लेख – वने, खारजमीन आणि बंदरे हे एकच खाते हवे!

>> पंढरीनाथ सावंत

खाड्या गाळाने भरण्यामागच्या खऱया कारणांचा कोणत्याच सरकारांनी कधी विचारच केला नाही. त्यामुळे वन, खारजमीन आणि बंदरे ही एकाच मोठय़ा खात्यात असायला हवी होती ती तशी आली नाहीत. आजसुद्धा हे तीन घटक वेगवेगळे आहेत. त्यांच्या एकत्रीकरणाची गरज आहे. तरच खाडय़ांपासून बंदरांपर्यंतचा गाळ काढण्याचा, खणून आणि जबरदस्त वनीकरण करण्याचा एकत्रित विचार होऊ शकेल अन्यथा नाही. राज्य सरकारने याची दखल घ्यावी.

दिनांक 19 सप्टेंबर 2020 रोजी आर. के. फ्लोटिंग कंपनीची बोट 25 प्रवासी आणि 5 कर्मचारी यांसह संध्याकाळी 5.30 वाजता रायगड जिल्हय़ातील करंजा बंदरातून रेवसला जाण्यासाठी सुटली. ती रेवस बंदरापाशी आली असताना गाळात रुतली. ओहोटीमुळे पाणी कमी असल्याने हा प्रकार घडला आहे. चालकाने बोट गाळात अडकल्याचे करंजा येथे कळवले. ओहोटी संपून भरती लागल्यानंतर बोट सुरू झाली आणि प्रवाशांना रेवस बंदरात पोहोचते केले गेले.

या संबंधात बरीच चर्चा झाली आणि याआधीही होत आली आहे. दरवर्षी गाळ काढण्याच्या कामासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. तरी पण प्रशासन व कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त केला जातो.

इथे ही गोष्ट सुरूही होत नाही आणि संपतही नाही. कधी संपेल असे वाटत नाही. येथला – म्हणजे अंबा नदीच्या धरमतर खाडीच्या रेवस बंदराजवळचा गाळ काढता काढता 30-32 वर्षांपूर्वी ‘अगस्ती’ नावाच्या ड्रेजरचा देहान्त झाला. समस्या होती तिथेच आहे. कारण ती का आहे याचा विचार सुरुवातीकडून करण्याऐवजी शेवटाकडून केला जातो. हे स्पष्ट करण्यासाठी काही गोष्टींचा उल्लेख करण्याची गरज आहे.

n 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले तेव्हा कोकणात खार जमिनीचा प्रश्न फारसा नव्हता. आता कोकणामधली लाखो एकर जमीन खार जमीन झाली आहे. तिची बांधबंदिस्ती दरसाल मोडते आणि ती पुन्हा करण्यासाठी आणि पुढच्याही वर्षी पुन्हा करण्यासाठी कोटय़वधी रुपये दरसाल खर्च होतात.

n महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतरसुद्धा काही वर्षे मुंबई-कोकण जलवाहतूक चालू होती.

n तशीच ती नद्यांच्या खाडय़ांमधूनही चालू होती. अंबा नदीच्या खाडीत नागोठण्यापर्यंत लाँच आणि धरमतरपर्यंत बोट येत होती. सावित्री नदीत दालगावपर्यंत लाँच येत होती. शिडाची गलबते तर थेट खाडी जिथे सुरू होते तेथपर्यंत येत होती. त्यामुळे महाड, चिपळूण अशा ठिकाणी बंदरे होती आणि शहरेसुद्धा वसली होती.
ही सगळी जलवाहतूक मोटरभाडय़ाच्या मानाने खूप स्वस्त होती.

परंतु महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर थोडय़ाच वर्षांत खार जमिनींचा प्रश्न हा खऱया अर्थाने प्रश्न म्हणून उभा राहिला आणि दरसाल वाढत गेला. आज तुम्ही मोटारीने कोकणात जाऊ लागलात तर वडखळपासून पुढे धरमतरच्या खाडीचे पाणी मुंबई-गोवा रस्त्याला भिडलेले दिसेल. 20-25 वर्षांपूर्वी ते खाडीपासून फार दूर आलेले नव्हते.

आज खार जमिनीने लाखो एकर सुपीक क्षेत्र व्यापले आहे. त्यात दरसाल वाढ होत आहे. बांध-बंदिस्तीचा खर्च जवळजवळ दरसाल करावा लागत आहे. कारण दरसाल खाऱया पाण्याचे आक्रमण वाढतच चालले आहे.

