
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
चीनची लष्करी तंत्रज्ञान महासत्ता म्हणून असलेली प्रतिमा आता पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अलीकडच्या काही संघर्षांमध्ये चीनने पुरवलेली संरक्षण यंत्रणा अपयशी ठरल्याने त्यातील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. बीजिंगने प्रगत आणि विश्वासार्ह म्हणून प्रसिद्ध केलेली हवाई संरक्षण उपकरणे पाकिस्तान, व्हेनेझुएला आणि अलीकडे इराणमधील मोठय़ा लष्करी कारवाया रोखण्यात अपयशी झाली आहेत. चिनी यंत्रणा जाहिरात केल्याप्रमाणे तंत्रज्ञानाने प्रगत असलेल्या शत्रूंसमोर टिकत नाही.
अनेक वर्षांपासून चिनी नेत्यांनी लष्करी संचलन आणि संरक्षण प्रदर्शनांमध्ये ‘HQ-9B’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आणि संबंधित रडार तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले होते. ही प्रणाली एकाच वेळी अनेक लक्ष्यांचा मागोवा घेण्यास आणि त्यांचा नाश करण्यास सक्षम असलेली एक शक्तिशाली लांब पल्ल्याची संरक्षण ढाल म्हणून विकली गेली. मात्र, अलीकडच्या लष्करी कारवायांनी या दाव्यांबद्दल शंका निर्माण केली आहे.
‘HQ-9B’, ज्याला ‘रेड फ्लॅग 9’ (Red Flag 9) म्हणूनही ओळखले जाते, ही चीनची प्रमुख लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली मानली जाते. चायना एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉर्पोरेशनने विकसित केलेली ही प्रणाली अमेरिकेची ‘पेट्रियट’ आणि रशियाची ‘ए-300’ या यंत्रणांकडून प्रेरणा घेऊन तयार केली आहे. या प्रणालीमध्ये प्रगत रडार ट्रकिंग, इलेक्ट्रॉनिक काऊंटर मेझर्स आणि एकाच वेळी अनेक हवाई लक्ष्यांशी लढा देण्याची क्षमता आहे. हे 260 किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्यात आणि अंदाजे 50 किलोमीटर उंचीवर विमाने, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये चिनी क्षेपणास्त्रांचा सलग चार दिवस पराभव झाला. ते कशाचाही बचाव करण्यास, नाश करण्यास किंवा मागोवा घेण्यास असमर्थ ठरले. पाकिस्तान हा चीनचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र ग्राहक असून तो आपल्या लष्करी आयातीपैकी सुमारे 82 टक्के वाटा बीजिंगकडून घेतो. त्यामुळे या घटनेने चिनी संरक्षण उपकरणांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेच्या नाटय़मय लष्करी कारवाईदरम्यान चिनी संरक्षण तंत्रज्ञानाबद्दलच्या शंका अधिक गडद झाल्या. या मोहिमेदरम्यान अमेरिकन सैन्याने स्टेल्थ विमाने, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्लॅटफॉर्म आणि विशेष दलांचा समावेश असलेली एक मोठी मोहीम राबवली. या मोहिमेत कोणताही अमेरिकन बळी न जाता व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांना पकडण्यात यश आले. या मोहिमेने व्हेनेझुएलाच्या रडार आणि हवाई संरक्षण नेटवर्कमधील कच्चे दुवे उघड केले, ज्यामध्ये चीनने पुरवलेल्या ‘JY-27A’ अर्ली वार्ंनग रडार सिस्टमचा समावेश होता. चीनची ‘JY-27’ रडार प्रणाली 280 ते 390 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांची ओळख पटवण्यास आणि स्पॅन करण्यास सक्षम आहे. हे रडार विशेषतः वेगवान, सुपरसॉनिक ‘F-22’ आणि ‘F-35’ फायटर जेट्सच्या शोध घेण्यासाठी ओळखले जाते.
मात्र ही रडार यंत्रणा मोहिमेत सामील असलेल्या विमानांचा शोध घेण्यास अपयशी ठरली. जेव्हा मादुरो यांना व्हेनेझुएलामध्ये पकडण्यात आले, तेव्हा प्रत्यक्ष युद्धात चिनी रडार राष्ट्रीय मानहानी आणि लज्जेचा विषय बनले. व्हेनेझुएलाच्या हवाई हद्दीत घुसलेल्या 150 विमानांपैकी एकाचाही शोध घेण्यात ते अपयशी ठरले. या घटनेने बीजिंगच्या संरक्षण उद्योगाला मोठा धक्का बसला, विशेषतः कारण ‘JY-27A’ रडार स्टेल्थ विमानांचा शोध घेण्यास सक्षम असल्याचा प्रचार केला गेला होता.
