लेख : लोकराज्य संकल्पनेचे जनक

316

>>प्रवीण कारखानीस<<

[email protected]

आठशे वर्षांपूर्वी समाजमनावर वेदशास्त्रपुराणोक्त प्रथा आणि परंपरा यांचा पगडा घट्ट असताना बसवेश्वरांनी अनुभव मंडपच्या (हॉल ऑफ स्पिरिच्युअल एक्सपिअरिअन्समाध्यमातून चर्चासत्रे घडवून आणली. अशा रीतीने त्यांनी समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य केले. वर्णरहित, जातीरहित, कर्मकांडरहित समाज घडवून आणण्यासाठी त्यांनी वीरशैव लिंगायत पंथाची एक प्रकारे पुनर्मांडणी केली. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांची कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध व्हायला हवे. ही काळाची गरज आहे.

लंडनमधल्या थेम्स नदीच्या तीरावरून भटकंती करीत असताना ज्या एका वंदनीय हिंदुस्थानी महापुरुषाच्या अर्धपुतळ्याचे मला अनपेक्षितपणे दर्शन झाले होते त्यांचे नाव महात्मा बसवेश्वर! जगाच्या  इतिहासात लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांची आणि कल्याणकारी प्रजासत्ताक राज्याची संकल्पना सर्वप्रथम मांडणारे द्रष्टे पुरुष म्हणजे महात्मा बसवेश्वर! त्यामुळे  ज्या देशात संसदीय लोकशाही सर्वप्रथम अमलात आली, त्या ब्रिटनच्या संसदेसमोर, थेम्स नदीच्या पैलतीरी बसवेश्वर यांचा पुतळा स्थापित झालेला पाहताना मला निश्चितच आनंद आणि अभिमान वाटला! अल्बर्ट एम्बँकमेंट आणि टिनवर्थ स्ट्रीट यांच्या जंक्शनजवळ साऊथ बँक या नावे ओळखल्या जाणाऱ्या किनारपट्टीवर, लंडन बरो ऑफ कौन्सिलच्या लॅम्बेथ बरोच्या हद्दीत हा अर्धपुतळा आहे. ज्यांच्या पुढाकाराने तो बसविण्यात आला, त्यांचे नाव डॉ. नीरज पाटील! डॉ. पाटील हे ‘बरो ऑफ लॅम्बेथ’चे कौन्सिलर. हे काही वर्षे त्या बरोचे महापौर होते. ते स्वतः कन्नड भाषिक असून त्यांनी पाठपुरावा केल्यानेच कर्नाटक सरकारने या पुतळ्याच्या उभारणीसाठी सुमारे चार लाख ब्रिटिश पौंडांचे म्हणजे तीन कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले होते. 14 नोव्हेंबर 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे अनावरण झाले होते. आज हे सर्व आठवण्याचे कारण असे की, यंदा 7 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी होत आहे!

इसवी सन 1134 मध्ये  तत्कालीन म्हैसूर संस्थानातल्या विजापूरजवळच्या बागेवाडी तालुक्यातल्या कम्मेकूळ या गावी बसवेश्वर जन्मले. त्यावेळी कलचुरी राजघराण्यातल्या बिज्जल (द्वितीय) या राजाचा त्या प्रदेशावर अंमल होता आणि पाच विद्वान आचार्यांनी चौथ्या शतकात स्थापन केलेला वीरशैव लिंगायत पंथाचा समाजात प्रभाव होता. बसवेश्वर हे त्याच पंथाचे अनुकरण करीत असताना त्यांनी वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, स्त्राr-पुरुष भेदाभेद, होमहवन यांसारखी कर्मकांडं आणि अंधश्रद्धेवर आधारित घातक चालीरीती यांचे समूळ उच्चाटन करण्याचा चंग बांधला. ते स्वतः कवी असल्याने त्यांनी ‘शत स्थल वचन’, ‘काल ज्ञान वचन’, ‘मंत्र गौप्य घटचक्र आणि राज योग वचन’ असे काही पद्यमय ग्रंथ लिहून समाजाला एक नवा विचार दिला. आठशे वर्षांपूर्वी समाजमनावर वेद-शास्त्र-पुराणोक्त प्रथा आणि परंपरा यांचा पगडा घट्ट असताना बसवेश्वरांनी ‘अनुभव मंडप’च्या (हॉल ऑफ स्पिरिच्युअल एक्सपिअरिअन्स)  माध्यमातून चर्चासत्रे घडवून आणली. अशा रीतीने त्यांनी समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य केले. वर्णरहित, जातीरहित, कर्मकांडरहित समाज घडवून आणण्यासाठी त्यांनी वीरशैव लिंगायत पंथाची एक प्रकारे पुनर्मांडणी केली.

