आरोग्य गणेश : श्रींची विज्ञाननिष्ठता

बाप्पाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. श्रींची विज्ञाननिष्ठता स्वतःपासूनच सुरू होते. त्यामुळे त्यांची पूजाही विज्ञानाशी, आरोग्याशी सुसंगत असते. पूजेतील घटकच पाहा नागूळखोबरं, सुकामेवा,  दुर्वा, जास्वंद प्रत्येक घटक आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आणि औषधी

 सुकामेवा

सुक्यामेव्यात काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, खारीक हे सर्व घटक असतात. या प्रत्येक पदार्थात परिपूर्ण पोषक द्रव्ये असतात. यातून कार्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे एकाचवेळी शरीराला मिळतात. त्यात स्निग्ध पदार्थ भरपूर असल्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना किंवा कोलेस्ट्रॉलचा त्रास असणार्‍यांना तो गुणकारी ठरतो. त्यातील लोह, पोटॅशियम, मॅग्निशियम, झिंक, सेलेनियम ही खनिजे हाडांना फायद्याची ठरतात.  

कापूर

आरतीच्या वेळी कापूर जाळला जातो. त्यातून मिळणारा प्राणवायू घरातील वातावरण शुद्ध करतो. घरातील दुर्गंधी घालवून कीटकही घालवतो. त्यामुळे आजूबाजूचा परिसर शुद्ध करण्यासाठी कापूर महत्त्वाचा आहे. घरातील सदस्यांची मनंही प्रसन्न होतात. एक उत्साही वातावरण तयार होतं. कापूर तेलात भिजवून ते तेल सांध्यांना लावले तर सांधेदुखी दूर होते. हे तेल केसांना लावले तरी केसांची वाढ चांगली होते.  

पंचामृत

बाप्पाच्या पूजेच्या साहित्यात पंचामृत असते. यात दूध, तूप, मध, दही आणि साखर हे पाच पदार्थ असतात. ते आरोग्याला पोषक असतात. पंचामृत गणेशोत्सवातच नव्हे, तर दररोज चमचाभर घेतले तर फायदा होईल. ऑसिडीटीवर ते गुणकारी ठरेल. त्यात दूध, तूप असे ऊर्जादायी पदार्थ असल्यामुळे लगेच ऊर्जा मिळते. मध, साखर हेही ऊर्जादायीच… त्यामुळे अशक्त आणि मरगळ भरलेली आहे अशांना ते उपयुक्त ठरते. पंचामृतामुळे तणाव दूर होतो. दूध आणि तूप हे बुद्धिवर्धक असते. दररोज एक चमचा पंचामृत घेतलं तर अर्धशिशी बरी होईल.  

गूळखोबरे

बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे गूळ-खोबरे. नैवेद्य म्हणून वापरले जाणारे गूळ-खोबरे शरीराला अतिशय गुणकारी आहे. यात उपयुक्त जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतूमय पदार्थ असतात. गुळात लोह आणि पोटॅशियम असतं. त्यामुळे हिमोग्लोबीन वाढवायला मदत होते. त्यातील ऍण्टी ऑक्सिडंट शरीराला आरोग्यदायी असतात. खोबर्‍यात मुबलक तंतूमय पदार्थ आणि उपयुक्त स्निग्ध पदार्थ असतात. मोदकाचे व करंजीचे सारण करताना गूळ-खोबर्‍याचे मिश्रण वापरतो. खोबर्‍यामुळे गुळातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण करणं सोपं जातं. मधुमेह्यांनीही हे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले तरी नुकसान होत नाही.  

जास्वंद

गणपतीला आवडणारे फूल म्हणजे जास्वंद. जास्वंद थंड प्रवृत्तीचे फूल. या फुलाचे तेल बाजारात उपलब्ध असतं. शरीरातील उष्णता घालवण्यासाठी जसा जास्वंदाचा उपयोग होतो तसाच केसांच्या वाढीसाठी जास्वंदाच्या तेलाचा वापर केला जातो. जास्वंद वाटून त्याचा लेप केसांना लावला तर केसगळती थांबते. त्यामुळे केवळ गणेशोत्सवातच नाही, तर जास्वंदाचा, वापर आपण जीवनात नियमित करावा.  

दुर्वा

गणपतीची ही लाडकी वनस्पती. पण थंड प्रवृत्तीच्या दुर्वांचा वापर इतर वेळीही केला तरी फायदा होतो. दुर्वांचा रस किंवा त्या नुसत्या खाल्ल्या तरी ऑसिडीटी, पित्त यावर गुणकारी असतात. यामुळे रक्तदोषही दूर होऊ शकतो. त्याचबरोबर दुर्वांवरून सकाळी अनवाणी चालले तरी डोळ्यांसाठी ते फायद्याचे ठरते. डोळ्यांवरील ताण त्यामुळे कमी होतो.