैरे. त्याच्या दाताच्या ठेवणीमुळे तो सतत हसतोय असं वाटायचा. थॉम्पसनविरुद्ध त्याने स्टाण्स घेतला की थॉम्पसनला वाटायचं, की तो आपल्याला पाहून हसतोय. तो आपल्याला चिडवतोय. आणि तो अधिक वेगात चेंडू टाकायचा. देवाने त्याला भरघोस असं काही दिलं नाही. त्याने जे काही मिळवलं ते कष्ट करून. कसोटी कारकीर्दीत त्याने पाच वेळा 80ची मर्यादा ओलांडली. देवाने त्याला एक शतक दिलं असतं तर काही बिघडलं असतं का? पण 2084 कसोटी धावा करून एकही शतक न ठोकणारा तो पहिला फलंदाज आहे. त्याची शेवटची रणजी तो मुंबईला 85 साली खेळला. पहिल्या डावात 98 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 54. दोन्ही डावांत त्याला चक्क ढापला. त्यानंतर गरवारेमध्ये एक पार्टी होती. त्या पार्टीत ज्या पंचाने त्याला दोनदा चुकीचं बाद दिलं होतं, तो चेतन चौहानकडे आला आणि त्याला सॉरी म्हणाला. चेतन फक्त हसला, पण आत कुठंतरी रडला असावा. कारण ती मॅच दिल्ली फक्त 90 धावांनी हरली. त्याला जर बाद दिलं गेलं नसतं तर कुणी सांगावं, चेतनने दिल्लीला रणजी ट्रॉफी जिंकून दिली असती.
त्याचे खेळण्याचे दिवस संपल्यानंतरही तो क्रिकेटशी एकनिष्ठ राहिला. तो प्रशिक्षक झाला. तो हिंदुस्थानी संघाचा मॅनेजर झाला. तो पदाधिकारी झाला. ज्या ज्या पदावरून शक्य असेल त्या पदावरून त्याने हिंदुस्थानी क्रिकेटची सेवा केली. मग त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राजकीय विकेटवरही त्याला चांगलं यश मिळालं. आणि अचानक कोव्हीडने त्याचा घात केला.



























































