लेख – शालेय मुलांवर ‘लॉक डाऊन’चा असाही परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  डॉ. सुरेश बिराजदार, (नवजात शिशू तज्ञ आणि बालरोगतज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, खारघर)

>> डॉ. बादशाह खान, (बालरोगतज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड)

कोरोनातून सावरत असताना परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, पण लहान मुलांचं विश्व खरंच पूर्वपदावर येतंय का? मुलांचा इतरांशी असणारा सुसंवाद कुठेतरी हरवला आहे. हा अवघड काळ मुलांसाठी सोपा करताना काही गोष्टींचा विचार व्हायलाच हवा. लॉकडाऊनच्या काळात घरातील चार भिंती हेच विश्व झाल्याने संवाद साधण्याची, प्रतिक्रिया देण्याची मुलांची सवय काही अंशी घटली आहे. शाळा बंद होऊन आता जवळपास दोन वर्षे झाली असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोना संसर्ग वाढला आणि जगभरात लॉक डाऊन जाहीर झाले. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीवर या कोरोनाकाळाने परिणाम केला, परंतु यात मुख्यत्वे भरडली गेली ती लहान मुलं. मुलांच्या भावनिक, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर या काळाचा दुष्परिणाम झाला जो कोरोनातून बाहेर पडताना अधिक तीव्रतेने जाणवत आहे. कोरोना संसर्गामुळे बाहेर फिरण्यावर संपूर्ण बंदी आली आणि सर्वप्रथम शाळा बंद झाल्या. आता परिस्थिती पूर्ववत होताना शाळा, क्लासेस, टय़ूशन, इतर छंदवर्ग सुरू झाले असले तरी लहान मुलांना त्यांचं विश्व पुन्हा तसंच अनुभवणं काहीसं कठीण जात आहे. लॉक डाऊनचा दोन वर्षांचा दीर्घ काळ मुलांची मानसिक, बौद्धिक आणि भावनिक वाढ खुंटण्यास कारणीभूत ठरला आहे.

लॉक डाऊनच्या कालावधीत सहसा घराबाहेर न पडणाऱ्या मुलांना आता शाळा सुरू झाल्यावर इतर मुलांबरोबर जुळवून घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉक डाऊन दरम्यान पाळाव्या लागणाऱ्या नियमावलीमुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक विकासावर दुष्परिणाम झाला. त्यामुळे शाळेत शिक्षकांसोबत, इतर मुलांसोबत वावरताना, संवाद साधताना मुलांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहावयास मिळतात.

कोरोनाकाळाचे दुष्परिणाम वेगवेगळ्या रूपात आपल्या समोर येत आहेत. कोरोनापश्चात काळात आपलं सामाजिक स्वास्थ्य हरवलं आहे. लॉक डाऊननंतर अशा समस्यांमध्ये आणखीनच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः लहान मुलांचा विचार करताना बदलती जीवनशैली, विभक्त कुटुंबपद्धती या साऱ्याचा एकत्रित परिणामही या काळात पालक म्हणून अनेकांनी अनुभवला. सोशल डिस्टन्सिंग, स्क्रीन टाइममध्ये झालेली वाढ, मैदानी खेळांवर आलेली बंदी एकंदरीत या साऱ्यांचाच विद्यार्थ्यांच्या विकासात्मक वाढीवर परिणाम दिसून आला आहे.

केवळ लॉक डाऊनमुळे ही समस्या वाढल्याचे अजूनही सिद्ध झालेले नाही किंवा तसा तपशीलही नाही. मात्र बालरोग तज्ञांकडे या समस्येने त्रस्त विद्यार्थी आणि पालकांची वाढती संख्या ही नक्कीच चिंता निर्माण करणारी आहे. 1 ते 2 वर्षे वयोगटातील उशिरा बाल्यावस्थेत किंवा लहान मुलांमध्ये बोलण्यात आणि भाषेत विलंब दिसून येतो. अशा प्रकरणांमध्ये, पारंपरिक घटक आहेत जसे की कुटुंब विभक्त आहे आणि पालक नोकरी करणारे आहेत, एकटेच मूल आहे किंवा लॉक डाऊन दरम्यान सामाजात वावरता न आल्याने इतरांशी फारसा संवाद न झाल्याने समाजात मिसळण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. या गोष्टी देखील मुल उशिराने बोलणे, चारचौघात मिसळण्यात अडचणी निर्माण करणारे ठरत आहे. कोविडदरम्यान मुलांमधील संवाद कौशल्यात अडचणी दिसून आल्या आहेतच. मात्र केवळ मुलंच नव्हे तर सगळ्याच वयोगटात मानसिक अस्वास्थ्य जाणवण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतं. तज्ञांच्या अभ्यासानुसार तर येत्या काही वर्षांत मानसिक आरोग्याच्या समस्यांचं प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे.  पालकांनी आपल्या मुलांचे  शिक्षक, कुटुंबातील इतर सदस्य, शेजारी यांच्याकडून वेळोवेळी आपल्या मुलाच्या वैयक्तिक विकासाबाबत नोंद घ्यावी जेणेकरून वेळीच आपल्याला मुलांमधील समस्या तसेच संवाद कौशल्यातील अडचणींवर मात करता येऊ शकते.

