चिरंतन आल्हाददायक सावली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> क्षितिज झारापकर

‘हिमालयाची सावली’ प्रा. वसंत कानेटकरांचे सदाबहार नाटक. पुन्हा नव्याने, कसलेल्या जुन्या नव्या कलावंतांनी जोमदार उभे केले आहे.

एक चोख नाटक कसं असतं याची प्रचीती नव्याने रंगमंचावर आलेल्या ‘हिमालयाची सावली’ या नाटय़प्रयोगाने मिळाली. सुरुवातीलाच असं लिहून समीक्षा काय असणार हा पेपर फोडला असं वाटेल कदाचित, पण तसं नाहीये. रसिक प्रेक्षक जेव्हा पदरचे चार-पाचशे रुपये आणि आयुष्याचे अडीच-तीन तास खर्च करून नाटक पाहायला येतात तेव्हा त्यांची ही इन्व्हेस्टमेण्ट वसूल करून देणारं नाटक हे चोख असतं. ‘हिमालयाची सावली’ हे नाटक नाटय़ या कला प्रकाराच्या बहुतेक सगळय़ाच बाबींमध्ये चोख उतरतं. प्रयोग पाहताना कोणतीही एक बाजू वरचढ होत नाही आणि त्यामुळे वेगळी जाणवत नाही. आणि इथेच ‘हिमालयाची सावली’ जिंकतं. हे नाटक उभं करण्याकरिता नाटकाच्या संपूर्ण टीमने अडीच महीने परिश्रम केलेत आणि ती सगळी मेहनत आपल्याला प्रयोगात दिसते.

‘हिमालयाची सावली’ हे प्रा. वसंत कानेटकरांच्या अनेक गाजलेल्या नाटकांपैकी एक. कानेटकरांच्या लिखाणाची समीक्षा इथे होऊ शकत नाही. व्यावसायिक नाटकाचं क्राप्टिंग लिखाणात कसं असावं याचे धडे ज्याच्या नाटकांचा अभ्यास करून पुढच्या अनेक पिढय़ांतील नाटककारांनी गिरवावेत असे गुरुतुल्य कानेटकर. ‘हिमालयाची सावली’ हे नाटक सत्तरीच्या दशकातलं. त्यांचं खूपच मस्त नाटक. थोडक्यात, हे नाटक लिखाणात चोख आहे. मुख्य म्हणजे, आज पन्नास वर्षांनी ते पुन्हा करताना आजच्या अटेन्शन स्पॅनच्या हिशेबात या मूळ तीन अंकी नाटकाचं एडिटेड दोन अंकी व्हर्जन सादर होत नाही. संपूर्ण तीन अंकी नाटक दोन मध्यांतरांसकट सादर होतं. पुन्हा चोख. राजेश देशपांडे हा एक सृजनशील रंगकर्मी आहे. इथे तो दिग्दर्शक आहे. पण सोळा-सतरा वर्षांपूर्वी त्याची एक वधस्तंभ ही सीरियस एकांकिका काळाची गरज म्हणून ‘फ्रीडम ऍट मिडनाइट’ या नावाने चक्क विनोदी करून त्याने सादर केली होती. इतका विस्तीर्ण रंगकर्मी राजेश देशपांडे आहे. काही नाटकं ध्यासापायी करावीत आणि काही श्वासासाठी करावीत हे त्याचं म्हणणं आहे. अनेक हलकी फुलकी नाटकं आणि मालिका श्वासासाठी करत असतानाच तो एखादं ‘हिमालयाची सावली’ ध्यासापायी करू धजतो आणि तिथे कोणतीही तडजोड करीत नाही हे कौतुकास्पद आहे. ‘हिमालयाची सावली’चं दिग्दर्शन राजेशने अत्यंत मर्मस्पर्शी पद्धतीने साधलं आहे आणि म्हणूनच नाटकाचा भावनिक पोत खूप प्रभावीपणे आपल्याला भिडतो. तर ‘हिमालयाची सावली’इथेही चोख आहे.

