लेख – चिनी ड्रगनला ‘स्वदेशी’चेच उत्तर!

1011

>> अजित कवटकर

चीनसाठी हिंदुस्थान हे ‘डम्पींग ग्राऊंड’ झाले आहे. हिंदुस्थानात ‘मेड इन चायना’च्या वस्तूंना ‘मेक इन इंडिया’पेक्षा अधिक मागणी आहे. मध्यम, लहान आणि कुटीर उद्योगातील अनेक हिंदुस्थानी उद्योगांचे उच्चाटन करण्यास चीनची ही डम्पींग पॉलिसी कारणीभूत ठरत आहे. म्हणूनच अरेरावी करणाऱ्य़ा चिनी ड्रगनला आपणही स्वदेशीचे हत्यार उगारून खणखणीत उत्तर देऊ शकतो. 

असे म्हणतात की, चीनच्या वुहान शहरातील ‘वेट मार्केट’मधून कोरोनाच्या कोविड-9 या विषाणूच्या प्रादुर्भावास सुरुवात झाली. साध्या फ्लूप्रमाणे दिसणाऱ्य़ा त्याच्या लक्षणांमुळे सुरुवातीला तेथील सरकार आणि प्रशासन गाफील राहिले. वादासाठी हे आपण क्षणभर मान्य करु, परंतु या जीवघेण्या कोरोना विषाणूचा संसर्ग जेव्हा रोज हजारोंच्या संख्येने बळी घेऊ लागला, तेव्हा तरी चीनने जबाबदारी दाखवत जगाला सावध करणे अनिवार्य होते. किंबहुना ते त्या देशाचे कर्तव्यच होते. मात्र तसे करण्यात त्यांनी जाणीवपूर्वक विलंब केला. त्यामुळे जे व्हायला नको होते तेच झाले. कोरोना जगभर पसरला आणि आजच्या घडीला रोज लाखोंच्या संख्येने लोक कोरोनाबाधित होत आहेत. जवळजवळ संपूर्ण जग लॉक डाऊनच्या स्थितीत भयावह वातावरणात स्वत:ला इतरांपासून चोरून घेत, घरात कोंडून बसले आहे. ठप्प पडलेले अर्थकारण, उद्भवलेली उपासमार, बेरोजगारी, गरीबी आणि पसरलेल्या भीतीला जबाबदार कोण?

नैसर्गिक प्रक्रियेतून एखाद्या विषाणू वा जिवाणूची उत्पत्ती होऊन जर त्याचा असा संसर्ग एखाद्या देशातून सुरू झाला असता तर त्याबद्दल त्यास इतर कोणीच दोषी ठरवले नसते. परंतु येथे प्रश्न चीनचा आहे. आधीच सार्स या आजाराचा निर्माता चीनच असल्याचा संशय मिटलेला नाही. त्यात आता कोरोना विषाणू कोविड-19 नेदेखील त्याच देशातून येणे हा निव्वळ योगायोग कसा समजता येईल? चीनमधील ‘वुहान इन्स्टिटयूट ऑफ व्हायरोलॉजी’ ही कार्यशाळा कोरोना विषाणूंवर संशोधन करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. कोरोनावरील त्यांच्या ज्ञानाचे, संशोधनाचे प्रभुत्व निर्विवाद आहे आणि म्हणुनच हा मानवनिर्मित विषाणू येथूनच, भले आपण अनवधानाने म्हणू, पण बाहेर पडला, अशी दाट शक्यता आहे. जैविक अस्त्र म्हणुन चीनने अत्यंत नियोजनपूर्वक त्याची निर्मिती केली असल्याचा आरोप आज निराधार वाटत असला तरी त्यादिशेने चौकशी होण्याची अत्यावश्यकता आहे. सर्वच देशांना आज तशी गरज वाटू लागली आहे. यातच चीनची नष्ट झालेली विश्वासार्हता स्पष्ट दिसते.

सारं जग या कोरोना आपत्तीतून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी गुंतलेले आहे. मात्र त्याचवेळी चीनचे नौदल मात्र दक्षिण चीन समुद्रात कवायतींच्या सबबीखाली अधिक आक्रमक होत अग्रेसर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आर्थिक मंदीच्या तडाख्याने कमजोर झालेल्या इतर देशांतील बहुराष्ट्रीय कंपन्यांना आधार देण्याच्या नावाखाली त्यांच्यावर निर्णायक नियंत्रण मिळविण्याचा चीनचा डावदेखील उघड झाला आहे. वरकरणी चीन मदतीचा हात पुढे केल्याचे दाखवत असला तरी तो करीत असलेल्या गुंतवणूकीच्या मनसुब्यांबद्दल संशय घेण्यास पुरेसा वाव आहे. कोरोनापासूनचे संरक्षण करणारे मास्क, पीपीई वगैरेंचा चीन जगाला करत असलेला पुरवठा आणि त्यात हमखास आढळून येत असलेल्या अपायकारक त्रुटी, या जीवावर बेतणाऱ्य़ा ठरत असल्याच्या सार्वत्रिक तक्रारी आहेत. त्यामुळे चीनवर जाणीवपूर्वक हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा केल्याचा आरोप होणे स्वाभाविक आहे. कोविड-19 च्या उत्पत्तीची माहिती मिळविण्यासाठी चौकशी करावी अशी मागणी अमेरिका सातत्याने करीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून वुहानमधील प्रवेशासाठीही अमेरिका चीनकडे सतत मागणी करीत आहे. पण चीन सातत्याने त्याला नकार देत आहे.

