लेख – वातावरणातील बदलाचे आव्हान

  • डॉ. सत्यपाल कदम

वातावरणातील बदलासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यातही प्रामुख्याने जास्तीत जास्त वृक्षारोपण करून व जंगलतोड थांबवून हवामान बदलासारख्या महाराक्षसाचा मुकाबला करता येईल. नाहीतर जोशी मठ उत्तराखंडातील दुर्घटनांची मालिका नित्याचीच होऊन बसेल. अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा, समुद्र पातळीत होणारी वाढ यामुळे भविष्यात 70-80 वर्षांत जागतिक पातळीवरील  तापमान वाढीमुळे उत्तर धुवावरील असणारा बर्फ वितळून समुद्रीय पाण्याच्या पातळीत इतकी वाढ होईल की, पृथ्वीवरील सर्व अस्तित्व पाण्याखाली जाईल व पृथ्वी जलमय होईल यात कुठलीही शंका नाही.

भूगर्भाच्या कालगणनेनुसार पृथ्वीच्या तापमानात सातत्याने बदल

होतो. सध्याचे जगाचे तापमान हे सरासरी 15 डिग्री आहे. भूतकाळातील तापमानाचे स्वरूप हे सध्याच्या तापमानापेक्षा वेगळं आहे. हिमनदी फुटते, हिमकडा कोसळतो म्हणजे नेमकं काय? उत्तराखंडच्या ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाजवळ हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली.ग्लोबल वार्ंमगमुळे वातावरणात बदल होतो व त्यामुळे हिमकडे वितळून खाली पडतात, कोसळतात हा वातावरणीय बदलाचा पुरावाच आहे.

प्रदूषण ही जागतिक समस्या आहे. आपण जी जीवनशैली अंगीकारली आहे, तीच निसर्गाला मारक ठरत आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे प्रदूषण होते. विकसित व विकसनशील देशात मोठय़ा प्रमाणात उद्योग विकास झाला त्यात कोळसा ऊर्जा प्रकल्प जगात सर्वात प्रदूषण करणारे ठरले. त्यातून प्रदूषण वाढवणारे तापमान वाढवणारे कार्बन वायू आणि सोबत सल्फर डायऑक्साईड, मिथेन, कार्बन मोनॉक्साईड इ. घातक वायू मोठय़ा प्रमाणात उत्सर्जित होतात, तर सिमेंट, कागद, रसायन या उद्योगांतून ‘ग्रीन हाऊस गॅसेस’ उत्सर्जित होतात. सध्याच्या जागतिक तापमान वाढीचा फटका हिंदुस्थानास बसेल असा निष्कर्ष आयपीसीसी या हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने (UNEP) काढला आहे.

जागतिक तापमान आता सर्वोच्च सेल्सियस पर्यंत पोहोचले आहे आणि नैसर्गिक आपत्तीस सुरुवात झाली आहे. यापुढे तापमान गेल्यास जगाला, विशेषतः हिंदुस्थानला त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यात उष्ण लहरींचे मोठे संकट हिंदुस्थानवर येईल असा इशारा हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या आयपीसीसी या संस्थेने दिला आहे.

आता पर्यावरण विनाश टाळण्यासाठी जगाकडे केवळ 10 वर्षे उरली आहेत. 2030 ही तापमान कमी करण्याची सीमा ठरवली आहे. यात हिंदुस्थानसारख्या उष्ण कटिबंधीय देशात मोठय़ा प्रमाणात उष्ण लहरींचा प्रभाव जाणवत आहे असा अहवाल देण्यात आला आहे. पृथ्वीवर गेल्या लाखो वर्षांपासून वातावरण, हवामान आणि पर्यावरण यांचा निसर्ग नियमाप्रमाणे समतोल राखला गेला आहे. सर्व सजीवांचा विकाससुध्दा अशाच पर्यावरणात झाला.

सर्व नैसर्गिक हरित वायू प्रदूषके आणि कार्बन वायू शोधून घेण्याची क्षमता जंगलात होती. मानव आणि सजीवांचे पोषण करण्याची क्षमता बनत होती. तसेच मानव आणि सजीवांचे पोषण करण्याची क्षमता पर्यावरणात होती, परंतु जीवनाचा आधार असलेली ही मानवाच्या वैज्ञानिक व यांत्रिक प्रगतीमुळे आपण तोडायला सुरुवात केली. औद्योगिक क्रांतीच्या नावावर प्रदूषण वाढले, शहरीकरण झाले, लोकसंख्या वाढली आणि ज्या आधारावर सृष्टीची रचना झाली तो आधारच आपण हळूहळू काढून टाकायला सुरुवात केली. आता त्याचाच परिणाम तापमानवाढ हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीच्या स्वरूपाने आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत.

