संस्कृती -निरंतर गणेशकृपेचे धनी व्हा!

>> दाजी पणशीकर

गणेश चतुर्थीला गणेश मूर्ती घरी आणल्यानंतर प्राणप्रतिष्ठा केली जाते. म्हणजे ती मूर्ती सजीव होऊन पूजेला योग्य होते. विसर्जनापूर्वी उत्तरपूजा झाल्यानंतर आपण अक्षता टाकतो. म्हणजे मूर्तीत संक्रमित झालेले ‘प्राणतत्त्व’ निघून जाते. गणपती आणि 21 ही संख्या हेदेखील एक समीकरण बनले आहे. गणेशचतुर्थीला 21 दुर्वा आपण वाहतो. खरे म्हणजे 1 दुर्वाही पुरेशी असते. ती पुढेही आपण अर्पण केली पाहिजे. कारण संख्या महत्त्वाची नाही, भाव महत्त्वाचा! म्हणून प्रत्येक तिथीला एका दुर्वेने श्री गणरायांना सन्मान द्या आणि निरंतर गणेशकृपेचे धनी व्हा…!

ठार अंधश्रद्धेतून रूढ झालेल्या चुकीच्या पद्धती जनमानसात इतक्या खोलवर रुतून बसलेल्या असतात की, त्यांचे समूळ उच्चाटन प्रत्यक्ष परमेश्वराने अकरावा अवतार घेतला तरी त्याला ते शक्य होईलसे वाटत नाही! सर्वसामान्य माणसे ‘गतानुगतिक’च असतात. त्यांना आपल्या कृतीतून कल्याण होण्याशी काही कर्तव्य नसते!

गणेशचतुर्थीला मातीची गणेशमूर्ती घरी आणल्यानंतर पूजेच्या प्रारंभी त्या मूर्तीत ‘प्राण संक्रमण’ करण्यासाठी ‘प्राणप्रतिष्ठा’ हा विधी केला जातो. त्यामुळे त्या मातीच्या मूर्तीत ‘प्राणतत्त्वाचा’ प्रवेश होऊन, त्या मूर्तीत ‘देवकळा’ संचरून ती मूर्ती सजीव होते, म्हणजे ती बाजारातून आणलेली मूर्ती पूजा करण्यायोग्य होते!

आता अनुक्रम लक्षात घ्यावा. विसर्जनादिवशी संध्याकाळी किंवा दुपारनंतर चतुर्थीच्या मूर्तीची थोडक्यात पंचोपचारांनी म्हणजे फक्त पाच उपचारांनी नाममात्र पूजा केली जाते. नंतर एखादी आरती म्हणून पूजेची सांगता होते. चतुर्थी दिवशी मातीच्या मूर्तीत ‘प्राण संक्रमण’ विधी करून ती मूर्ती ‘सजीव’ केलेली असते. त्याला ‘चल प्रतिष्ठा’ असे म्हणतात. आपल्या घरातील देव्हाऱयात ज्या मूर्ती असतात त्या सर्व ‘चल प्रतिष्ठा’ केलेल्या असतात. ‘चल’ म्हणजे जागेवरून हलवता येण्यासारख्या मूर्ती. मंदिरातील मूर्ती घट्ट केलेल्या असतात. त्या इकडून तिकडे हलवता येत नाहीत. त्यांना ‘अचल प्रतिष्ठत’ मूर्ती असे म्हणतात. आता चतुर्थीची ‘सजीव’ गणेशमूर्ती पाण्यात कशी विसर्जित करावयाची? म्हणून पूजेच्या प्रारंभी त्या मूर्तीत जे ‘प्राणतत्त्व’ संक्रमित केलेले असते ते विसर्जनापूर्वी म्हणजे पंचोपचाराची ‘उत्तर पूजा’ झाल्यानंतर हातात अक्षता घेऊन पुढील मंत्र म्हणून

‘यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।

इष्ट काम प्रसिद्धय़र्थं
पुनरागमनायच ।।11।।’

त्या अक्षता मूर्तीवर टाकून त्या मूर्तीत प्रारंभी संक्रमित केलेले ‘प्राणतत्त्व’ काढून घ्यायचे व ती पुजलेली मूर्ती पुन्हा ‘निर्जीव’ करून ‘विसर्जना’योग्य करायची असते!

आता हे लक्षात घ्यावे की, उत्तरपूजा झाल्यानंतर पूजेची मूर्ती जागेवरून जराशी हलवली जाते! आता त्या मूर्तीची पूजा गणेशभक्त दीड, पाच, सात किंवा दहा दिवस करीत होते. ती पुजलेली मूर्ती आता ‘निप्राण’ झालेली आहे! ती मूर्ती आता पूजेच्या योग्य राहिलेली नाही.  मग पाण्यात विसर्जनाआधी त्या मूर्तीची गणेशभक्त समुद्रावर किंवा जलाशयावर पूजा, दहीभाताचा नैवेद्य व कापूरआरती का करतात? तेव्हा थोडा तरी विचार करा!  आजवर चालू असलेल्या प्रथेला समुद्रातून बुडवून टाका. वातावरणातील ‘जीवघेण्या’ पर्यावरणाला संरक्षण द्या!!

