वेब न्यूज – फेसबुकच्या सापळ्यात लहानगे

>> स्पायडरमॅन

सोशल मीडिया हे एक दुधारी शस्त्र आहे असे कायम म्हटले जाते. या शस्त्राच्या गैरवापराविषयी सायबर तज्ञच नव्हे, तर अनेक समाजसेवी संस्था, मानसिक तज्ञ, शिक्षण क्षेत्रातील नामांकित लोक कायमच चिंता व्यक्त करत असतात. किशोरवयीन मुलांमध्ये या सोशल मीडियाची असलेली क्रेझ अनेकदा घातक ठरत असल्याचेदेखील समोर आले आहे.

नको त्या गोष्टींचे ज्ञान लहान वयातच या मुलांपर्यंत पोचत आहे ही चिंतेची गोष्ट आहे. अनेकदा या सोशल मीडियाचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठीदेखील सर्रास केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यातल्या त्यात फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करून अनेक गुन्हेगार लहान मुलांभोवती आपले जाळे विणत असल्याचे अनेकदा समोर येत असते. मात्र या गुन्हेगारांना फेसबुकचीदेखील साथ असल्याचा आरोप अनेक तज्ञ वारंवार करत असतात. फेसबुक मात्र या आरोपांना कायमच नाकारत आले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाच्या एका लॉबी ग्रुपने आता पुराव्यासकट फेसबुकच्या अनैतिक कृत्यांना उघडकीला आणून फेसबुकला चांगलाच दणका दिला आहे.

लहान मुलांपर्यंत फेसबुकद्वारे पोचणाऱया माहितीविषयी फेसबुक अत्यंत संवेदनशील असल्याचा दावा फेसबुक कायमच करत असते. मात्र हा दावा अत्यंत पोकळ असून ऑस्ट्रेलियातील 13 ते 17 वर्षांच्या मुलांपर्यंत धूम्रपान, दारू आणि ऑनलाईन डेटिंगच्या जाहिराती फेसबुकच्या माध्यमातून सर्रासपणे पोचवल्या जात असल्याचे उघडकीला आले आहे. फेसबुक स्वतः या कृत्यामागे नसले, तरी फेसबुकच्या माध्यमातून जाहिराती करणारे अनेक जण आपल्या या उत्पादनांना सहजपणे या लहानग्यांपर्यंत पोचवत आहेत आणि फेसबुक त्याला कोणताही आक्षेप न घेता डोळेझाक करत आहे.

18 वर्षांवरील लोकांसाठी असलेले अनेक कंटेट हे या मुलांपर्यंतदेखील पोचवले जात आहेत. फेसबुकचा हा चेहरा उघडकीस आल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन सरकारदेखील खडबडून जागे झाले असून त्यांनी याविरुद्ध कडक धोरण अवलंबण्याचे ठरविले आहे. त्यासाठी आता किशोरवयीन मुलांना दाखवण्यात येणाऱया कंटेटसाठी पालकांची मंजुरी असायला हवी, असा कायदाच करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या