
>> अक्षय मोटेगावकर
प्रत्येकासाठी फायनान्स म्हणजेच अर्थ, वित्त व्यवस्थापन हे आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. अर्थ साक्षरता म्हणजे नेमके काय हे समजावून सांगणारे, या क्षेत्रातील समज वाढवणारे ज्येष्ठ अर्थविश्लेषक, अभ्यासक अनिल लांबा यांचे त्यांच्याच नावाने असणारे यूटय़ूब चॅनेल नक्की पाहावे असे आहे.
साधारपणे दोन-अडीच वर्षांपूर्वी आमच्या कंपनीमध्ये एक ट्रेनिंग झाले होते. ट्रेनर होते प्रख्यात आर्थिक साक्षरता तज्ञ, मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट, टेड एक्स वत्ते आणि लेखक डॉ. अनिल लांबा. त्यामुळे ट्रेनिंगचा विषय अर्थातच वित्त व्यवस्थापन क्षेत्रातीलच होता. तो म्हणजे फायनान्स फॉर नॉन-फायनान्स. डॉ. अनिल लांबा म्हणजे आर्थिक नियोजन आणि जागृती क्षेत्रातील अत्यंत मोठे नाव व मोठमोठय़ा कंपन्यांचे आर्थिक सल्लागार, मार्गदर्शक. डॉ. अनिल लांबा यांनी आमचे सेशन्स घेतले. आपण कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये व कोणत्याही हुद्दय़ावर काम करणारी व्यक्ती असू आपले प्रत्येक काम, निर्णय हा कसा त्या कंपनीच्या आर्थिक निर्णयांशी संलग्न असतो व कंपनीमध्ये काम करणारी कोणतीही व्यक्ती ही नॉन फायनान्स व्यक्ती नसते हे त्यांनी या सेशन्समधून पटवून दिले.
सर्वसामान्य नागरिकांसाठीसुद्धा फायनान्स हा आयुष्याचा कसा अविभाज्य भाग आहे आणि त्याबद्दल आपण जागरूक असणे हे किती गरजेचे आहे हे ते अगदी योग्यरीत्या पटवून देतात. त्यानंतर मग डॉ. अनिल लांबा यांचे यूटय़ूब व्हिडीओज ऐकायला सुरुवात केली. अर्थकारण विषयावरील त्यांची इंग्रजी पुस्तके मागवली. त्यांची पुस्तके मराठी भाषेतही अनुवादित झाली आहेत.
याच विषयावरील त्यांचे ‘अनिल लांबा’ याच नावाने असणारे यूटय़ूब चॅनेल. त्यांच्या या चॅनेलवर साधारणत 140 पेक्षा जास्त व्हिडीओज आहेत. वित्त व्यवस्थापनातील मूलभूत संज्ञा आणि संकल्पना समजावून सांगणारे त्यांचे व्हिडीओज सगळ्यांनी पाहावे, ऐकावे असे. महत्त्वपूर्ण विषयावरील हे व्हिडीओज पुनः पुन्हा ऐकावे, त्यांची लिखीत नोंद करून ठेवावी, समजून घ्यावे व त्यातील शिकवणी दैनंदिन आयुष्यात उतरवावी असे आहेत. त्यातील कंपनीचा ताळेबंद किंवा बॅलन्स शीट कशी असते आणि ती कशी वाचावी हा महत्त्वाचा व्हिडीओ आहे. कॉमर्स (वाणिज्य) शाखेच्या विद्यार्थ्यांना या सर्व संज्ञा आणि संकल्पना सवयीच्या, माहितीच्या असतात पण इतरांसाठी या गोष्टी बऱ्याच वेळा क्लिष्ट वाटणाऱ्या असतात व त्या जर व्यवस्थित समजून उमजून घेतल्या तर नक्कीच फायदा होतो. भारताचा ताळेबंद, भारताची मालमत्ता यांचा नेमका अर्थ, एक राष्ट्र म्हणून भारताच्या दायित्वाच्या गोष्टी कोणत्या हे व्हिडीओ माहितीप्रद आहेत. इन्व्हेंटरी कंपनीच्या नफ्यासाठी कशी मारक आहे हा व्हिडीओ कंपन्यांचे आणि त्यांच्या सप्लाय चेन विभागाचे आणि व्यवस्थापनाचे डोळे उघडणारा आहे.
वित्त व्यवस्थापनातील महत्त्वाची गुणोत्तरे कोणती? ती कशी अभ्यासावीत? वर्किंग कॅपिटल महत्त्वाचे की वर्किंग कॅपिटल सायकल महत्त्वाची? ती कशी मोजावी, सुरळीत कशी करावी, त्याचे फायदे सांगणारा व्हिडीओ व्यवसायाकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवतो. नवोदितांसाठी शेअर मार्केटची ओळख हा व्हिडीओ सोप्या भाषेत शेअर मार्केटची ओळख करून देतो. इन्कम टॅक्सची गुपिते कोणती? कंपनीवर असणारे कर्ज कशाप्रकारे तुमचा नफा वाढवू शकते सारखे व्हिडीओ वेगळ्या धाटणीचे व व्यवसायाच्या क्लृप्ती शिकवणारे आहेत. हे सर्व व्हिडीओज पाहताना, ऐकताना आपल्याला जाणवते की डॉ. अनिल लांबा हे कुठेही क्लिष्ट वित्त संज्ञा वापरत नाहीत. अर्थात विषय समजावून सांगताना त्या संज्ञांचा वापर होणारच, पण त्यांचे अवडंबर माजवले जात नाही. त्या संज्ञांमध्ये श्रोता गुरफटून जात नाही किंबहुना या संज्ञा सोप्या करून सांगितल्यामुळे त्या ऐकणाऱ्याच्या स्मरणात राहतात. डॉ. अनिल लांबा यांची ही भाषणे सोप्या इंग्रजी भाषेत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, कंपनी कर्मचारी, गृहिणी कोणालाही सुलभरित्या समजू शकतात.
जुन्या काळी म्हटलं जायचं सगळी सोंगे घेता येतात, पण पैशांचे सोंग घेता येत नाही. याचा अर्थ पैसे नसताना पैसे आहेत हे सांगता आणि दाखवता येत नाही. हे एखाद्या व्यक्तीला जसे लागू होते तसेच ते कंपन्यानासुद्धा लागू होते. त्यामुळे वित्त व्यवस्थापनाचे पुरेसे आणि योग्य ज्ञान सर्वांना असणे आवश्यक आहे. या प्रवासात डॉ. अनिल लांबा यांची सोबत आपल्याला दूरवर आणि सुरक्षित गंतव्यापर्यंत घेऊन जाऊ शकते हे नक्की. किमान या व्हिडीओजमुळे फायनान्स हा अवघड विषय आहे हा भ्रम दूर व्हायला मदत होईल आणि फायनान्सचा अभ्यास करायची इच्छा वाढेल हे नक्की.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)



























































