
>> अनघा जोशी
बाराखडी आणि उजळणीच्या आधीपासून गाण्यांच्या संगतीत वाढलेले साहित्यिक मधुकर धर्मापुरीकर, हे एक हरफनमौला व्यक्तिमत्त्व. व्यंगचित्र संग्राहक व समीक्षा या क्षेत्रात ते अवलिया ठरत चालले आहेत.कथा लिहिणं हे त्यांचं मूळ सृजन. विविध विषय निवडून एकाच विषयावरील कथांच्या संपादनात ते स्वतŠला अगदी झोकून देतात. आताशा पाहायला गेलं तर सध्या ते हिंदी कथांच्या मराठी अनुवादाकडे प्रकर्षाने वळलेले दिसतात. चित्रपटगीतवेडे आणि उर्दू शायरीचे निस्सीम चाहते असल्याने तोही छंद ते सातत्याने जपत असतातच. त्यांचं ‘गीतमुद्रा’ हे सिनेगीतांवर लालित्यपूर्ण लिहलेल्या लेखांचं पुस्तक. याची दुसरी आवृत्ती आता वाचकांसाठी उपलब्ध झालेली आहे.
लोकप्रिय गाण्यांपेक्षाही दुर्लक्षित गाणी ऐकणं ही त्यांची प्रकृती. आणि अशा कैक शेकडो गाण्यासंबंधीच्या वैयक्तिक गीतमुद्रांची कोरीव लेणी आहे हे पुस्तक.
खरं सांगायचं तर, गाण्यांच्या रम्यक जंबुद्विपात घेऊन जातं आणि तत्सम सम्यक दृष्टीदेखील देतं आपणास ‘गीतमुद्रा’ हे पुस्तक. काळ, पिढ्या आणि भावना यांना जोडणारा हा संग्रह पटवून देतो की, गाणी अविरतपणे माणसाच्या आठवणीत जिवंत राहतात. ती केवळ ऐकण्यापुरती नसून, जगण्याचा हिस्सा बनून जातात. गाण्याबद्दलच्या आत्यंतिक आत्मियतेतून हे लेखन झालेले आहे. यात समाविष्ट असलेले पहिल्या आवृत्तीतील बावीस आणि दुसऱया आवृत्तीत दुसऱया भागात नव्याने दिलेले पाच लेख वाचताना त्यात आपण बेमालूमपणे तल्लीन होत जातो. या पुस्तकासाठी ऑफ व्हाईट-क्रीमीश पानं घेऊन शब्दालय प्रकाशनाने जणू गाण्यांचा बाणेदारपणा जपलेला आहे. यामुळे छापील मजकुरात लपलेला शांत, सौम्य, मऊसर उबदारपणा अधिकपणे जाणवत जातो.
गाणं अनुभवायची त्यांची रीत गाव, थेटरे, मित्र आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या या झाडावरून त्या झाडावर मारलेल्या सूरपारंब्या यांचे उत्कट वर्णन देणारी अशी आहे, असे मत बाबू मोशाय हे लेखक पुस्तकाच्या प्रस्तावनेत देतात. आपणासही जाणवणाऱया बाबी आहेत. त्या अशा- स्मृतीत मंतरलेली गाणी, म्युझिक सेंटरच्या आठवणी, सिनेमा न पाहताच केवळ रेडिओवर ऐकून मन हरखून टाकणारी गाणी, गाणी ऐकत अभ्यास करताना ऐकत असलेली गाणी, त्यासोबत शाळामास्तर यांची ओघाने आलेली वर्णने, आई-वडिलांच्या खास आवडीची गाणी या साऱयांची तीव्र अनुभूती यातील लेखनात उतरलेली आहे. त्यामुळे या एकत्रीकरणाचे चित्रदर्शी स्वरूप वाचावयास आपणास आवडत जाते. यासंदर्भाने गाण्यासाठी असलेलं भावुक मन, अनुभवाची जाण, गाण्याची चाल, गायिकी, धून आणि वाद्यांचा नागमोडी स्पर्श या सर्वांचं केलं गेलेलं वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षण, तेही गमतीजमतीतून आले आहे.
टॉकीजच्या बहाराचा तसेच दुर्दशेचा काळ ’मोती आणि शिंपले’तून एका नाइलाजाच्या हळहळीने व्यक्त होतो. रेडिओवर चालणाऱया विविध कार्यक्रमासोबत त्यावर लागणाऱया जाहीरातींच्या छानशा हकीकतीदेखील कळतात.
घर आजा घिर आये, जब जब फुल खिले, तुझे याद किया हमने, छोटीसी ये जिंदगानी रे,’ जाने कहाँ गयी,’ ‘नैन द्वार से मन वो आके तन में आग लगाये’, अशा दुःखमिश्रीत गीतातील ताल, त्याच्याशी लपेटलेली भावभावनांची घुंगर. त्याचा नाद शब्दांतून रसिक मनापर्यंत पोहोचवला
गेला आहे. अशा अवलोकनासोबत पुढे एका गाण्याचे रंग दुसऱया गाण्यांत कसे मिसळलेले असतात याची उदाहरणं शोधण्यात मन कसं गुंतून राहातं हेही यातून कळते. ‘काहे भरे तोरे नैन’ या लेखातून स्त्राrमनात चालणारे मिलनरंग भाव, तेही पुरुष गायकाच्या माध्यमातून कसे चालतात यातील सहानुकंप जपलेला दिसून येतो.
‘ना तो कारवाँ की तलाश है’ या अजरामर कक्वालीचा कक्वालीपट दोन लेखांतून अगदी सविस्तरपणे मांडला गेलेला आहे. तो संगीतकार रोशन यांच्या लांबच्या लांब कक्वालीप्रमाणेच गुंतवून ठेवतो. आणि गाण्यातून मनामनास समजून घेणारी रहगुजर गीतमुद्रेच्या स्वरूपात जणू मिळाली आहे असे या लेखाची जोडगोळी वाचताना वाटत जाते. वडिलधारी गाणी अशी गाण्यांना दिलेली उक्ती किती वेगळा भाव निर्माण करते आपल्यात. नवीन दुसऱया भागात जोडलेल्या पाचही लेखांत तर सहसा कुणासही अनाकलनीय असलेले गाण्यासंबंधीचे मुद्दे सहजपणे शोधले गेले आहेत. वाचकास याचा एक अचंबा वाटू लागतो. गाण्यासंबंधी निपजलेली ही संवेदनक्षमता निसर्गदत्तच असावी लागते हेच खरे.
आठवणींच्या या गीतमुद्रा आणि गाण्यांच्या शिल्पाकृती पानापानांतून वाचत जात असताना वाचकासही त्याच्या स्वतŠच्या गीत जाणीवा उत्स्फूर्तपणे साद घालत राहतात. गाण्यांवर लिहिण्याची प्रेरणा देतात. हे या पुस्तकाचे मोठे यश म्हणता येईल. यामुळे गीतानुभूतीच्या निरनिराळ्या जाणिवेतून जेव्हा केव्हा गीतभक्तास जावे वाटेल तेव्हा तेव्हा या पुस्तकाचे पारायण करावे असेच पुस्तक आहे गीतमुद्रा!
गीतांविषयी ‘अंदाजे-बयाँ और…’ असलेले हे एक विरळे लेखन गीतांची धरोहर होईल असे बनले आहे.

























































