
प्रदीप म्हात्रे < [email protected] >
सध्या देशात ‘डिजिटलायझेशन’चे वारे सर्वत्र घोंघावत आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानाचे जाळे झपाटय़ाने विस्तारत आहे. ऑनलाइन आणि डिजिटल व्यवहारांचा लोकांनी जास्तीत जास्त वापर करावा यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. त्याला प्रतिसाद मिळत असला तरी ‘दिल्ली अभी दूर है’ अशी साधारण स्थिती आहे. तरीही देशाला संशोधनाच्या क्षेत्रात पुढे नेण्याचा, विज्ञानाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरूच आहे. याबाबत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सी.एस.आय.आर.) या देशातील राष्ट्रीय प्रयोगशाळांच्या शिखर संस्थेचे त्याबाबतीत मोलाचे योगदान आहे. आता याच अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीचे सुकाणू पुन्हा एकदा मराठी माणसाकडे आले आहे.
डॉ. शेखर चिंतामणी मांडे यांची ‘सी.एस.आय.आर.’च्या महासंचालकपदी नेमणूक झाली आहे. यापूर्वी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे. त्यावरूनही डॉ. मांडे यांच्या मोठेपणाची कल्पना येते. विविध विज्ञान शाखांमधील संशोधन आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून या संस्थेचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. या संस्थेच्या अखत्यारीत जवळपास चाळीस प्रयोगशाळांचे जाळे देशभर पसरले असून किमान पंचवीस हजार शास्त्रज्ञ तेथे कार्यरत आहेत. यावरून डॉ. मांडे यांच्यावर असलेली जबाबदारी लक्षात येईल. डॉ. मांडे हे या संस्थेचे पंचविसावे महासंचालक असून केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या सचिव पदाचा कार्यभारही त्यांच्याकडे आहे.
5 एप्रिल 1962 रोजी जन्मलेल्या डॉ. मांडे यांचे बी.एस्सी. आणि एम.एस्सी. (भौतिकशास्त्र क्ष-किरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स) शिक्षण नागपुरात झाले. पुढे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथून प्रा. एम. विजयन यांच्या मार्गदर्शनाखाली मोलेक्युलर बायोफिजिक्समध्ये 1991 साली पीएच.डी. प्राप्त केल्यावर त्यांनी नेदरलॅण्डस् आणि वॉशिंग्टन विद्यापीठात पीएच.डी.पश्चात संशोधन केले. 1995मध्ये हिंदुस्थानात परतल्यावर 2001पर्यंत इन्स्टिटय़ूट ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी, चंदिगड येथे काम करताना, जे क्षयरोग जीवाणू प्रथिन निर्माण करतात त्यावर त्यांनी तेथे संशोधन केले. क्षयरोग होऊन गेलेल्या माणसाच्या शरीरात हे जीवाणू सुप्तावस्थेत राहतात, शरीराची प्रतिकारशक्ती कमी होताच ते जागृत होतात. शिवाय दरम्यानच्या काळात ते रुग्णाच्या शरीरातून शक्ती साठवून ठेवतात व संधी मिळताच डोके वर काढतात हे त्यांनी क्ष-किरण स्फटिकशास्त्राच्या साहाय्याने सिद्ध केले.
क्षयरूग्णांच्या शरीरातील प्रथिने आणि सुदृढ व्यक्तींच्या शरीरातील प्रथिने यांचा तुलनात्मक अभ्यासही डॉ. मांडे यांनी केला. 2001 ते 2011 या कालावधीत त्यांनी सेंटर फॉर डीएनए फिंगर प्रिंटिंग ऍण्ड डायग्नोस्टिक, हैदराबाद या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून काम करताना त्यांनी डीएनए फिंगर प्रिंटिंगव क्रिस्टलोग्राफीत विशेष संशोधन केले. सप्टेंबर 2011 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत त्यांनी पुणे येथील राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत असताना हिंदुस्थानी नागरिकांचा खास जनुकीय अभ्यास केला आहे. डॉ. मांडे यांचे शंभरएक शोधनिबंध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले असून देशभरातून विविध विद्यापीठांतील 20 विद्यार्थ्यांना त्यांनी पीएच.डी.करिता मार्गदर्शन केले आहे. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्येस इंडिया, इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यासह नामांकित विज्ञान संस्थांचे ते मानद सदस्य असून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्यांवर ते सल्लागार आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये प्रमुख्याने बी. एम. बिर्ला तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार (1999) आणि शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (2005) यांचा समावेश आाहे.
मराठी विज्ञान परिषदेच्या वणी (जि. यवतमाळ) येथे झालेल्या एकेचाळिसाव्या मराठी विज्ञान अधिवेशनात त्यांच्या संशोधन कार्याबद्दल सन्मान केला आहे. डॉ. शेखर मांडे यांना संशोधनाचा उत्तम वारसा त्यांचे वडील म्हणजेच प्रा. चिंतामणी मांडे यांच्याकडून लाभला असून संगमनेर येथे 1980 साली झालेल्या अ. भा. मराठी विज्ञान संमेलनात डॉ. चिंतामणी मांडे यांचा सत्कार करण्यात आला होता हे येथे आवर्जून सांगावेसे वाटते. किंबहुना मराठी विज्ञान परिषदेतर्फे सन्मान झालेली पिता-पुत्रांची ही पहिलीच जोडी ठरली होती.
वयाच्या छपन्नाव्या वर्षी चालून आलेली महासंचालक पदाची धुरा सांभाळताना डॉ. मांडे जवळपास चाळीस प्रयोगशाळांचे नेतृत्व तर समर्थपणे करतीलच, पण त्याचवेळी विज्ञान भारतीचे उपाध्यक्ष म्हणून विज्ञान प्रसाराचे घट्ट जाळेदेखील देशभर निश्चितच विणतील, असा विश्वास वाटतो. किंबहुना तशी उत्तम संधी त्यांना या निमित्ताने मिळाली आहे. अर्थात त्यांना पुरेसा कालावधी मिळायला हवा.




























