विज्ञान आणि तंत्रज्ञान वाढीमुळे आरोग्याच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मानवाचे आयुष्य वाढले, लोकसंख्या प्रचंड वाढली. त्यामुळे जंगले व जीवन आणि नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रचंड ताण आला व ते नष्ट होऊ लागले. शेवटी या सर्वांचा परिणाम मानवावरच होणार असून मानवाचे पृथ्वीवर राहणे अशक्य होणार आहे. यासाठी आयपीसीसीने दिलेला अहवाल हिंदुस्थानसाठी धोक्याची घंटा आहे. थर्मल पॉवर स्टेशन, सिमेंट उद्योग, कागद उद्योग आणि विविध कारखाने यामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून यामुळे ओझेन  थर विरळ होत आहे व त्याचा छिद्र पडल्यामुळे सूर्याचे किरण पृथ्वीवर सरळ पडत असल्याकारणाने कॅन्सरसारखे रोग वाढत आहेत. तसेच ध्रुवावरील बर्फ वितळणे, तापमानात वाढ, हवामान बदल, समुद्राच्या पातळीत वाढ, नैसर्गिक आपत्ती असे आपण अनुभवत आहोत.

हवामान बदल हा वैश्विक चक्र, सौरचक हिमयुग या सर्वांशी निगडित आहे, पण वैश्विक उपवृध्दीबद्दल बोलताना आपण प्रामुख्याने मानवी कृतीमुळे झालेल्या बदलासंबंधी विचार करतो. हवामान बदल हे विकासाचे एक उपउत्पादन आहे किंवा समाजातील प्रबळ गटाने चोखाळलेल्या विकासाच्या मार्गाचे उपउत्पादन आहे. मात्र हवामान बदलाचे भयानक परिणाम असा काही या लोकांच्या पदरी पडला आहे की, हे संकट येण्यामागे या घडीला तरी त्यांचा काही हातभार लागलेला नाही, ज्यांना या विकासाचा काही फायदा झाला नाही. दुर्दैवाने समाजातील हा प्रबळ गट अजूनही योग्य प्रश्न विचारत नाही आणि मुख्य मुद्दय़ाकडे दुर्लक्ष करत आहे.

विसाव्या शतकात समुद्र पातळी 10 ते 20 सें.मी. वाढली. 2100 मध्ये त्यात 18 ते 56 सें.मी एवढी वाढ झाली. तापमान वाढल्यामुळे हिमखंड वितळण्याची संख्या वाढू लागली. ज्याचे रूपांतर समुद्र पातळीत वाढ होण्यामध्ये झाले. हे हिमनग किती वेगाने वितळतील हे खात्रीपूर्वक सांगता आले नाही तरी एवढे भाग नक्की की, जर हे खूप मोठय़ा प्रमाणात वितळले तर समुद्रातील पाण्याची पातळी वाढून बांगलादेश याप्रमाणे किनारपट्टीवरील लाखो लोक बेघर होतील व मालदीवसारखी काही बेटे जगाच्या नकाशावरून पुसली जातील.

जागतिक तापमान वाढीचा व वातावरणीय बदलाचा दुष्परिणाम जागतिक असला तरी तो हिंदुस्थानवर तसेच पर्यायाने महाराष्ट्रावर दुष्परिणाम करणारा आहे. त्यामुळे येत्या काळात ‘माझी वसुंधरा अभियाना’तील सर्व घटकांची प्रभावी अंमलबजावणी करावी याची सुरुवात सरकारी कार्यकमातून करावी. सरकारी कार्यालयातील ऊर्जा, पाणी, वापराचे लेखापरीक्षण, कचऱ्याचे व्यवस्थापन, साधन व सामग्रीचे व्यवस्थापन, परिवहन साधनांचे व्यवस्थापन व लेखापरीक्षण, कार्यालय परिसरातील वृक्ष आच्छादन आदींवर कार्य करावे तसेच सर्वांनी आपल्या प्राधान्याने या योजनेचा समावेश करावा.

वातावरणातील बदलासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यातही प्रामुख्याने जास्तीत जास्त वृक्षारोपण करून व जंगलतोड थांबवून हवामान बदलासारख्या महाराक्षसाचा मुकाबला करता येईल. नाहीतर जोशी मठ उत्तराखंडातील दुर्घटनांची मालिका नित्याचीच होऊन बसेल. यापासून वाचायचे असेल तर अपारंपरिक ऊर्जास्रोत (सोलर-विड-हायड्रो) आणि बायोएनर्जी वाढविली पाहिजे. आपली उद्योगआधारित अर्थव्यवस्था बदलून वन, वृक्ष, शेती आणि निसर्ग आधारित निरंतर अर्थव्यवस्था निर्माण करणे काळाची गरज आहे. आपण आपली पूर्वीची जीवनशैली बदलून निसर्गाला पूरक अशी जीवनशैली अंगीकारली पाहिजे अन्यथा जो निसर्ग आपल्याला जगवतो तोच मारणार आहे. आता वेळ कमी आहे. पर्यावरण संवर्धनाकडे तातडीने लक्ष देणे हीच काळाची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या