एकोणीसशे वीसच्या आसपासचा काळ दर्शवणारं हे नाटक आहे. त्यावेळी पुण्याबाहेरच्या रानात एक अबला आश्रम स्थापणारे नानासाहेब हे हिमालयासमान व्यक्तिमत्त्व आणि त्यांची सावली-पत्नी सवित्री (बयो) यांची ही कथा. पहिल्या अंकात हा रानातला आश्रम आणि तिथलं या कुटुंबाचं जेवढय़ास तेवढं बिऱहाड आणि नंतरच्या दोन अंकांत कॅम्पातला भारदस्त इंग्रजी पद्धतीचा वाडा या नेपथ्यावर हे नाटक घडतं. संदेश बेंद्रे या आता ट्रेडमार्क बनलेल्या नेपथ्यकाराने या ‘हिमालयाची सावली’मध्ये जवळ जवळ जादू केलेली आहे. त्याला योग्य साथ श्याम चव्हाण यांच्या प्रकाश योजनेची आहे. देदीप्यमान नेपथ्य संदेशने नाटकाला दिलेलं आहे. सगळी पात्रं ही शंभर वर्षांपूर्वीची वाटण्यासाठी वेशभूषेची विलक्षण सूती मेहनत नजरेत भरते. पोषाख कुठेही खोटे किंवा विनाकारण पीरियोडिक न वाटता साधे आणि स्वाभाविक वाटतात हे वेशभूषाकार मंगल केंकरे यांचं यश आहे. कानेटकरांची नाटकं मेलोड्रामांनी ठासून भरलेली असतात. अशा नाटकांचं पार्श्वसंगीतही मेलोड्रामेटिक असायला हवं. सध्या वाद्यांच्या सुरांना आजचा अभिप्रेत पॉवर साऊंड करण्याची किमया ‘हिमालयाची सावली’मध्ये राहुल रानडे यांनी केली आहे. त्यांनी अजून एक गंमत केली आहे. या नाटकाला राहुलने डेव्हीड लीनच्या सिनेमांना असायची तशी एक एक सांगितिक थीम दिली आहे. या थीममुळे नकळतच नाटकाचा आपल्या अंतर्मनात उभा राहतो. म्हणजेच तांत्रिक बाबींमध्येही हे नाटक चोख, चोख आणि चोख आहे.

नाटकाचे प्रमुख कलाकार सर्वपरिचित आणि प्रस्थापित आहेत. ‘हिमालयाची सावली’ सुरू होतं ते पुरुषोत्तम आणि कृष्णा या सहाय्यक पात्रांच्या प्रवेशाने. इथे कपिल रेडेकर आणि कृष्णा राजशेखर हे अत्यंत नवीन कलाकार आहेत. ही दोघं हा प्रवेश समर्थपणे पेलतात तिथेच ‘हिमालयाची सावली’नाटय़प्रयोग म्हणून यशस्वी होतं. कपिलने त्याच्या पात्राचा त्रागा खूप छान पद्धतीने मांडलाय. कृष्णा राजशेखर एक फ्रेश केमिस्ट्रीने समोर येते. नंतर येणारे जयंत घाटे हे विशेष आब राखून आबाजी साकारतात. पंकज खामकर, प्रकाश सावळे आणि मकरंद नवघरे आपापली पात्रं पुन्हा चोख वठवतात. ऋतुजा चिपडे सूनबाई म्हणून खाष्ट आणि समजूतदार असे दोन्ही रंग व्यवस्थित भरुन उभी राहते. ओंकार कर्वे जगदीश म्हणून शोभतो. विघ्नेश जोशी हा गुणी कलावंत आपल्या मेहुण्याच्या भूमिकेत ठाशीव आहे. त्याचा संताप आणि नानासाहेबांच्या प्रति अपार श्रद्धा विघ्नेशने कमालीच्या सहजतेने दाखवली आहे. दुर्धर व्याधीतून नुकतेच बाहेर पडून नानासाहेब ही जिकिरीची भूमिका शरद पोंक्षे मूर्तिमंत उभी करतात. आपल्या देहबोलीतून, शब्दोच्चारातून आणि काही प्रसंगी केवळ नजरेतून शरद नानासाहेबांच्या सिद्धांतांमुळे आलेली हतबलता आणि जरब या दोन्ही गोष्टी लीलया उभ्या करतो. शरद हा मुळात इतका प्रगल्भ नट आहे की, या नाटकातली हिमालयाची भूमिका अन्य कोणी करू शकेल हा विचार प्रेक्षकांना शिवूच शकत नाही. शृजा प्रभुदेसाई हिने ‘हिमालयाची सावली’मध्ये हिमालयाची सावली तंतोतंत वठवली आहे. बयोची आत्मीयता, स्वाभाविकता, कणखरपणा आणि आईची माया हे सगळं शृजाने जबरदस्त स्वाभविकपणे दाखवलंय. इतकं भव्य नाटक सर्व बाजू सांभाळून सादर केल्याबद्दल प्रकाश देसाई, सुहास रेडेकर, सुप्रिया आणि गोविंद चव्हाण या निर्मात्याचे चोख निर्मिती केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !

नाटक     हिमालयाची सावली

निर्मिती  प्रकाश देसाई प्रतिष्ठान, अद्भुत प्रॉडक्शन्स, सुप्रिया प्रॉडक्शन्स

निर्माते   प्रकाश देसाई, गोविंद चव्हाण

लेखक     प्रा. वसंत कानेटकर

नेपथ्य     संदेश बेंद्रे

संगीत     राहुल रानडे

प्रकाश    श्याम चव्हाण

वेशभूषा  मंगल केंकरे

रंगभूषा   शरद सावंत

दिग्दर्शक  राजेश देशपांडे

कलाकार शृजा प्रभुदेसाई, ऋतुजा चोपडे, कृष्णा राजशेखर, जयंत घाटे, कपिल रेडकर, ओंकार कर्वे, पंकज खामकर, प्रकाश साबळे, मकरंद नवघरे, विघ्नेश जोशी, शरद पोंक्षे

दर्जा