मुलांच्या संवादात्मक अडचणींवर मात करण्यासाठी पालकांनी घरच्या घरी काही उपाय करणे आवश्यक आहेत. दिवसभरात पुरेसा वेळ तुमच्या मुलांसोबत घालवणं, त्यांना दररोज वाचनाची सवय लावणं, त्यांच्याशी सतत वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधणं या गोष्टी नियमितपणे केल्या जाणं गरजेचं आहे. लहान मुलांना वाचनाची सवय लावताना मोठय़ा चित्रांचा समावेश असलेली पुस्तकं मुलांना वाचायला दिल्यास मुलं चित्रांच्या माध्यमातून लवकर आकलन करू शकेल. याप्रमाणे प्रत्येक पानावरील चित्रांना नावं द्या आणि त्यांचे वर्णन करा आणि तुमच्या मुलांना तुमच्या नंतर त्यांची पुनरावृत्ती करण्यास सांगा. अभिनय करून एखादी गोष्ट सांगणे ही देखील एक चांगली कल्पना आहे. कृतीसह शब्द उच्चारण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना समजावून सांगा. तुमच्या मुलांच्या शब्दसंग्रहावर भर द्या नवनवीन शब्दांची ओळख करून द्या.

ज्येष्ठ नागरिक आणि प्रौढांप्रमाणेच लहान मुलांवरही कोरोना महामारीचा परिणाम झाला आहे. बहुतेक मुलांना अनोळखी व्यक्तींसोबत जुळवून घेताना अनेक समस्या भेडसावू लागल्या आहेत. स्वतःला व्यक्त करण्यातही अडचणी जाणवू लागल्याचे दिसून येते. लॉक डाऊनमुळे मुलांचा नवीन शब्दसंग्रह कमी झाला आहे. पूर्वी मुलं सवंगडय़ांसोबत मैदानावर खेळणे, कुटुंबीय तसेच मित्रपरिवारासोबत फिरायला जाणे, उद्यानात जाणे या साऱ्या कृतींमधून नवनवीन गोष्टी शिकत होते. मात्र गेली दोन वर्षे मुलांना केवळ घरीच रहावे लागले आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक विकासावर झाल्याचे दिसून आले आहे. मास्क घातल्याने मुलांना शब्द उच्चारताना होणाऱ्या ओठांच्या हलचाची, एखाद्याच्या केवळ ओठांद्वारे केलेल्या उच्चारातून शब्द समजून घेणे हे या मुलांना शिकता येत नाही.

कोविड नियमावलीमुळे समाजाशी तुटलेला संपर्क, टीव्ही तसेच मोबाईल फोनच्या वाढत्या वापराने दिवसेंदिवस वाढणारा स्क्रीन टाइम यामुळे कुठेतरी एकमेकांमध्ये होणारा संवाद कमी होत चालला आहे. मुले संभाषण टाळू लागली आहेत. महामारीच्या काळात ई-लर्निंग सुरू असल्याने शिक्षकांना प्रत्यक्ष भेटता येत नसल्याने मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संवाद आणि भाषेचा विकास होत नसल्याने मुलांना भविष्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भाषेच्या अपुऱ्या ज्ञानामुळे मुलांना वाचनात अडचणी निर्माण होऊ शकतील. पुढील आयुष्यात त्याला मानसिक समस्या येऊ शकतात. मुलांसोबत बोलताना, शिकवताना सोपी वाक्ये वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ही मुले ती वाक्ये शिकू शकतील आणि चेहऱ्यावरील हावभाव समजू शकतील.

मुलांच्या संवाद कौशल्यात, भाषेच्या विकासात, बोलण्यात अडचणी किंवा असामान्य लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाहीच. आता शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत, पालकांनी मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यासाठी शाळेतील शिक्षकांशी देखील वेळोवेळी संवाद साधणे आवश्यक आहे.