रंगपट – ‘सोनिया’चे लक्षण…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शब्दांकनः राज चिंचणकर

शास्त्रीय नृत्यांगना व अभिनेत्री सोनिया परचुरे सांगत आहेत काही हृदयस्पर्शी आठवणी…

गेली 30 वर्षे मी नृत्याचे सादरीकरण करत आहे. या प्रवासात असे अनेक क्षण आले की, जे थेट हृदयाला स्पर्श करून गेले. कधी कधी असे वाटते की, या क्षणासाठीच आपण थांबलो होतो का आणि तो क्षण आला की, खरेच काही समजत नाही. अलीकडेच मी लॅटिन अमेरिकेत ‘ग्वाटेमाला’ला कार्यक्रम सादर करण्यासाठी गेले होते. तिथल्या लोकांची मातृभाषा, बोलीभाषा, सामाजिक भाषा ही स्पॅनिश आहे. त्यांचा इंग्लिशशी फारसा संबंध येत नाही. तिथे जाऊन कथ्थक नृत्याचे हिंदी भाषेतले दणकावून 11 कार्यक्रम आम्ही करून आलो.

कार्यक्रमाची प्रस्तावना आणि इतर काही बाबी व त्या कार्यक्रमाची गोष्ट कळण्यासाठी आम्ही स्पॅनिश भाषेत प्रेक्षकांना सांगत होतो, पण आम्हाला मिळालेला प्रतिसाद पाहून मला तर अक्षरशः रडायला यायचे. तिथली सगळी थिएटर्स जुन्या काळातली, म्हणजे मुंबईत जसे ऑपेरा हाऊस आहे तशी त्यांची ती दीडशे-दोनशे वर्षांपूर्वीची थिएटर्स होती. त्या लोकांसमोर कार्यक्रम सादर करण्याचा अप्रतिम अनुभव होता. हिंदुस्थान आणि ग्वाटेमाला यांच्यातल्या ‘कल्चरल रिलेशन’ला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही तिथे गेलो होतो. हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करताना प्रचंड अभिमान वाटत होता. प्रत्येक कार्यक्रमावेळी त्यांचे व आपले राष्ट्रगीत वाजायचे आणि मग कार्यक्रमाला सुरुवात व्हायची. राष्ट्रगीत वाजत असताना अक्षरशः हृदय भरून यायचे. अनेकदा जेव्हा आपण आपल्या देशाचा एखादा खेळ बघत असतो आणि त्यात आपल्या एखाद्या खेळाडूला सुवर्णपदक मिळाल्यानंतर जेव्हा आपले राष्ट्रगीत वाजते त्या वेळी जसा अभिमानाने उर भरून येतो अगदी तसेच माझ्या कार्यक्रमात आपले राष्ट्रगीत वाजले की व्हायचे. मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करतेय याचा खूप अभिमान वाटायचा.

मी गुरुजींकडे म्हणजे तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे लय-तालाचे शिक्षण घेते. त्यांच्याकडे शिकल्यानंतरचा ठाण्यातला माझा पहिलाच परफॉर्मन्स होता. माझ्या नृत्यवर्गाच्या साधारण दोनशे विद्यार्थिनी, त्यांचे पालक, हितचिंतक वगैरे अशी प्रचंड गर्दी होती. गुरुजींनी शिकवलेले नृत्य मी प्रथमच तिथे सादर करणार होते. कथ्थक नृत्यामध्ये नृत्य सादर करताना त्याचे बोल कुणीतरी पढंत करावे लागतात. ते कोण करणार, माझ्याबरोबर साथीला कोण असणार, अशी सगळी तयारी वास्तविक झाली होती. त्याच वेळी माझ्याबरोबर पढंत करणारी जी मुलगी होती तिला गुरुजींनी बाजूला केले आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, ‘‘मी बसतो पढंत करायला.’’ त्या क्षणाचे वर्णनच मी करू शकत नाही. म्हणजे याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद तो काय असू शकतो.  साक्षात स्फूर्तीदेवताच म्हणते की, मी स्फूर्ती द्यायला सोबत आहे. आमचे गुरुजी म्हणजे स्फूर्तीचा, ऊर्जेचा जिवंत झरा आहे. ते त्या वेळी म्हणाले, ‘‘मी झरा म्हणून इथे बसतो. तुला हवे तितके त्यात न्हाऊन घे.’’ हा क्षण असा होता की, जो मी कधीच विसरू शकणार नाही.

     एकदा माझा शीवला शुद्ध शास्त्रीय नृत्याचा सोलो कार्यक्रम होता. ते स्टेज बंदिस्त होते, पण प्रेक्षकांसाठी मात्र खुली जागा होती. त्याच्या बाजूला एका बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन काम सुरू होते. प्रचंड आवाज सुरू होता. आम्ही विचारात पडलो की, आयोजकांनी अशा स्थितीत कसा कार्यक्रम आयोजित केला. पण मी ठरवले की, आपण आपल्या गुरूंचे व देवाचे नाव घ्यायचे आणि आपल्याला जे काही शिकवले आहे, आपण जे ठरवून आलो आहोत ते इमानेइतबारे सादर करायचे. मी कार्यक्रमाला सुरुवात केली. अनेकदा असे म्हटले जाते की, संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत. हे ‘क्लासेस’साठी आहे, ‘मासेस’साठी नाही. पण तिथे आश्चर्याची गोष्ट अशी घडली की, त्या बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनचे काम थांबवून तिथे काम करणारी मंडळी कमी उंचीच्या त्या कंपाऊंड वॉलवर बसून माझा कार्यक्रम शांतपणे पाहत होती. हा अत्यंत हृदयस्पर्शी क्षण होता. कारण असे म्हटले जाते कुठलीही अभिजात कला ही इतकी सुंदर असते की ती तुम्हाला समजवावी लागत नाही, तर ती तुम्हाला जाणवावी लागते. मग अशा वेळी समोरची व्यक्ती ‘क्लासेस’मध्ये मोडत असो किंवा ‘मासेस’मध्ये मोडत असो, त्याने काही फरक पडत नाही. ‘या हृदयीचे त्या हृदयी’ असे ते सर्वकाही असते.