
>> जे.डी. पराडकर
एखाद्या छोटया कार्यक्रमातील असो वा छोटया पडद्यावरील नृत्य कार्यक्रमात दिग्दर्शन करणे वेगळे आणि हजारो प्रेक्षकांच्या साथीने प्रत्यक्ष खेळाच्या मैदानावर नृत्य दिग्दर्शन करणे वेगळे. दोन्हींचे प्रकार एकच असले तरी त्यातील आव्हान मात्र वेगळे असते. कोकणचा सुपुत्र देवेंद्र शेलारने या क्षेत्रात आपल्या दमदार परफॉर्मन्सने सर्वांचीच मने जिंकून घेतली आहेत. सुरुवातीला छोटया मोठया कार्यक्रमात ग्राऊंड कोरिओग्राफी करणारा देवेंद्र क्रिकेट, फुटबॉलपाठोपाठ आता हॉकीच्या मैदानावरही चमकला आहे. ओडिशातील भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत देवेंद्रने आपल्या चमकदार कामगिरीने रसिकांची मने जिंकली आहेत.
देवेंद्र शेलार हा मूळचा रत्नागिरी जिह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील सांगवे गावाचा रहिवासी. वडील मुंबईत नोकरीसाठी वास्तव्याला गेले आणि देवेंद्रचे बालपणासह तरुणपण मुंबईत गेले. सर्व शिक्षणसुद्धा त्याने मुंबईतच पूर्ण केले. मराठीतील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारे ही देवेंद्रची सख्खी मोठी बहीण. तिच्याच प्रेरणेने तो या क्षेत्राकडे आकर्षिला गेला. सुरुवातीला तिच्यासह छोटे मोठे कार्यक्रम करताना 1994 साली पुण्यात झालेल्या नॅशनल गेम्सच्या कार्यक्रमात देवेंद्रला छोटेखानी संधी मिळाली. त्याआधी तो सलग 10 वर्षे पुण्यातील मानाच्या गणेशोत्सवात सादर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये नृत्य दिग्दर्शन करीत होता. त्यानंतर हैदराबाद येथे 2000 साली झालेल्या नॅशनल गेम्ससाठीही त्याने हे काम केले. 2003 मध्ये हैदराबाद येथे झालेले आफ्रो-एशियन गेम्स, 2004 साली झालेले आसाम नॅशनल गेम्स, 2006 साली ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचा समारोप, 2008 साली झालेल्या पुणे येथील युथ कॉमनवेल्थ गेम्स अशा ठिकाणीही देवेंद्रने आपल्या ग्राऊंड कोरिओग्राफीने रंगत आणली होती. दिल्ली येथे सन 2010 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोपाच्या समारंभात त्याने आपली छाप पाडली. सन 2015 साली दिल्लीत झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात देवेंद्रला थेट तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांसमोर चमकण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्याने या क्षेत्रात मागे वळून पाहिले नाही. इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी विझक्राफ्टसाठी तो काम करतो. हिंदीतील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक श्यामक दावर यांच्या सोबत तो या क्षेत्रात काम करतो. आपल्या सर्व यशाचे श्रेय तो बहीण आणि सहकाऱ्यांना देतो.
आयपीएलमधील सादरीकरण
आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमध्ये बीसीसीआयच्या आयपीएलची मोठी क्रेझ आहे. आयपीएलने 10 वर्षे पूर्ण केली आणि त्याच वर्षी देवेंद्रला आयपीएलमध्ये चमकण्याची संधी मिळाली. बीसीसीआयने आयपीएलच्या दशकपूर्तीनिमित्ताने एप्रिल 2017 मध्ये देशातील वेगवेगळ्या 10 ठिकाणी उद्घाटन सोहळा केला. त्यातील तब्बल चार ठिकाणच्या कार्यक्रमात देवेंद्रने ग्राऊंड कोरिओग्राफी केली.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा कलावंत रितेश देशमुख आणि सुप्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडेच्या कार्यक्रमावर मैदानात जी मराठमोळी संस्कृती अवतरली तिचे दिग्दर्शन देवेंद्रने केले होते. त्याच्या नृत्य दिग्दर्शनाचे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आणि पुण्याचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने त्यावेळी विशेष कौतुक केले. 10व्या पर्वातील उत्तम कलाकारीनंतर आयपीएलच्या 11 व्या सीझनमध्येही देवेंद्रने आपली छाप पाडली. सिनेस्टार हृतिक रोशन, प्रसिद्ध डान्सर प्रभुदेवा, वरुण धवन, गायक मिका, अभिनेत्री जॅकलिन, ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना आदी दिग्गजांच्या साथीने त्याने स्टेजवर 200 तर ग्राऊंडवर 800 नृत्य कलाकारांचे दिग्दर्शन करीत आपल्यातील कलाकार अखंड जगाला दाखवून दिला.
मैदानावरही चमक
आयपीएलच्या दोन सत्रातील चमकदार कामगिरीनंतर देवेंद्रला शिलाँग मेघालय मिशन फुटबॉल स्पर्धेत चमक दाखवण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत 14 आणि 17 वयोगटाखालील तब्बल 1200 खेळाडूंना बरोबर घेत सहकाऱ्यांच्या साथीने मैदानावर मिशन फुटबॉलची अक्षरे तयार करून रसिकांची मने जिंकली. या स्पर्धेने त्याला फुटबॉल स्पर्धेतील ग्राऊंड कोरिओग्राफीची दारे उघडली.
अखंड जगातील करोडो हॉकीप्रेमींसाठी पर्वणी ठरणारी पुरुषांची हॉकी विश्वचषक स्पर्धा सध्या ओडिशात सुरू आहे. क्रिकेट, फुटबॉलपाठोपाठच हॉकीसारख्या राष्ट्रीय खेळातील विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्यात नृत्य दिग्दर्शन करण्याचा मान देवरूखचा सुपुत्र देवेंद्र शेलारला मिळाला. तब्बल 1100 कलाकारांसह ओडिशातील कलिंगा स्टेडियमवर त्याने आपल्या दिग्दर्शनाची छाप पाडली. या कार्यक्रमात देवेंद्रने मास कास्ट कोरिओग्राफी केली.

























