त्यांच्या अनुभव मंडपात नियमितपणे येत असलेल्या शीलवंत नावाच्या एका चर्मकार युवकाचे आणि कलावती नावाच्या ब्रह्मकुलोत्पन्न युवतीचे एकमेकांवर प्रेम बसले आणि ते लग्न करून मोकळे झाले. त्या आंतरजातीय विवाहाला आक्षेप घेत युवतीच्या वडिलांनी बिज्जल राजदरबारी फिर्याद केली. राजाने तो विवाह धर्मसंमत नसल्याचा निवाडा देऊन त्या गुह्याची शिक्षा म्हणून त्या नवविवाहित पतीपत्नीला हत्तीच्या पायदळी तुडविले. ते समजताच बसवेश्वर हे स्वतः त्याच राजाचे प्रधान असूनही राजाच्या विरोधात उभे ठाकले. राजाचे सैनिक आणि बसवेश्वरांचे अनुयायी एकमेकांवर तुटून पडले. त्यातच बिज्जल राजा ठार झाला. पुढे बसवेश्वर ज्या पंथाचे प्रवर्तक होते त्या वीरशैव लिंगायत पंथाची तत्त्वे हजारो लोकांनी स्वीकारली, अंगिकारली.

आज कर्नाटक राज्यात अशा लोकांची संख्या सर्वाधिक म्हणजे साडेतीन कोटी किंवा त्याहून अधिक आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातही त्यांची संख्या बऱ्यापैकी मोठी आहे. ‘शिवलिंग’ हे त्यांचे एकमेव आराध्य दैवत आहे. हिंदुस्थानचे माजी उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती, जे अगदी अत्यल्प काळासाठी काळजीवाहू राष्ट्रपतीदेखील झाले होते, ते याच लिंगायत पंथाचे होते. विख्यात गायक मल्लिकार्जुन मन्सूर आणि कुमार गंधर्व, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील, नेत्रतज्ञ पद्मभूषण डॉ. एम.सी. मोदी, माजी कुलपती आणि पंजाबचे भूतपूर्व राज्यपाल डॉ. डी. सी. पावटे, माजी खासदार रत्नाप्पा कुंभार, दाक्षिणात्य अभिनेत्री बी. सरोजादेवी, कर्नाटकचे आजवरचे अनेक मुख्यमंत्री आणि न्यायमूर्ती हे सगळे महात्मा बसवेश्वर यांच्या पंथाचे होते. बसवेश्वर ज्या ठिकाणी अनंतात विलीन झाले त्या बिदरजवळच्या कुडल – संगम येथे त्यांचे समाधीस्थान आहे. महात्मा बसवेश्वर यांचा एकशे आठ फूट उंचीचा आसनस्थ पुतळा त्या ठिकाणी स्थापित केला आहे. दिल्लीमध्ये संसद भवनाच्या आवारात 2002 साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यात आला होता तर काही वर्षांनंतर रिझर्व्ह बँकेने बसवेश्वर यांची प्रतिमा असलेले पाच रुपयांचे नाणे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते चलनात आणले होते.

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांची कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध व्हायला हवे. ही काळाची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या