लेख – छत्रपती शिवाजी महाराज – एक महान योद्धे!

13976

>> डॉ. उदय धुरी

युद्धनीती निपुण, कर्तव्यनिष्ठ आणि जनतेवर पितृतुल्य प्रेम करणारा राजा म्हणून छत्रपती शिवरायांची ओळख आहे. शून्यातून हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणारा एक महान योद्धा म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिले जाते. अशा गौरवशाली शिवरायांचा पराक्रम हिंदूंनी जाणून घेतल्यास हिंदूंमध्ये धर्मप्रेम निर्माण झाल्याविना राहणार नाही. आज शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने…

छत्रपती शिवाजीराजे ज्या प्रदेशात युद्ध खेळले, त्या प्रदेशाची त्यांना पूर्ण माहिती होती. दख्खनमधील डोंगर, नद्या, नाले कसे आहेत, दुर्ग आणि घाटवाटा कशा आहेत, याचा अभ्यास त्यांनी केला होता. एवढेच नव्हे, तर नकाशेही काढले होते. अफझलखानाच्या वधासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी जागा निवडणे, मावळ्यांना कुठे लपवून ठेवायचे, शामियाना कुठे उभारायचा याचा अभ्यास महाराजांनी बारकाईने केला होता. जावळीच्या मोऱयांना अद्दल घडवताना ज्या जंगलात सूर्यकिरण पोहोचत नव्हते अशा घनदाट जंगलात शिरून शिवरायांच्या मावळ्यांनी त्यांचा निप्पात केला. लाल महालात शिरून शाहिस्तेखानाची छाटलेली बोटे हा तर शिवरायांच्या कुशल युद्धनीतीचाच नमुना आहे.

माहिती असण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखाते महाराजांकडे होते. विश्वासराव नानाजी दिगे, बहिर्जी नाईक, सुंदरजी प्रभूजी अशी त्यांच्या हेरांची नावे मिळतात. शिवाजीराजांचे हेर बिहारमध्ये भेटल्याची नोंद समकालीन इंग्रज प्रवाशांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जेव्हा सुरत लुटले, तेव्हा त्या शहराची बित्तंबातमी बहिर्जी नाईक यांनी काढून आणली होती. ‘‘सुरत मारिलीयाने अगणित द्रव्य सापडेल’’ असा सल्लाही त्यांनी महाराजांना दिला होता. सुरतेत किती पैसा दडलेला आहे याची माहिती बहिर्जी नाईक यांनी आधीच काढून आणली होती. त्यामुळे सुरतेच्या स्वारीत वेळ वाया गेला नाही.

सैन्य राखायचे म्हणजे संपत्ती हवी. प्रदेश संपादन करणे आणि त्याचे संवर्धन करणे यासाठी सैन्य हवे. ते सांभाळायचे म्हणजे द्रव्य हवे. त्यासाठी सुरतेसारख्या शहरातील गडगंज संपत्तीची लूट केली. चौथाई आणि गावखंडी यांसारखे करही होते. गोव्यानजीकच्या बारदेशावर गावखंडी कर लावल्याची कागदपत्रांतून नोंद आहे. शिवाजीराजे यांचे हे अर्थकारण फारच बलवान होते.

शिवरायांच्या युद्धनीतीचे बारकावे

अकस्मात आक्रमण – अकस्मात आक्रमण (हल्ले) हा शिवाजीराजांच्या डावपेचांचा गाभाच होता. शाहिस्तेखानावरील विस्मयकारक छापा हा त्या आक्रमणातील कळसच होता. शिवाजीराजांच्या या आक्रमणानंतर तीन वर्षे पुण्यात असलेला खान त्याची एक लक्षाची फौज घेऊन अवघ्या तीन दिवसांत गाशा गुंडाळून चालता झाला.

