दादाजी खोब्रागडे

दादाजी खोब्रागडे, धान (तांदूळ) संशोधक

>> महेश उपदेव

विदर्भातील एका छोट्या गावात राहणारे दादाजी खोब्रागडे हे खऱ्या अर्थाने कृषी संशोधक होते. एचएमटी तांदळाचे जनक असलेले दादाजी यांनी ‘एचएमटीवाले’ ही ओळखच त्यांच्या कृषी संशोधनाच्या कामाची पावती म्हणावी लागेल. नुकतेच त्याचं निधन झाले. चंद्रपूर जिह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदेड या छोट्य़ाशा गावातील दादाजी यांनी अवघा महाराष्ट्र नव्हे तर देशात आपली ओळख निर्माण केली. त्यांनी एचएमटी तांदळाचे नवनवीन वाण तयार करून हे वाण हिंदुस्थानात प्रसिद्ध केले. खोब्रागडे म्हणजे एका माणसाचे कृषी विद्यापीठ होते. जे राज्यातील कृषी विद्यापीठातील संशोधकांना जमले नाही ते अवघा तिसरा वर्ग शिकलेल्या दादाजींनी करून दाखविले. पूर्व विदर्भातील धान पिकाला देशात लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी वेगवेगळे प्रयोग व संशोधन करून नऊ वाण विकसित केले. दादाजींचे वाण घेऊन कृषी विद्यापीठातील काही लोकांनी टेंभा मिरविला, पण दादाजी नेहमीच प्रसिद्धीपासून दूर रहात आपले कार्य करीत राहिले. त्यांच्या संशोधनाची दखल राज्य व केंद्र सरकारला घ्यावी लागली. दादाजींचा जन्म चंद्रपूर जिह्यातील वरोरा तालुक्यातील खुटाळा येथे १० जुलै १९३९ रोजी झाला. वडिलांबरोबर भाताची शेती करताना त्यांनी आपले भात पीक कसे उत्कृष्ट दर्जाचे होईल यावर विशेष भर दिला होता. मजुरी करून पोट भरत असताना त्यांनी आपल्या छोट्य़ाशा शेतात भात पीक घेणे सुरू केले.

शेताच्या बांधावर त्यांना धानांमध्ये एक बारीक लोंब दिसले. ते पाहून त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी २०० ग्रॅम वाण एकत्रित केले. खरिपाच्या हंगामात जमा केलेले वाण शेताच्या एका कोपऱयात पेरले. १४० दिवसांनी या बीजरोपणातून पायलीभर धान मिळाले. त्यातून बारीक बारीक लोंब काढून दुसऱ्या वर्षी प्रयोग केला. हा प्रयोग पाहून पहिले गावकऱ्यांनी त्यांना वेड्य़ात काढले, पण त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता संशोधन सुरूच ठेवले. हा प्रयोग बघून त्याच गावातील भीमराव शिंदे यांनी दादाजींचे वाण लावून बघितले. त्यांना ९० क्विंटल धान मिळाले. हे धान कोणत्या नावाने बाजारात आणायचे हा प्रश्न दादाजींना पडला. त्यावेळी एचएमटी कंपनीचे घड्य़ाळ प्रत्येकाच्या मनगटावर दिसायचे. ते पाहून त्यांनी आपल्या भाताला एचएमटी नाव दिले. काहीच दिवसांत एचएमटी तांदळाला बाजारपेठेत मागणी वाढली आणि एचएमटी वाण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. हा शोध एका छोटय़ा शेतकऱयाने लावल्याची माहिती राज्यभरात पसरताच कृषी विद्यापीठातील संशोधकांचे डोळे उघडले. देशातील पाच राज्यांमध्ये एचएमटी तांदळाचे पीक लाखो हेक्टरमध्ये शेतकरी घ्यायला लागले. १९८३ मध्ये दादाजी खोब्रागडे तांदळाचे संशोधक म्हणून पुढे आले. ३५ वर्षांच्या काळात त्यांनी आपल्या शेतात विविध प्रयोग करून नऊ वाण संशोधित केले. विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, कारे, एचएमटी आणि झुंगधी अशी वाणांची नावे ठेवली. शरीर थकले तरी ते शेतात काम करायचे. डोळ्यांनी दिसत नसले तरी ते गावाला कशी लोकप्रियता मिळेल यासाठी नवनवीन प्रयोग करीत होते. या विविध संशोधनांमुळे त्यांना देशातील १२ नामांकित पुरस्कार मिळाले. ५ जानेवारी २००५ रोजी माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते दादाजींना अहमदाबाद येथे ५० हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. राज्य शासनाने त्यांना कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरविले. दादाजींचे काम पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना एक एकर शेती भेट देऊन त्यांचा गौरव केला. खऱया संशोधकाला महाराष्ट्र मुकला आहे. ‘एचएमटीवाले दादाजी’ म्हणून ते विदर्भात प्रसिद्ध होते.

आपली प्रतिक्रिया द्या