प्रासंगिक – ग्रंथालयशास्त्राला गती व दिशा

>> प्रा. सुभाष सोनू मायंगडे

ग्रंथालय व ग्रंथालयशास्त्र शिक्षणाची गरज जगाला करून देणारे हिंदुस्थानी ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची 130वी जयंती 9 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली. 9 ऑगस्ट हा दिवस ‘ग्रंथालय दिन’ म्हणून ओळखला जातो. 12 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा केला जातो. ग्रंथालयांना जास्तीत जास्त लोकाभिमुख बनवणं, त्यांचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा यासाठी त्यांनी तयार केलेल्या या पंचसूत्रीवर आज ग्रंथालय शास्त्राचा पाया रचला गेला आहे.

आधुनिक हिंदुस्थानच्या ग्रंथालयीन जीवनाला बहुमान्यता व प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्या डॉ.  एस.आर. रंगनाथन यांचा जन्म तत्कालीन मद्रास राज्यातील तंजावर या इतिहासप्रसिद्ध शहराजवळच्या शियाली या गावात 9 ऑगस्ट 1892  रोजी झाला. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले.  मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी विषयात बी.ए. पदवी प्राप्त केली. सन 1917मध्ये एल.टी. म्हणजे आताची बी.एड.  परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली.  1924पर्यंत सहा वर्षं गणिताचे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य केले.  सन 1924मध्ये  प्रेसिडेन्सी कॉलेजमधील गणिताची प्रतिष्ठत प्राध्यापकी सोडून ग्रंथपाल पदाची नवी खुर्ची रंगनाथन यांनी मोठे धाडस करून स्वीकारली.  मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल म्हणून रंगनाथन यांची नियुक्ती झाली. त्या वेळी त्यांना ग्रंथालयशास्त्राच्या शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. इंग्लंडमधील लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लायब्रेरीयनशिपमध्ये एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून तेथील शंभरहून अधिक ग्रंथालयांचा अभ्यास दौरा केला. 1945 साली बनारस हिंदू विश्वविद्यालयात त्या वेळचे कुलगुरू डॉ. राधाकृष्णन यांच्या निमंत्रणावरून 1946पर्यंत तेथील काम पाहिले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाचे ग्रंथालय शास्त्र्ााचे प्राध्यापक व सल्लागार म्हणून काम केले. 1957मध्ये त्यांनी विक्रम विद्यापीठात ग्रंथालयशास्त्र्ा विभाग सुरू केला. तर 1962मध्ये बंगलोर येथे डॉक्युमेंटेशन रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. शेवटपर्यंत या संस्थेत त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केले. 

1928मध्ये त्यांनी मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना केली. 1933 साली त्यांच्याच प्रोत्साहनाने हिंदुस्थानी ग्रंथालय संघाची स्थापना झाली. 1957 साली ते फेडरेशन फॉर इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंटेशन मानद सदस्य म्हणून निवडले गेले. ग्रेट ब्रिटनच्या लायब्ररी असोसिएशनचे आजीव उपाध्यक्ष बनले. इंटरनॅशनल ऍडव्हायझरी कमिटी ऑफ लायब्ररी एक्सपर्ट टू युनायटेड नेशन्स अँड ऍडव्हायझरी कमिटी ऑफ युनोचे सभासद आणि इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीचे आजीव सभासद होते. 1963मध्ये शारदा रंगनाथन एंडाऊमेंट फॉर लायब्ररी सायन्स ही विश्वस्त संस्था स्थापन केली. डॉ. रंगनाथन यांनी आपल्या आयुष्यात 2000पेक्षा अधिक शोधनिबंध, 60 पुस्तके लिहिण्याबरोबरच 5 नियतकालिके प्रकाशित व संपादित केली. 1931मध्ये प्रकाशित केलेल्या ‘फाइव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स’ या पुस्तकात मांडलेले पाच सिद्धांत हिंदुस्थानी ग्रंथालय शास्त्राचा पाया समजला जातो. यामध्ये 1) ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत. 2) प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे 3) प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. 4) वाचकांचा तसेच ग्रंथालय सेवकाचा वेळ वाचवा. 5) ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. हे पाच सिद्धांत मांडले. 1933मध्ये त्यांच्या प्रसिद्ध द्विबिंदू वर्गीकरण पद्धतीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. 1934मध्ये क्लासिफाईड कॅटलॉगीग कोड ही तालिकीकरण पद्धत प्रकाशित झाली जी हिंदू तत्त्वज्ञानावर आधारित आहे.  याशिवाय लिब्रामेट्री-ग्रंथालय सांख्यिकी संकल्पना विकसित केली.  हिंदुस्थानातील ग्रंथपालनाचा द्रष्टा त्यांच्या रूपाने हिंदुस्थानला मिळाला. एक नवे शास्त्र फुलविण्याचे, प्रस्थापित करण्याचे मोठे कार्य ग्रंथपाल रंगनाथन यांनी केले. त्यांनी ग्रंथालय व ग्रंथालयशास्त्र शिक्षणाची ओळख व गरज संपूर्ण जगाला करून दिली.  यासाठीच हिंदुस्थानात 9 ऑगस्ट हा डॉ. शियाली राममृता रंगनाथन यांचा वाढदिवस ग्रंथालय दिन म्हणून साजरा केला जातो. 1935 साली हिंदुस्थान सरकारकडून त्यांना रावसाहेब ही पदवी बहाल करण्यात आली. तर 1957 साली त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल हिंदुस्थान सरकारकडून पद्मश्रीने घेतली गेली.

ज्ञान प्रसार करणारा, उच्च शिक्षण उपयोगिणारा,  ग्रंथालयाचा अचूक उपयोग दाखवून देणारा, सिद्धी व ध्यास घेऊन दीर्घकाळ कार्य करीत राहणारा,  या व्यवसायाला सुप्रतिष्ठा प्राप्त करून देणारा एक असामान्य ज्ञान प्रसारक, ग्रंथालयीन कार्यात जागृती असणारा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा ग्रंथपाल सापडणे विरळाच. त्यांनी ग्रंथालय शास्त्रात केलेल्या भरीव योगदानाचे फळ आज आपल्याला सुसज्ज ग्रंथाचे आणि स्वतंत्र ग्रंथालयशास्त्र विभागाच्या रूपाने पाहायला मिळते. यामुळेच त्यांना हिंदुस्थानी ग्रंथालय चळवळीचे जनक असे संबोधण्यात येते. ग्रंथालय व ग्रंथालयशास्त्राला नवी दिशा देणारे डॉ.  रंगनाथन अखेरच्या श्वासापर्यंत त्या कार्याशी एकनिष्ठ राहिले. 27  सप्टेंबर 1972 रोजी बेंगलोर येथे ते कालवश झाले ते ग्रंथालयशास्त्राला परिपूर्णता देऊन.

(नेट ग्रंथपाल, आठल्ये – सप्रे – पित्रे स्वायत्त महाविद्यालय, देवरुख)