*****

सर्वसामान्य माणसे गतानुगतिक कशी असतात त्यासंदर्भात ‘पंचतंत्र’ या जगप्रसिद्ध कथासंग्रहात (इ. 373) मध्ये एक कथा आलेली आहे.

समुद्राने एकदा एका टिटव्याची अंडी बुडवून टाकली. तेव्हा त्या टिटव्या पक्ष्याने इतर सर्व टिटव्या पक्ष्यांना एकत्र करून समुद्राविरुद्ध ‘तक्रार’ करण्यासाठी ते सर्व पक्षी गरुडाकडे गेले! ज्याची अंडी समुद्राने बुडवलेली असतात तो टिटवा गरुडाला म्हणाला, ‘समुद्राने माझी हानी केली, तशीच तो इतर निरपराध पक्ष्यांनाही विचार न करत मारून टाकील!’

ही एक रूपक कथा आहे. मुख्य टिटवा म्हणाला म्हणून सर्व बाकीचे टिटवे गरुडाकडे तक्रार करण्यासाठी ‘बिनडोकपणे’ गेले. ते येथे सूचित केलेले आहे!

या संदर्भात काशी नगरीमध्ये घडलेली एक दंतकथा ऐकिवात आहे. ती अशी…

काशीला गेलेला एक तरुण गंगास्नानासाठी गंगेच्या किनाऱयावर गेला. त्या किनाऱयावर यात्रिकांची खूपच गर्दी झालेली. आता बरोबर आणलेल्या तांब्याचे रक्षण आपल्या स्नानाचे वेळी कसे करणार, अशा चिंतेत तो तरुण पडला असताना त्याला एक भन्नाट कल्पना सुचली! त्याने आपल्याजवळचा तांब्या तीरावरच्या वाळूत पुरून ठेवला व खुणेसाठी त्यावर त्या तरुणाने वाळूचे एक ‘शिवलिंग’ करून ठेवले व तो गंगा नदीत स्नानासाठी पाण्यात उतरला. इकडे गंगातीरावर आलेल्या इतर अनेक यात्रिकांनी तरुणाने तयार केलेले ते ‘शिवलिंग’ पाहिले. त्या इतर यात्रिकांना वाटले की, गंगास्नानापूर्वी असे शिवलिंग तयार करण्याची काशीत प्रथा असावी, म्हणून त्या सर्व इतर यात्रिकांनीही भराभर तशीच वाळूची शिवलिंगे करून मग तेही गंगास्नानाला गेले. तिकडे स्नान करून परतलेला तरुण आपला तांब्या शोधण्यासाठी शिवलिंगाची खूण पाहू लागला तर त्याला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. कारण गंगातीरावर सर्वत्र शिवलिंगांचीच गर्दी झालेली! स्वतःचा तांब्या शोधता शोधता तो तरुण थकला व कंटाळला. या बोधकथेवरूनही आपल्याला बरेच काही शिकता येते.

गणपती आणि 21 ही संख्या असे एक समीकरणच बनले आहे. गणेशाला दूर्वा 21, मोदक 21, दक्षिणा 21च्या पटीत, अथर्वशीर्षाची आवर्तने 21, सुवासिनींना वाणे दिल्यास तीही 21, कुमारिकांचे पूजन 21 संख्येतच! अशी ही 21 संख्येची परंपरा आहे. पण 21 संख्या जमली नाही तर एकही दूर्वा गणेशाला फार प्रिय असते हे विसरू नये म्हणून गणेश चतुर्थीला गणेशाला शक्य असतील तेवढय़ा दूर्वा तर तुम्ही अर्पण कराच, पण पुढे वर्षभर प्रतिदिन, प्रत्येक तिथीला त्याला एकतरी दूर्वा अर्पण कराच. ही एक दूर्वाच तुमचे आयुष्य अधिक यशस्वी व सुगंधी करून जाईल हे लक्षात ठेवा. येथे संख्या महत्त्वाची नाही. भाव महत्त्वाचा असतो! म्हणून प्रत्येक तिथीला, प्रत्येक चतुर्थीला एका दूर्वेने सन्मान द्या. आदर द्या, अर्घ्य द्या आणि त्या करुणाघन गणेशाच्या निरंतर कृपेचे धनी व्हा!

(लेखक ज्येष्ठ आध्यात्मिक साहित्यिक आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या