मनतरंग- आभासी चिंतांचे विश्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर–सौदागर

हल्लीची मुलं जितकी स्मार्ट तितकीच संवेदनशीलही आहेत. मात्र जेव्हा त्यांना आभासी जग खरं वाटायला लागतं आणि वास्तव जग नीरस वाटायला लागतं तेव्हा त्यांना समुपदेशनाची तीव्र गरज भासते.

कौशलला (नाव बदलले आहे) त्याची आई अत्यंत जिवापलीकडे जपत होती. त्याच्या वडिलांनी त्याचे दातृत्व कौशलच्या वयाच्या दुसऱया वर्षीच नाकारल्याने तिने मोठय़ा हिमतीने त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली होती. आज तो तेरा वर्षांचा शाळकरी मुलगा होता. एका प्रथितयश शाळेत त्याचं शिक्षण सुरू होतं. एकीकडे नोकरी आणि दुसरीकडे घर, कौशलची जबाबदारी अशा आघाडय़ा त्याच्या आईने आतापर्यंत पेलल्या होत्या. वडिलांविना पोर म्हणून कोणीही त्याची कीव करू नये म्हणून तिने त्याच्या छोटय़ा-मोठय़ा प्रत्येक गरजेकडे जास्तच लक्ष दिले होते. पण आता काही महिने तिला कौशलच्या काही सवयी खटकायला लागल्या होत्या.

त्याचे उशिरापर्यंत मोबाईलवर राहणे वाढत चालले होते. तो मोबाइलवर गेम्स खेळत असे. पण असे साधे गेम्स खेळता खेळता कधी तो बिटकॉइन गेम्स (आभासी चलन असलेले) खेळायला लागला हे तिला कळलंही नाही.

त्या दिवशीचा प्रसंग आई समुपदेशनाच्या सत्रामध्ये सांगत होती. कौशल नेहमीप्रमाणे शाळेतून आल्यावर गेम्स खेळत बसलेला होता. हल्ली तो सोसायटीमध्ये इतर मुलांबरोबर खेळत नसे. तो खेळण्याचा वेळही मोबाईलवरील गेम्समध्ये घालवे. परीक्षा तोंडावर आलेली, पण कौशलने अभ्यास जवळपास सोडलाच होता. तिला त्याच्याविषयी काळजीही वाटायला लागली होती. त्या दिवशी सकाळीच तिच्या मोबाईलवर कौशलच्या वर्गशिक्षिकेचा मॅसेज आलेला होता ज्यात तिने ‘कौशलच्या सगळ्या विषयांच्या वह्या अपूर्ण आहेत. भेटायला या’ असा शेरा आईला पाठवला होता. आईचं हा मॅसेज वाचूनच पित्त खवळलं होतंच. “तुझ्या वह्या अपूर्ण आहेत कौशल’’ तिने त्याला रागारागात विचारलं.

कौशल वैतागत म्हणाला. “दिसतंय ना मी कमावतोय. शांत राहता येत नाही का तुला?’’ असं त्याने म्हणताच तिची तळपायाची आग मस्तकात गेली. तिने त्याच्याजवळून मोबाईल हुसकावला. त्यामुळे तो प्रचंड चिडला. अन् रागाच्या भरात त्याने तोच मोबाईल आईच्या हातावर फेकून मारला.

कौशल तोपर्यंत केबिनबाहेर बसला होता. त्याच्या हातात तेव्हाही मोबाईल होताच. “दुःख याचं होतंय मॅडम की, त्याला आपल्या चुकीची जाणीवही होणं बंद झालं आहे. मी जेव्हा त्याचे चॅट्स उघडले तेव्हा कुठल्या कुठल्या अपरिचित व्यक्तींची त्यात नावं होती आणि त्या व्यक्ती परदेशी होत्या.’’ त्याची आई कळवळून सांगत होती.

“मी बघते त्याच्याशी बोलून’’ असं तिला म्हणाले.

“मी जे काही खेळतोय त्यात मला काही गैर वाटत नाही. मी आईला हातभार लावतो आहे, पण तिला जर कळत नसेल तर मी काय करू सांगा.’’

“म्हणजे? थोडं अजून स्पष्ट बोलशील का?’’ असं त्याला सांगितल्यावर तो पटकन म्हणाला, “मला बाबा नाहीत. त्यामुळे नंतर आईची जबाबदारी मला घ्यायची आहे.’’ आठवीतला मुलगा इतक्या समंजसपणे बोलत होता की, एक सेकंदासाठी त्याचे कौतुक वाटून गेले. तो पुढे सांगायला लागला जे ऐकून थोडं सुन्नही व्हायला झालं. “मला माझ्या बाबांचा अतिशय राग आहे. ते मला आणि आईला सोडून गेले आणि त्यांच्यामुळे आमची ही अवस्था झाली. मला आई सांगायची की, ते तिला खूप मारायचे. मी पोटात असतानासुद्धा तिला मारलं होतं. आय वॉन्ट टू हिट हिम बॅक.’’ सांगताना त्याच्या मुठी आवळल्या गेल्या. “पण मग तू आईच्या हाताला का मारलस?’’ असं विचारल्यानंतर कौशलने मान खाली घातली. चिंतेची बाब होती ती म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेले चॅट्स. कौशलच्या म्हणण्यानुसार तो जे काही चॅटिंग करत होता आणि ज्यांच्याशी चॅटिंग करत होता ते सगळे त्याचे ‘वेलवीशर्स’ होते. म्हणजेच त्याला ते ‘पैसे कसे कमवायचे?’ याचे ज्ञान ‘फुकट’ देत होते.