खार जमिनीच्या प्रश्नांबरोबरच जलवाहतुकीचा सवालही तयार झाला. 25-30 वर्षांपूर्वी मुंबईच्या जुन्या भाऊच्या धक्क्यापासून गोव्यापर्यंत मोठय़ा बोटींनी वाहतूक चालत होती. खाडय़ांच्या तोंडावर बंदरे होती. तिथे बोटी लागत. प्रवासी उतरत-चढत.
खाडय़ांच्या अंतर्भागातसुद्धा लाँचेस-लहान बोटी यांची वाहतूक दिवसभर चालत होती. मासेमारी चालत होती.
आज या दोन्ही प्रकारची जलवाहतूक बंद आहे.

कारण तेच. खाडय़ा गाळाने भरल्या. त्यामध्ये लहान लाँचसुद्धा चालू शकत नाही.

खाडय़ांमधून आलेला गाळ साचून मुखाजवळची बंदरे भरली. कोकणची बोट बंद झाली. शेवटची बोट चौगुल्यांनी चालवली. तीसुद्धा बंद पडली. कारण बंदरे गाळाने दूरपर्यंत भरली. बोटी बंदरात लागेनाशा झाल्या.

आता प्रश्न येतो खाडय़ा नि बंदरे भरून टाकणारा, लाखो एकर जमीन खारजमीन बनवणारा इतका प्रचंड गाळ आला कुठून नि कसा?

महाराष्ट्र राज्य झाले त्या वेळी सहय़ाद्री पर्वताचा पश्चिमेकडला म्हणजे कोकणामधला भाग अगदी पायथ्यापर्यंत घनदाट जंगलाने झाकलेला होता. थोडय़ाच काळात कोळसा-लाकडी कोळसा तयार करून विकण्याचा धंदा करणाऱयांची नजर वळली. त्यांनी गावांमधले मोठे लोक आणि सरकारी अधिकारी यात वनखात्यापासून मामलेदार, कलेक्टर यांच्या अधिकार क्षेत्रातले अधिकारी यांच्याशी संगनमत करून एक साखळी तयार केली. गावकऱयांनी वाघ नांगराची जनावरे खातो. वाघ मारा नाहीतर जंगल तोडा अशी मागणी करायची. बाकी सगळे कंत्राटदार बघून घेत.

यामुळे पुढची कित्येक वर्षे जंगल तुटत राहिले. सहय़ाद्री ओकाबोका झाला. गोवा महामार्गाच्या कडेला कित्येक वर्षे कोळशाच्या भट्टय़ा पेटत राहिल्या.

नद्यांच्या उगमाकडे डोंगरांवर झाडेच राहिली नाहीत. त्यामुळे पावसाळय़ात पूर्वी धूप होत नसे, ती आता व्हायला लागली. डोंगर उतारावरच्या जमिनी यावरचा गाळ मोठय़ा प्रमाणावर खाडय़ांमध्ये येऊ लागला. भरतीचा खालून जोर बसल्यामुळे तो खाडय़ांमध्ये आणि त्यांच्या मुखाशी असलेल्या बंदरांमध्ये साचत गेला आणि कोकणचे ‘कल्याण’ झाले.

खाडय़ा गाळाने भरण्यामागच्या खऱया कारणांचा कोणत्याच सरकारांनी कधी विचारच केला नाही. त्यामुळे वन, खारजमीन आणि बंदरे ही एकाच मोठय़ा खात्यात असायला हवी होती ती तशी आली नाहीत. आजसुद्धा हे तीन घटक वेगवेगळे आहेत. त्यांच्या एकत्रीकरणाची गरज आहे. तरच खाडय़ांपासून बंदरांपर्यंतचा गाळ काढण्याचा, खणून आणि जबरदस्त वनीकरण करण्याचा एकत्रित विचार होऊ शकेल अन्यथा नाही. राज्य सरकारने याची दखल घ्यावी.

गाळाचे करायचे काय?

खाडय़ा आणि बंदरे यांच्यामधला गाळ म्हणजे शेवटी साधी मातीच आहे. ती काढली तर सरकारला त्याचा दोन प्रकारे फायदा करून घेता येईल.

रस्ते बांधणीसाठी भराव लागतो. त्यासाठी डोंगर फोडावे लागणार नाहीत किंवा माती विकत आणावी लागणार नाही.

सध्या बांधकाम व्यवसायाला जमीन योग्य तऱहेने तयार करण्यासाठी मातीची प्रचंड गरज असते. त्यांच्या ‘कृपे’ने पनवेलपासून पेणपर्यंतच्या सगळय़ा खाडय़ा, डोंगर एवढेच काय, सपाट जमिनीसुद्धा अक्षरशः ओरबाडून नेल्या जात आहेत. त्यांना खाडय़ांमधला गाळ विकून सरकार पुष्कळ पैसा उभा करू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या