नवल- धबधबे गोठले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या थंडीत जगातले कोठले धबधबे गोठले? तर पहिली चर्चा होणार ती अर्थातच अमेरिका आणि कॅनडा देशांच्या सीमेवर असलेल्या नायगारा धबधब्याची. प्रचंड शीतलहरींनी हा धबधबा अनेकदा गोठतो. या धबधब्याची रुंदी आणि प्रचंड पाणी कोसळत असल्याने येणारा रोरावणारा आवाज मंद होऊ लागला की, आसपासच्या परिसराला आपोआपच कळतं. नायगारा नदी उत्तर ध्रुवीय हिमवाऱ्यांनी गोठत चालली की तिचा धबधब्याच्या रूपाने कोसळणारा प्रवाहसुद्धा गोठतो. त्यामुळे अचानक निर्माण होणारी शांतता सभोवतालच्या जीवसृष्टीला ‘असह्य’ वाटते; कारण सतत त्या प्रवाहाच्या लयबद्ध ध्वनीची सवय झालेली असते.

नायगारा नदीचा प्रवाह बर्फाळ झाल्याने एक ‘वंडरलँड’ तयार झाल्याचा आनंद मात्र पर्यटकांना मिळतोय. आता एखादी नदी किंवा धबधबा गोठतो तेव्हा तो आईस कँडीसारखा (Ice Candy) आतून-बाहेरून घट्ट होत नसतो. नदीच्या पाण्याच्या पृष्ठभागावरचे बर्फ जसे घट्ट होते, तसेच धबधब्याच्या प्रवाहाचेही होते. नदीचा आणि धबधब्याचा प्रवाह त्याखालून मंदपणे वाहतच असतो. तरीसुद्धा या धबधब्याचे गोठणे म्हणजे ५० फूट जाड बर्फाचा थर निर्माण होणे असते. ते पाहायला अर्थातच पर्यटक प्रचंड गर्दी करतात.

कॅनडामधला ‘हेमकेन’ हा ६० फुटी धबधबासुद्धा कडाक्याच्या थंडीत गोठतो. नायगारा धबधबा गोठण्याची नोंद (फोटोसह) १८४८, १९११-१२, १९१७, २०१४-१५ आणि २०२२ या वर्षी झालेली आहे. या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस नायगारा गोठला. कॅनडामधील ‘काकाबेका’ हा ओन्टेरिओ (Ontario) प्रदेशातला धबधबा ‘उत्तरेकडचा नायगारा’ समजला जातो. तोसुद्धा कडाक्याच्या हिवाळ्यात गोठून बर्फाची ‘भिंत’ तयार करतो. नायगाराच्या अमेरिकेकडील भागास ‘ब्रायडल व्हेल’ (Bridal Veil) तर कॅनडातील भागाला ‘हॉर्स-शू’ (Horseshoe) असे म्हणतात. सध्या नायगाराचा काही भाग गोठलेला आहे.

आपल्याकडेसुद्धा काश्मीरमधील ‘ड्रन्ग’ धबधबा खूप थंडीमध्ये गोठतो. स्पिती खोऱ्यातील धबधबे आणि हिमालयातून कोसळणारे शेकडो लहान धबधबे (कॅस्केड्स – Cascades) हिवाळ्यात गोठतात. असे गोठलेले धबधबे पाहणे ही एक पर्वणी असते. यंदा क्षीण ‘ला-निना’ प्रभावाने थंडी जास्त आहे. दरवर्षी हे धबधबे गोठणबिंदूपर्यंत जातीलच असे नाही. कदाचित ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे प्रमाण वाढले, तर भविष्यकाळात ते कधीच गोठणार नाहीत आणि एका नैसर्गिक चमत्काराची मौज पाहायला मिळणार नाही.