“तुला पैसे आतापासून का कमवायचेत रे?’’ असं विचारताच तो पटकन उत्तरला; “मग? मीच आहे ना आईसाठी? तिचा ओन्ली चाईल्ड. तिला माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची मदत लागेलच. तिच्या सॅलरीमध्ये होणार नाही.’’ ही अशी वाक्यं कौशलच्या तोंडातून ऐकताना आईलाही आश्चर्य वाटलं.

“मी कधी तुझ्या गरजा पूर्ण केल्या नाहीत रे? जे म्हणतोस ते आणून तर देते तुला.’’ ती सत्रात म्हणालीच.

“लॅपटॉप घेतलास माझ्यासाठी आणि मोबाईल पण सांगितलेला तुला, घेतलास? माझ्या सगळ्या मित्रांकडे त्यांचे स्वतचे मोबाईल्स आहेत आणि लॅपटॉपही. माझ्याकडे हे दोन्हीही नाहीत.’’ असं सांगत कौशलने तिचा प्रश्न तिलाच परतवला. त्याने त्याच्या मोबाईल वर राहण्याचे आणि आभासी मित्रांचे कारण सांगितले. कौशल ‘ऑनलाईन गेम्स’मध्ये अडकला होता आणि तेही ‘बिटकॉईन्स आणि क्रिप्टो चलनातील’ गेम्स होते ज्यात त्याने काही हजार डॉलर्स कमावले होते आणि ज्यांच्याबरोबर तो हे गेम्स खेळत होता त्या व्यक्तींनी त्याला ‘कमावता’ म्हणून चढवले होते व त्याला अधिकाधिक चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी प्रवृत्त करत होते.

“तुला हे खरं का वाटतंय?’’ असं विचारताच तो पटकन म्हणाला, “कारण माझ्या शाळेतही काही माझे फ्रेंड्स हे गेम्स खेळतात, तेही कमावतात. ते सांगतात हे खरे पैसे आहेत.’’

कौशल ‘बिटकॉईन आणि क्रिप्टो चलनाला’ खरं चलन मानूनच चालत होता. त्याला आभासी जग खरं वाटायला लागलं होतं आणि वास्तव जग निरस वाटायला लागलं होतं. त्यात त्याच्या शाळेतील मुलांकडून दिले जाणारे प्रोत्साहन आणि आभासी खोटय़ा व्यक्तींकडून केली जाणारी स्तुती त्याचं नुकसान करत होती हे त्याला समजत नव्हतं.

 आताच्या बहुतेक मुलांमध्ये ही ‘ऑनलाईन गेम्स आणि क्रिप्टो चलन’ खेळण्याची सवय वाढत चालली आहे. खेदाची गोष्ट अशी की वारंवार विविध माध्यमांमधून जागृती होऊनही हे फसवणुकीचे आणि त्याला बळी पडण्याचे प्रकारही वाढत चालले आहेत. कधी ‘याच्याकडे आहे तर माझ्याकडे का नाही?’ ही चढाओढ तर कधी घरची आर्थिक परिस्थिती मुलांना सोप्या आणि आरामाच्या मार्गाने पैसा कमावण्यासाठी प्रवृत्त करते आहे. हल्लीच्या मुलांमध्ये ‘इझी मनी’ मग तो चांगल्या-वाईट मार्गाने का असेना, पण कमवायला हवा ही विचारधारा रुजलेली आहे. हेच तत्त्व या पिढीने पैसे कमावण्याबाबतही वापरलेलं आहे. सुरुवातीला उत्सुकता आणि मग सवय अशा स्वरूपात ही पिढी या धोकादायक गोष्टींचा अनुभव घेते आहे.

जोपर्यंत मोठे आभासी जगाच्या आहारी जाण्याचं सोडणार नाहीत तोपर्यंत मुलांकडून कुठलीही अपेक्षा करता कामा नये. कित्येकदा असंही पाहिलं गेलंय की, मोठी माणसे ऑनलाईन गेम्समध्ये इतकी गुंतलेली असतात की ती कधीकधी स्वतच्या मुलांनाही त्यात अडकवतात. जर त्या गेम्समध्ये आभासी चलन असेल आणि ते गेम्स जर मुलं किंवा मोठी लोक जिंकली तर त्यांना खरोखर श्रीमंत झाल्यासारखं वाटतं आणि तशा गोष्टी ते मुलांच्या डोक्यामध्येही भरवतात.

हल्लीची मुलं ही जितकी स्मार्ट आहेत तितकीच संवेदनशीलही आहेत. कौशलही असाच होता. आईवर झालेल्या अन्यायाची परतफेड तो कमी वयात पैसे कमावून करणार होता. परंतु समुपदेशनाच्या मदतीने त्याला त्यातून बाहेर काढण्यात आले. सत्रांमध्ये त्याला सायबर क्राईमविषयी माहिती सांगितली गेली तसंच आभासी मित्रांचे धोकेही काही उदाहरणांसकट समजावण्यात आले. पैसे कमावण्याचा मार्ग हा सोपा असतो, पण सहज नसतो हे त्याच्या डोक्यात ठसवलं गेलं. त्यासाठी मेहनती आणि सामाजिक आदर्श ठरलेल्या व्यक्तींनीही उदाहरणे दिली गेली. विशेषत त्याला मार्क झुकेरबर्ग, सत्या नाडेला, बिल गेट्स आदींची माहिती गोळा करण्यास सांगितले गेले. त्यामुळे तो अधिकाधिक वाचन आणि  मनन करायला लागला व हळूहळू अशी जगाचा प्रभाव त्याच्यावरून पूर्ण निघून गेला.

[email protected]

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)