हिंदुस्थानच्या विरोधात पाकपुरस्कृत दहशतवादाला पुरस्कृत करण्याचे कामही चीन करत आहे. पाकिस्तानच्या सहाय्याने हिंदुस्थानी सैन्याला उत्तरेत गुंतवून ठेवायचे आणि स्वत: उत्तर-पूर्वेकडून पुढे सरकत हिंदुस्थानी भूमीत अतिक्रमण, घुसखोरी करायची असा चीनचा डाव दिसत आहे. या हालचालीत तो अधिक रस घेत आहे. चीनसाठी हिंदुस्थान हे ‘डम्पींग ग्राऊंड’ झाले आहे. चीनकडून हिंदुस्थानात निर्यात होणारी प्रत्येक वस्तू हिंदुस्थानी उत्पादनाच्या तुलनेत कैक पटीने स्वस्त असते. हिंदुस्थानात ‘मेड इन चायना’च्या वस्तूंना ‘मेक इन इंडिया’पेक्षा अधिक मागणी आहे. मध्यम, लहान आणि कुटीर उद्योगातील अनेक हिंदुस्थानी उद्योगांचे उच्चाटन करण्यास चीनची ही डम्पींग पॉलिसी कारणीभूत ठरत आहे. त्यांचे उद्योग आपल्याकडील उद्योजकता नष्ट करत आहेत. चिनी वस्तूंची विक्री करणारे विक्रेते तयार करण्याचे काम मात्र जोमात सुरु आहे. येथील उद्योगधंद्यात गतीशून्यता निर्माण करण्यात चीन जवळजवळ यशस्वी झाला आहे असे म्हणण्यास वाव आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ते गोपनीय डेटा पळवत आहेत. आपल्या व्यक्तिगत आणि राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अतिशय घातक ठरू शकते. चीनच्या चुकांकडे बोट दाखविण्याची कुणा देशाने धाडस केले तर त्यावर व्यापारी निर्बंध टाकण्याची धमकी देत दबाव टाकण्याचे तंत्र सध्या चीनने अवलंबिले आहे. जागतिक महासत्ता होण्याच्या महत्वाकांक्षेतून चीनने प्रत्येक अंगाने बलाढय, सामर्थ्यशाली केलेले आपले लष्करी सामर्थ्य आज त्या देशाला मुजोर बनवत आहे. कोरोनाच्या निमित्ताने अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया व इतर अनेकांशी त्यांचे चालेले शाब्दिक युद्ध यास पुष्टी देणारे आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चीनवर पडलेला बदनामीकारक प्रकाशझोत हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक व्यवस्थित शिजवलेले कट-कारस्थान आणि राजकारण असू शकते असे गृहीत धरले तरी जगावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची चीनमध्ये निर्माण झालेली बेलगाम व बेधुंद महत्वाकांक्षा आपल्यासारख्या शेजारी देशासाठी अधिक त्रासदायक आणि नुकसानकारक ठरण्याची भीती आहे. हिंदुस्थानचा प्रभाव व प्रभुत्व कमी करण्यासाठी चीन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे.

पाकिस्तान कितीही बेईमान, नालायक असले तरी शेजारधर्म म्हणून त्याच्याबरोबर औपचारिकतेचा भाग म्हणून किमान राजनैतिक संबंध ठेवणे आपल्याला भाग आहे. तीच अनिवार्यता आपल्यासाठी चीनबाबतदेखील असणार आहे. हिंदुस्थान आणि चीन संबंध जर कायमचे आणि खऱ्य़ा अर्थाने सुधारता येण्यासारखे असतील तर तसे होण्यासाठी हिंदुस्थानने पहिले पाऊल टाकण्याची प्राथमिकता जरूर दाखवावी, परंतु चीनची बदललेली वृत्ती पाहता त्यातून काही चांगले निष्पन्न होण्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणूनच अरेरावी करणाऱ्य़ा चिनी ड्रगनला आपणही स्वदेशीचे हत्यार उगारून त्याला त्याची जागा आणि मर्यादा दाखवून देऊ शकतो. त्यासाठी हीच वेळ योग्य आहे. त्यामुळे सुरूवातीला आपली गैरसोय झाली, काही प्रमाणात नुकसान झाले तरी त्यातून स्थानिक उद्योग आणि व्यवसायाला मिळणाऱ्य़ा संधीतून होणारे दूरगामी परिणाम आपल्या देशासाठी नक्कीच अनुकूल असतील.

आपली प्रतिक्रिया द्या