
>> डॉ. जयंत वडतकर
अलीकडे मुंबईचे फ्लेमिंगो हा खास चर्चेचा विषय झालेला आहे. देशांतर्गत स्थलांतर करीत येणाऱया फ्लेमिंगोच्या मुंबई किनाऱयालगतच्या अधिवासांवर मात्र प्रदूषण, अतिक्रमण, धूळ, नवीन प्रकल्पांची उभारणी अशा विविध कारणांनी संकट ओढवलेले दिसून येत आहे.
हिवाळा लागला की, आपल्या देशात पाणवठय़ांवर व जंगलात अनेक पक्षी स्थलांतर करून येत असतात. विशेषत: पाणथळ ठिकाणी येणारे बदक, हंस, चिखल पायटे (वेडर्स) आणि फ्लेमिंगोसारखे मोठय़ा आकाराचे व सुंदर पक्षी स्थलांतर करून येत असतात. देशांतर्गत स्थलांतर करून येणाऱयांमध्ये फ्लेमिंगोसारख्या पक्ष्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात हिवाळ्यात बऱयाच तलावांवर फ्लेमिंगो येत असतात. त्यात सोलापूर उजनी धरण आणि अहिल्यानगर जिह्यातील जायकवाडी प्रकल्पात ते नियमित येत असले तरी सर्वात जास्त संख्येत ते मुंबईजवळील समुद्रकिनाऱयांवर येत असतात. यामध्ये दोन्ही प्रजाती म्हणजेच लहान व मोठे अर्थात लेसर फ्लेमिंगो व ग्रेटर फ्लेमिंगो या दोन्हीचा समावेश असतो.
अलीकडे मुंबईचे फ्लेमिंगो हा खास चर्चेचा विषय झालेला आहे. सुमारे 10-15 वर्षांपूर्वी या पक्ष्यांचे अप्रूप फक्त पक्षी अभ्यासकांनाच असायचे. इतरांना मात्र त्याची फारशी कल्पनासुद्धा नव्हती. मुंबईची प्रख्यात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) या फ्लेमिंगोचा अभ्यास सुरू केला केला व पुढे नागरिकांनीसुद्धा हे किनाऱयावरील सौंदर्य बघावे म्हणून ‘फ्लेमिंगो फेस्टिवलची’ सुरुवात केली. त्यानंतर आता ते पक्षी अभ्यासक, छायाचित्रकार व पर्यटकांचेसुद्धा आकर्षण झालेले आहे. फ्लेमिंगो मोठय़ा आकाराचा साधारणत: एक ते दीड मीटर उंचीचा आकर्षक गुलाबी रंगाचा पाणपक्षी. फ्लेमिंगोचा गुलाबी रंग हा त्याच्या आहारात असलेल्या कॅरोटीनाईडस रंगद्रव्यातून येत असतो. त्यांच्या गुलाबी रंगामुळे त्यांना `अग्निपंख’ ही मराठी ओळख मिळाली आहे. ते थव्याने राहतात व खाऱया पाण्यात; विशेषत: समुद्री खाडय़ा, मॅग्रोव आणि गाळपट्टी (मडफ्लॅट) भागात राहतात. विणीच्या काळात हे पक्षी गुजरातमधील कच्छच्या रणात व राजस्थानच्या सांबार झील या ठिकाणी मुक्कामी असतात, तर उर्वरित नोव्हेंबर ते मे या सहा महिन्यांदरम्यान ते मुंबई व इतर ठिकाणी स्थलांतर करून येत असतात. मुंबईत साधारण किती फ्लेमिंगो येत असतील? असे जर कुणी विचारले तर अनेकांना ते कदाचित माहिती नसणार. मुंबईजवळील ठाणे खाडीतील ऐरोली- भांडूप पंपिंग स्टेशन, नवी मुंबईतील टीएस चाणक्य समुद्रकिनारा, डीपीएस शाळेमागील तलाव, शिवडी खाडी, करावे किनारा अशा ठिकाणी हे फ्लेमिंगो लाखाच्या संख्येत येत असतात. बीएनएचएसने केलेल्या एका गणनेनुसार लेसर फ्लेमिंगो हे एक ते सवा लाखाच्या घरात, तर ग्रेटर फ्लेमिंगो काही हजारांच्या घरात मुंबईत दरवर्षी पाहुणे म्हणून येत असतात.