चीनशी संबंधित हवाई संरक्षण क्षमतेची परीक्षा सर्वात अलीकडील इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या मोठय़ा हल्ल्यांदरम्यान झाली. इराणमधील वीसपेक्षा जास्त प्रांतांमधील लष्करी पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक प्रतिष्ठानांना लक्ष्य करून समन्वित हवाई हल्ले करण्यात आले, ज्यामुळे व्यापक नुकसान झाले आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले. इराणची हवाई संरक्षण यंत्रणा थरांमध्ये (Layers) काम करण्यासाठी तयार केली होती. लांब पल्ल्याचा स्तर चिनी ‘HQ-9B’ प्रणालीवर आधारित होता, ज्याला रशियन ‘S-300PMU-2’ आणि इराणच्या स्वदेशी ‘बावर-373’ (Bavar-373) प्लॅटफॉर्मचा पाठिंबा होता. ‘खोरदाद-15’ आणि ‘राद’सारख्या मध्यम पल्ल्याच्या प्रणाली उर्वरित त्रुटी भरून काढतील अशी अपेक्षा होती, तर ‘तोर-एम2’ (Tor-M2) आणि ‘पान्ट्सिर-एस1’सह (Pantsir-S1) कमी पल्ल्याच्या प्रणाली कमी उंचीवरून येणारे धोके रोखण्यासाठी होत्या. ही बहुस्तरीय संरक्षण रचना असूनही हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाले.
इराणमधील ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’दरम्यान (Operation Epic Fury) चिनी HQ-9B क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा पुन्हा एकदा पराभव झाला. आधुनिक हवाई मोहिमा अनेकदा ‘सॅच्युरेशन टॅक्टिक्स’वर अवलंबून असतात, ज्यामध्ये डझनभर किंवा शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन एकाच वेळी सोडले जातात. अशा परिस्थितीत प्रगत हवाई संरक्षण यंत्रणांनाही संघर्ष करावा लागू शकतो. दुसरी शक्यता अशी आहे की, मुख्य हल्ला सुरू होण्यापूर्वीच इलेक्ट्रॉनिक युद्ध, सायबर ऑपरेशन्स आणि स्टेल्थ विमानांनी रडार यंत्रणा आणि कमांड नोड्स निकामी केले.
चीन हा जगातील सर्वात मोठय़ा शस्त्रास्त्र निर्यातदार असून आशिया, आफ्रिका, मध्यपूर्व आणि लॅटिन अमेरिकेत लष्करी उपकरणांची विक्री करत आहे. पाकिस्तान, इराण, इजिप्त आणि अझरबैजान यांसारख्या देशांनी अलीकडच्या वर्षांत चिनी हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केली आहे. काही वर्षांपूर्वी इजिप्त, अझरबैजान, पाकिस्तान आणि इराणसारख्या देशांनी चिनी हवाई संरक्षण यंत्रणेवर अब्जावधी खर्च केले होते. आज त्यांना त्याचा पश्चात्ताप होत आहे. अनेक खरेदीदारांसाठी चिनी उपकरणांची निवड करण्यात कमी किंमत हा एक मोठा घटक होता. चिनी प्रणाली ‘पेट्रियट’ किंवा प्रगत युरोपियन प्लॅटफॉर्मसारख्या पाश्चात्त्य पर्यायांपेक्षा स्वस्त असतात, परंतु कमी किंमत विश्वासार्हता आणि तांत्रिक परिपक्वतेचा बळी देऊन मिळते.
पाकिस्तान, व्हेनेझुएला आणि इराणमधील घटनांनी तैवानलाही आशेचा किरण दाखवला आहे. चीनने आपली विश्वासार्हता गमावली आहे आणि त्याची शस्त्रास्त्रांची स्पर्धा आता तितकी भीतिदायक राहिलेली नाही. अमेरिकेच्या तुलनेत चिनी युद्ध तंत्रज्ञान आणि रडार अविश्वसनीय, असुरक्षित आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध झाले आहे.
चिनी संरक्षण यंत्रणांच्या प्रभावितेवरची चर्चा अधिक तीव्र होणारआहे. या प्रणालींच्या रणांगणावरील कामगिरीमुळे चीनचा संरक्षण उद्योग अभूतपूर्व छाननीच्या कचाटय़ात सापडला आहे. जगात विविध भागांमध्ये चाललेली युद्धे भारताकरिता एक संधी आहे. भारताची शस्त्रे युद्धजन्य परिस्थितीमध्ये चीनपेक्षा जास्त चांगले काम करतात, हे आपण दाखवून देऊ शकतो. याकरिता भारताची शस्त्रे आणि दारूगोळ्याची निर्यात वेगाने वाढवण्याची गरज आहे.































































