
प्रा. सतीश कुमार
दुसऱ्या देशांना लाचार म्हणणारा चीन आता स्वतःच कोरोना महासाथीच्या वेढय़ात अडकला आहे. चीनचा अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. व्यापारी भागीदार निघून जात आहेत. अमेरिका चीनच्या हात धुऊन मागे लागला असून हा राजकीय संघर्ष युद्धामध्ये परावर्तित होऊ शकतो. याच स्थितीचा आता हिंदुस्थानने लाभ उचलायला हवा. चीनच्या भिंतीवर उभे राहून एक चीन धोरणाचा आम्ही पुनर्विचार करू असे सांगण्याची वेळ आली आहे. हिंदुस्थानची रणनीती धारदार असून त्याला जागतिक पाठिंबादेखील आहे.
स्वतंत्र हिंदुस्थानच्या परराष्ट्र धोरणाने चीनला डोक्यावर बसविले आणि चीन हा हिंदुस्थानचा मोठा हितचिंतक आहे असे मानले गेले. दोन्ही देशांचा सांस्कृतिक वारसा आणि सामरिक समीकरण सारखेच आहे. आपण तिबेटच्या मुद्दय़ावर त्याची सुरुवात केली आणि तैवान मुद्दय़ापर्यंत घसरत गेलो. तसेच 1962 मध्ये चीनचे आक्रमण सहन केले. शी जिनपिंगच्या नेतृत्वाखाली चीन आणखी आक्रमक झाला आहे, असे सांगण्यात आले, पण चीनची खोटी महाशक्ती आजघडीला जगासमोर आहे. दुसऱ्यांना तुच्छ लेखणारा चीन आज कोरोनामुळे अडचणीत आला आहे. अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजत आहेत. देशातून कंपन्या बाहेर जात आहेत. अमेरिका नेहमीप्रमाणे चीनच्या हात धुऊन मागे लागली आहे आणि त्याची परिणिती युद्ध भडकण्यात होऊ शकते. याच स्थितीचा आता हिंदुस्थानने लाभ उचलायला हवा. चीनच्या भिंतीवर उभे राहून एक चीन धोरणाचा आम्ही पुनर्विचार करू असे सांगण्याची वेळ आली आहे. हिंदुस्थानची रणनीती धारदार असून त्याला जागतिक पाठिंबादेखील आहे.
तवांगच्या मुद्दय़ाकडे दोन दृष्टिकोनांतून पाहिले जात आहे. पहिला म्हणजे चीनची अंतर्गत व्यवस्था चांगली नाही. अध्यक्ष जिनपिंग यांची राजकीय नौका भोवऱ्यात अडकलेली दिसून येते. आपली प्रतिमा ते माओप्रमाणे जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्यक्षात चीनची अर्थव्यवस्था 2013 पासून हेलकावे खात आहे. त्याच वेळी तैवान आणि जपानकडून चीनविषयीचे धोरण आणखीच कडक झाले आहे. कोरोनाच्या आघातामुळे घायाळ झालेल्या चीनची साम्यवादी व्यवस्था नागरिकांच्या रोषाला बळी पडत आहे. अशा वेळी शेजारी देशांशी करण्यात येणारा संघर्ष हा लोकांची दिशाभूल करणारा राहू शकतो. त्यामुळे गलवान संघर्षानंतर चीनने तवांगला टार्गेट केले आहे. दुसरा सिद्धांत म्हणजे चीनकडून हिंदुस्थानच्या क्षमतेचे आकलन करणे आणि राजनैतिक धोरणाची पडताळणी करण्याची राहू शकते. हिंदुस्थानी लष्कर आणि राजकीय व्यवस्था किती सजग आणि मजबूत आहे, हे चीनकडून वेळोवेळी पाहिले जाऊ शकते. डोकलाम, गलवान आणि पुन्हा तवांगच्या घटना या गोष्टीला दुजोरा देतात. चीनला युद्ध नकोय, परंतु हिंदुस्थान कितपत तयार आहे हे चीनला जाणून घ्यायचे आहे.