गनिमी कावा – शिवाजीराजांनी लढण्यासाठी आपली एक खास शैली शोधून काढली. यालाच ‘गनिमी कावा’ म्हणतात. ही शिवरायांची स्वराज्याला मिळालेली फार मोठी देणगी आहे. डेनिस किन्केडने म्हणूनच त्यांना ‘द ग्रँड रिबेल’ असे म्हटले. अकस्मात छापा, तोही आपल्याला सोयिस्कर अशा जागेवर, स्वतःची न्यूनतम (कमीतकमी) हानी आणि प्रतिपक्षाची साधेल तेवढी अधिक हानी ही या गनिमी काव्याची तत्त्वे होती. अर्थात हे तंत्र जरी शिवाजीराजांनी जोपासले आणि मोठय़ा प्रमाणावर वापरले तरी त्याचे प्रवर्तक शहाजीराजे होते.

बहाद्दूरगडावरील चाल – मराठी बुद्धिमत्तेचा एक अस्सल नमुना शिवाजी महाराजांनी आलमगीराच्या दख्खनच्या सुभेदारास दाखवला. पुण्यापासून 24 कोसांवर भीमेच्या काठी बादशहाचा सरदार बहादूरखान कोकलताश जफरजंग हा किल्ला बांधून राहत होता. नऊ सहस्रांची फौज घेऊन महाराजांचा सेनाधुरंधर पेडगावच्या दिशेने निघाला. याचे नाव अज्ञात आहे; पण बहुधा ते हंबीरराव मोहिते असावेत. आपल्या फौजेचे त्यांनी दोन भाग केले. दोन हजारांची एक पलटण बहादूरगडावर धावून गेली. मोगल फौज येत आहे हे पाहिल्यावर मराठी तुकडी पळत सुटली. हुलकावण्या मारीत त्या मराठी फौजेने मोगल फौजेला फार दूर नेले. बहादूरखान चिडून मराठी फौजेचा पाठलाग करत राहिला. खान फार दूरवर गेला आहे याची बातमी हेरांनी आणल्यावर सात हजारांची दुसरी मराठी पलटण बहादूरगडावर चालून आली. पाचोळा कुठल्या कुठे उडाला आणि मराठय़ांनी मोगली छावणीची मोठी लूट केली. एक कोटीचा खजिना आणि 200 अरबी घोडे अलगद हाती आले. एवढी मिळकत (कमाई) झाल्यावर मराठय़ांनी मोगल छावणी पेटवून दिली. पेडगावची छावणी कापरासारखी जळून खाक झाली. सर्व लूट घेऊन मराठे पसार झाले. हे होते शिवरायांचे युद्धतंत्र!

शिवाजीराजे आग्य्राच्या कैदेत असताना त्यांच्या भीतीने औरंगजेबाने आग्य्राच्या किल्ल्यातून समोरच असलेल्या जामा मशिदीत नमाज पठण करण्यासाठी जाताना प्रचंड संरक्षक व्यवस्था (बंदोबस्त) ठेवली होती. याचे त्या वेळी सर्वांनाच आश्चर्य वाटले होते; पण शिवाजीराजांच्या भीतीपोटी तो असे करत असे याचा उल्लेख राजस्थानी पत्रात आहे.

रॉबर्ट आर्म याने म्हटले आहे, ‘‘उत्तम सेनापतीला आवश्यक असणारे सर्व गुण शिवाजीराजांमध्ये होते. शत्रूसंबंधी बातम्या मिळवण्यात त्यांनी कोणतीही कसूर केली नाही. मोठी रक्कम ते यासाठी खर्च करत असत. कोणत्याही मोठय़ा संकटांचा त्यांनी धैर्याने आणि युक्तीने सामना केला. त्या काळातील सेनानींमध्ये ते सर्वश्रेष्ठ होते. हातात तलवार घेऊन आक्रमण करणारे शिवाजीराजे ही त्यांच्या सैन्याची प्रेरणा होती. त्यांचे युद्धनेतृत्व हे त्यांच्या सैन्याचे चैतन्य होते.

आज धर्माभिमान लोप पावत असलेल्या हिंदूंमध्ये पुन्हा हिंदू तेज निर्माण होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रेरणादायी आहे. हिंदूंनी केवळ शिवरायांचा जयघोष करण्यापेक्षा त्यांचे गुण आत्मसात करायला हवेत. तरच खऱ्या अर्थाने शिवरायांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकेल.

 (लेखक हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या