समुद्राला ओहोटी असताना ठाणे खाडीत त्यांना भरपूर खाद्य उपलब्ध होते. त्यामुळे ते ऐरोली ते भांडूप भागात मोठय़ा संख्येत थव्याने एकत्र येतात तेव्हा समुद्राच्या काळ्या पाण्यावर गुलाबी झालर पसरल्यासारखी वाटते. समुद्र जेव्हा भरतीला असतो तेव्हा ठाणे खाडीतील पाण्यात उभे राहता येत नसल्याने त्या वेळी ते नवी मुंबईतील टीएस चाणक्य, डीपीएस तलाव, शिवडी खाडी, करावे किनारा व काही लहान लहान उथळ पाणथळीच्या ठिकाणी विश्रांतीसाठी विखुरले जातात. या ठिकाणी पर्यटकांना त्यांचे जवळून दर्शन होत असते. सीवूड परिसरातील ज्वेल ऑफ नवी मुंबई नावाचा तलाव हे सकाळी फिरणाऱयासाठी एक आवडते ठिकाण. या ठिकाणीसुद्धा फ्लेमिंगोचे जवळून दर्शन होते. या फ्लेमिंगोसोबतच अनेक लहान-मोठे चिखल पायटे (वेडर्स) पक्षीसुद्धा या ठिकाणी स्थलांतर करून येत असतात. समुद्राच्या दलदलीत काठाकाठाने या भागात अनेक दुर्मिळ पक्ष्यांचेही दर्शन होत असते.
त्यामुळे अलीकडे या भागात अनेक पक्षी छायाचित्रकार, अभ्यासक, संशोधक व पर्यटक या भागात येत असतात. पूर्वी या फ्लेमिंगोसह इतर अनेक स्थलांतरीत पक्ष्यांचा नवी मुंबईच्या पुढील उरण खाडी, उलवे गाव येथील किनाऱयावरसुद्धा मोठय़ा संख्येत वावर असे. परंतु या भागातील जमिनी अनेक कारणांसाठी वाटल्या गेल्याने त्या भागातील लहान मोठी पाणथळ जागा बुजविणे सुरू असून काही ठिकाणी कुंपण टाकून जागा बंदिस्त केल्या गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता तेथे जाता येत नाही. त्यामुळे या भागातील पक्ष्यांची संख्या आता झपाटय़ाने कमी झाली असली तरी पानचिरा किंवा कलहंससारखे पक्षी याही वर्षी तेथे आले असल्याचे पक्षी अभ्यासकांनी हुडकून काढले आहे. मुंबईत जमिनीला आज जगातील सर्वात जास्त मागणी व सोन्यासारखा भाव आहे. त्यामुळे पाणथळ जागांवर आता हळूहळू अनेक जण हक्क सांगायला लागले आहेत. नवी मुंबईतील फ्लेमिंगोंच्या जागांवर गृहनिर्माण सोसायटय़ा व गोल्फ कोर्स निर्माण करण्याचे मनसुबे असल्याचे कानावर येत आहे. या जागा बुजवून तेथे नवनवीन प्रकल्प उभारणीचे घट घातले जात आहेत. मात्र निसर्गप्रेमींच्या रेटय़ामुळे व काही कायद्यांच्या बडग्याने अजून तरी फ्लेमिंगोचे हे अधिवास कसेबसे तग धरून आहेत.
मोठय़ा प्रमाणात वाढलेला मानवी हस्तक्षेप यामुळेसुद्धा या स्थलांतरीत पक्ष्यांच्या अधिवासावर संकटाचे काळे ढग घिरटय़ा घालायला लागलेले आहेत. मागील वर्षी मे महिन्यात एका विमानाला धडकून घाटकोपर जवळ 30- 40 फ्लेमिंगोचा मृत्यू झाला होता. भविष्यात फ्लेमिंगो व इतर अनेक स्थलांतरीत पक्ष्यांना अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. फ्लेमिंगोच्या हक्काच्या जागा शाबूत राखण्याचे दिव्य निसर्गप्रेमींसमोर असणार आहे. सरकार त्यांना वाचविण्यासाठी कितपत रस दाखवेल हे येणारा काळच ठरवेल.
(लेखक महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष आहेत)




























































