जाज्वल्य राष्ट्राभिमानी छत्रपती संभाजी महाराज

>>रणवीर राजपूत

हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी राजांनी निरंतर 23 वर्षे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत शत्रूंशी समर्थपणे लढा दिला. शूरवीर, कर्तव्यदक्ष, मुत्सद्दी, करारी बाणा असलेले, कुशल प्रशासक, विद्वान, संस्कृत भाषेचे प्रकांडपंडित, शिस्तप्रिय, मातृभूमीचे पाईक, निस्सीम देशप्रेमी, जाज्वल्य राष्ट्राभिमानी असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांना रणभूमीवर पराजित करण्याचे धाडस कोणत्याही मोगल बादशहात नव्हते. छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर गडकिल्ल्याच्या गिरीशिखरावर झाला. खरं तर संभाजी राजे हे मराठा साम्राज्याचे दुसरे ‘छत्रपती’ म्हणून नावारूपाला आले. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षीच त्यांनी ‘बुधभूषण’नामक ग्रंथ लिहून त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर प्रकाश टाकला. याशिवाय ‘नायिकाभेद’, ‘नवशिख’, ‘सात सतक’ या ग्रंथांचीदेखील त्यांनी निर्मिती केली. अशा प्रकारे जगाच्या पाठीवर शिवकालीन कालखंडात पहिला बाल साहित्यिक होण्याचा नावलौकिक त्यांनी मिळवला.

संभाजी राजे हे मराठा साम्राज्याचे राजपुत्र असल्याने त्यांना रणांगणावरील मोहिमा आणि राजनीतीतले डावपेच याचे बाळकडू लहानपणीच मिळाले होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे संभाजी राजे लहान असतानाच त्यांच्या शिरावरील मातेचे छत्र हरपले. संभाजी राजे यांचा सांभाळ जीजाऊ माँसाहेबांनी केला. त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांचीही संभाजी राजेंवर खूप माया होती. शिवछत्रपतींनी औरंगजेबाच्या आग्रा भेटीच्या वेळी बाल संभाजींना आपल्याबरोबर नेले. त्यावेळी राजे अवघे 9 वर्षांचे होते. त्याप्रसंगी औरंगजेब हे बाल संभाजी यांना म्हणाले, ‘हमसे डर नही लगता क्या?’ संभाजी चटकन उत्तरादाखल म्हणाले, ‘हम किसीसे डरते नही, बल्की हमे देखकर सामनेवाले डरते है.’ हे उद्गार ऐकून औरंगजेबाची बोलतीच बंद झाली. धाडसीवृत्तीचे हे त्यांचे एक ठळक उदाहरण शिवचरित्रात सुवर्णाक्षरात नोंदले गेले. प्रभू रामचंद्रांनी रावणावर आक्रमण करण्यासाठी वानर सेनेच्या मदतीने सागरावर सेतू बांधला होता. असाच सेतू संभाजी राजेंनी सिद्दी जोहरवर आक्रमण करण्याकरिता मुरुड-जंजिरा किल्ल्यावर चढाई करण्यासाठी बांधला होता. अशा महापराक्रमी संभाजी राजेंना मानाचा मुजरा!

संभाजी राजेंच्या जीवनचरित्रावर व्याख्यान देताना इतिहासकार प्रसाददादा वडके म्हणतात, ‘धर्मवीर संभाजी राजांनी देव-धर्माचे रक्षण करण्यात आपले सारे आयुष्य पणाला लावले.’ त्यांचे राजकीय व आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता, धर्म रक्षा, कुशल प्रशासक या सर्व राज्यकारभाराच्या बाबी पिताश्री छत्रपती शिवाजी महाराजांसमानच होत्या. धर्म अन् देवस्थान रक्षणासंदर्भात त्यांनी सरदारांसाठी एक कडक फर्मान काढले होते ते म्हणजे, ‘धर्म कार्यात खलेल न करणे अन् धर्म समारंभात अंतर पडणार नाही याची पुरेपूर खबरदारी घ्यावी.’

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी मोठय़ा थाटामाटात संपन्न झाला. त्यांना संस्कृतसहित 16 भाषा अवगत होत्या. संभाजी राजे यांचा विवाह येसूबाईंशी झाला. पुढे ‘त्या’ प्रधान मंडळात सदस्या होत्या. संभाजी राजेंच्या अनुपस्थितीत त्या  राज्यकारभार सांभाळत असत. राजे संभाजींच्या कारकीर्दीत मराठी राज्याचा शुभारंभ गोमंतक प्रांतातून सुरू झाला. हळकोळण गावी आढळलेल्या एका शिलालेखावर मराठी अंमलासंबंधी उद्देशून कोरले होते की, ‘आता हे हिंदुराज्य जाहले पासोन…पुढे याप्रमाणेच सकळाही चालवावे, सहसा धर्मकृत्यांना बाधा पोहोचवू नये. जर का करतील त्यांसी महापातक आहे. जो धामधूम करील त्याला स्वामी जीवेच मारीन. राजश्री आबासाहेबांना जे संकल्पित आहे ते चालवावे, हे आम्हास अगत्य.’ अशा स्पष्ट शब्दांत वेगवेगळ्या प्रसंगी फर्मान काढले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या मराठी स्वराज्याला तसूभरही धक्का पोहोचू नये, हा शंभूराजेंचा सर्वस्वी प्रयत्न असे. शंभूराजेंची शिस्त अतिशय करडी होती.

अष्टमंडळातील आण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशव्यांनी महाराजांविरुद्ध कटकारस्थान केल्याबद्दल राजद्रोहाखाली महाराजांनी या दोन्ही जणांना अन् संबंधित सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन मृत्युदंड दिला. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी राजांनी निरंतर 23 वर्षे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात शत्रूंशी समर्थपणे लढा दिला. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवलिंगावर आपला अंगठा कापून रक्ताचा अभिषेक केला होता, तर संभाजी राजांनी स्वराज्यासाठी प्राणार्पण केले. शिवकालीन इतिहासाची सुवर्ण पानं उलटून पाहिली तर शिवरायांचे कर्तृत्व आणि शंभूराज्यांचे हौतात्म्य या दोन गोष्टींचे प्रकर्षाने स्मरण होते. ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा क्षत्रिय बाणा जपून औरंगजेबासारख्या जुलमी बादशहाकरवी अनन्वित शारीरिक छळ झाला तरी त्या दुष्ट व क्रूर मोगल बादशहासमोर संभाजी राजांनी आपली मान तुकवली नाही, उलट हौतात्म्य पत्करले. त्यांच्यासह कवी कलश यांचाही अतोनात छळ करून औरंगजेबाने जीव घेतला.

शूरवीर, कर्तव्यदक्ष, मुत्सद्दी, करारी बाणा असलेले, कुशल प्रशासक, विद्वान, संस्कृत भाषेचे प्रकांडपंडित, शिस्तप्रिय, मातृभूमीचे पाईक, निस्सीम देशप्रेमी, जाज्वल्य राष्ट्राभिमानी असे  बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना आपण सर्व नतमस्तक होऊया. संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे भीमा, इंद्रायणी, भामा,आंद्रा, सुधा या पंचगंगेच्या त्रिवेणी संगमावर त्यांचे समाधी स्थळ उभारले आहे. मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन आणि मानाचा मुजरा!

आपली प्रतिक्रिया द्या