उद्योगविश्व- मातीचा माठ, तांब्या-भांडे अन् चूल…

>> अश्विन बापट

आता उन्हाळा सुरू झाला आहे. काही दिवसांपासून उन्हाची तीव्रताही वाढली आहे. उन्हाळय़ात थंडावा मिळवण्यासाठी फ्रीजमधले थंड पाण्यापेक्षा माठातले पाणी पिणे हा एक नैसर्गिक उपाय आहे आणि ते केवळ आरोग्यासाठीच नाही, तर पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. देवयानी तांबोळी या ‘मिट्टी हब’ या ब्रँडद्वारे मातीच्या भांड्य़ाच्या व्यवसायाशी आपली नाळ जोडत विविध भांडय़ांची निर्मिती करत आहेत.  

राज्यात पारा आणखी तीन दिवस वाढणार आहे, उष्णतेची लाट येतेय, काळजी घ्या… यासारख्या ब्रेकिंग न्यूज आपण वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर सातत्याने गेले काही दिवस पाहतोय. घामाच्या धारांनी असह्य झालेला हाच उन्हाळा काहीसा सुसह्य करण्यासाठी काही व्यावसायिक मंडळी प्रयत्न करत आहेत. पुण्याच्या देवयानी तांबोळी त्यापैकीच एक. त्यांच्या ‘मिट्टी हब’ या ब्रँडची सुमारे 40 हून अधिक उत्पादनं सध्या बाजारात आहेत. ज्यामध्ये मातीचा माठ, तांब्याभांडं, जार, ग्लासेस, बॉटल्स अशी विविध उत्पादनं उन्हाळय़ात फारच उपयुक्त ठरतील अशी आहेत. या वेगळ्य़ा व्यवसायाबद्दल बोलताना देवयानी म्हणाल्या, मी मूळची बँकर. सात-आठ वर्षं बँकेत नोकरी केल्यानंतर या व्यवसायाकडे वळले. माझ्या मूळ गावी (तेव्हाचं अहमदनगर आणि आताचं अहिल्यानगर) मी नॅचरोपथीचा बेसिक कोर्स केला होता. त्यामुळे मला त्याची माहिती होती. त्याच ज्ञानाचा आणखी उपयोग करून पुढे जावं असं मला वाटलं. त्यात लग्नानंतर मी पुण्यामध्ये आल्यावर हा विचार आणखी पक्का झाला. खरं तर दहा वर्षांपूर्वीपासूनच मी मातीच्या भांड्य़ांवर काम करायला सुरुवात केली होती. बॉटल्स, हंडी… अशी उत्पादनं बनवत होते आणि याच व्यवसायाचा 2021-22 मध्ये विस्तार व्हायला सुरुवात झाली. त्याचे नाव ‘मिट्टी हब’!

नॅचरोपथीचा डिप्लोमा आणि मड थेरपीचाही अभ्यास केल्याने या क्षेत्रात काम करण्याचा माझा विश्वास आणि हुरुप वाढला. मातीची उत्पादनं वापरून उष्णता कमी होते. मातीच्या भांडय़ांचा वापर आरोग्यासाठी चांगला आहे, हा विचार लोकांमध्ये रुजवणं हे काम आधी करायला पाहिजे असं मला आवर्जून वाटलं आणि मी पुण्यामध्ये कात्रजला काही सहकाऱयांच्या मदतीने मातीची उत्पादनं सुरू केली. आजच्या घडीला तीन ते पाच कामगार माझ्याकडे आहेत. याशिवाय पॅकिंग, पेंटिंग, डिलिव्हरीसाठी मी रोजंदारीवर काही मंडळींची पेमेंट करून त्यांची सेवा घेते. कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून राज्याबाहेर कोलकाता, बंगळुरूसारख्या ठिकाणीही आमची प्रॉडक्ट्स पोहोचलीत, तर राज्यामध्ये पुण्यासह मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरसह विविध ठिकाणी आमची उत्पादनं जात असतात.

माठ आणि तांब्या-भांडं ही आमची डिमांडमध्ये असलेली उत्पादनं, याशिवाय मुंबईसारख्या ठिकाणी जिकडे जागा हा भेडसावणारा प्रश्न आहे, तिथल्या छोटय़ा ओटय़ावर आटोपशीर जागेत राहणारी मातीची चूलही चांगलीच मागणीत आहे. आमच्या उत्पादनांबद्दल एक गोष्ट सांगायची म्हणजे या मातीत कॅल्शियम, झिंक, आयर्नचं प्रमाण किती आहे, याचं सर्टिफिकेट मी प्रॉडक्टसोबत देत असते. ज्याने ती वस्तू वापरणाऱयांचा आपल्या उत्पादनांवरचा विश्वास आणखी दृढ होतो. आम्ही सर्टिफाईड क्लेमध्ये काम करतो. मातीच्या भांडय़ांचा वापर वाढला पाहिजे ही जागरुकता वाढतेय, ही चांगली गोष्ट आहे.

आमच्याकडे पाण्याचा वापर करण्यासाठीचे माठ, तांब्या-भांडय़ासारख्या उत्पादनांसोबत जेवणाचे पदार्थ ठेवण्यासाठीचे बाऊल्स, भांडी, कंदील दिव्यांसारखी डेकोरेटिव्ह प्रॉडक्ट्सही आहेत. लाल आणि पांढऱया माती यांच्या मिश्रणाशिवाय नियमित लाल मातीपासूनही आम्ही उत्पादनं तयार करत असतो. याशिवाय अलीकडेच आम्ही क्रॉकरीचं उत्पादनंही सुरू केलं आहे. क्रॉकरी सेटमध्ये 25-30 भांडी असतात. ज्यामध्ये छोटय़ा-मोठय़ा डिश, बाऊल्स यासारखी भांडी आहेत. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या किमती 80 रुपयांपासून ते 10 हजारांपर्यंत आहेत. शिवाय मड थेरपीची किट्सदेखील आम्ही बनवून घेतो. जी डोक्यापासून पायापर्यंत अप्लाय करता येतात.

याशिवाय या मड थेरपीसह इटेबल सॉईलमध्येही आमचं सध्या संशोधन आणि इतर कामं सुरू आहेत. आम्हाला त्यातही आणखी काही उत्पादनं वाढवायची आहेत. ज्यासाठी लागणाऱया  परवानग्या, त्या उत्पादनाची उपयुक्तता हे सगळं आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करणार आहोत, असंही देवयानी यांनी सांगितलं.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर सीनियर न्यूज अँकर आहेत.)