हिंदुस्थान आणि चीनचा सीमावाद सुमारे 3 हजार 488 चौरस किलोमीटरचा आहे, तर चीन केवळ 2 हजार चौरस किलोमीटरपर्यंतच वाद असल्याचे मानतो. हा वाद तीन भागांत विभागला आहे. ताबा रेषांचे सीमांकन प्रामुख्याने जमीन स्तरांवरचे आहे, पण सध्या तलावावरून वाद निर्माण झाला असून वर्षातील असंख्य महिने तेथे बर्फ असल्याने तेथे आखणीसाठी स्केटिंगचा प्रयोग केला जातो. तलावाचा 45 किलोमीटर भाग हा हिंदुस्थानच्या हद्दीत येतो तर उर्वरित चीनच्या. हिंदुस्थानने गस्त आणि सजगता लक्षात घेता रस्त्याची निर्मिती केली असून त्यामुळे चीनचा तिळपापड झाला आहे. मात्र चीनने खूप वर्षे अगोदरच रस्त्याची निर्मिती केली असून त्या भागात तो गस्त घालत आहे. 2013 च्या हिंदुस्थान-चीन चर्चेत सीमेवर शांतता प्रस्थापित करणे आणि चर्चेतून वाद मिटवण्याबाबत एकमत करण्यात आले होते. असे असताना चीनमध्ये अचानक अस्वस्थता का वाढली? जगात सध्या एक चर्चा सुरू असून शक्तीचे स्थानांतर पश्चिमेकडून पूर्वेकडे होत आहे, असे म्हटले जात आहे. म्हणजे अमेरिकेच्या वर्चस्ववादाचे दिवस आता गेले. पूर्वेकडे शक्ती येणे याचा अर्थ ही संपूर्ण शक्ती चीनजवळच एकवटली जाईल असे नाही. या शक्तीचे विभाजन होईल. ही शक्ती हिंदुस्थान आणि चीनमध्ये विभागली जाईल. तसेच जपानदेखील यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
मात्र यासाठी हिंदुस्थानला तिबेटबाबतचा विचार बदलावा लागेल. चीन हा स्वतः नियुक्त दलाई लामाला पुढे आणू इच्छित आहे. त्यांच्यासाठी तिबेटचे प्रकरण ही डोकेदुखी आहे. हिंदुस्थानकडे एक मजबूत राजकीय नेतृत्व आहे आणि त्याच्या परराष्ट्र धोरणात जोखीम उचलणे आणि सहन करण्याची क्षमता विकसित झाली आहे. चीन हा अर्थव्यवस्था आणि सैन्यबळात हिंदुस्थानपेक्षा पुढे आहे. तरीही हिंदुस्थानला त्याचा फायदाच होणार आहे. आज हिंदुस्थानकडे अमेरिकेचे पूर्ण समर्थन आहे आणि जपानदेखील हिंदुस्थानसमवेत आहे. गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची. चीनचे धोरण आजही माजी अध्यक्ष डेंग यांच्या काळातले आहे… ‘शत्रूंना आव्हान द्या, यावर शत्रूंनी तुम्हाला आव्हान दिले तर मागे फिरा.’ जेव्हा चीन हा महाशक्ती म्हणून नावारूपास येईल तेव्हा हिंदुस्थानच्या हातून ही गोष्ट निसटलेली असेल.
1950 ते 1972 पर्यंत वैचारिक विरोध होता. मात्र 2016 ते 2022 या काळात वास्तविक संघर्ष पाहावयास मिळत आहे. अमेरिका ही कोणत्याही स्थितीत चीनला जगाचा नायक होऊ देणार नाही. या आघाडीवर अमेरिकेला जर कोणी मदत करण्याच्या स्थितीत असेल तर तो हिंदुस्थान. याआधारे चीनच्या वेगाला वेसण घालता येऊ शकते आणि यासाठी तिबेटसारखा आणखी चांगला मुद्दा दुसरा कोणताच असू शकत नाही. कोणत्याही रणनीतीत वेळ आणि परिस्थिती यांची प्रमुख भूमिका असते. बाण वेळेवर सुटला नाही तर तो स्वतःसाठीदेखील घातक ठरू शकतो. त्यामुळे अनेक दशकांपूर्वी हिंदुस्थान सरकारने पेलेल्या चुका आता सुधारण्याची ही वेळ असून ती काळाची गरजही आहे. चीनचा प्रमुख संघर्ष हा हिंदुस्थानशीच असणार आहे.
(लेखक आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)



























































