
>> प्रा. सचिन बादल जाधव
आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये शिक्षकाला जी प्रतिष्ठा, मानसन्मान होता तो आता कुठेतरी हरवत आहे. चारित्र्यसंपन्न, शीलवान, विद्यार्थीप्रिय शिक्षक आजही दुर्मिळ प्रमाणात पाहण्यास मिळतात, मात्र पूर्वीइतका सन्मान शिक्षकांना आज मिळत नाही हे वास्तव आहे याचे भान शिक्षकाने स्वतः ठेवत स्वतःच आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. बऱयाच वेळा असे होते, शिक्षकांमध्ये हजारातील एकाकडून एखादी चूक घडली की सर्व शिक्षकांकडे त्याच नजरेने पाहणे चुकीचे आहे. शिक्षक म्हणजेच शि – शीलवान, क्ष – क्षमाशील, क – कर्तृत्ववान ज्यामध्ये हे सर्व गुण असतात, तोच खरा आदर्श शिक्षक होय.
शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक व सल्लागार असतो. त्यामुळे शिक्षक हा चारित्र्यसंपन्न, शीलवान व आदर्शाचे पालन करणारा असावा अशी रास्त अपेक्षा असते. शिक्षक जसा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा असतो, तसाच तो समाजाला मार्गदर्शक करणारा एक सामाजिक अभियंतादेखील असतो. या पार्श्वभूमीवर शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व आदर्श असायला हवे, परंतु दुर्दैवाने आज शिक्षक आपले व्यक्तिमत्त्व गमावून बसत असल्याचे दृश्य पाहण्यास मिळत आहे.
शिक्षणव्यवस्थेत शिक्षकाची भूमिका बघता शिक्षकाच्या अंगी कोणते आदर्श गुण असावेत, हा प्रश्न याअनुषंगाने महत्त्वाचा आहे. शिक्षणप्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असून त्यांचा एकमेकांवर सतत परिणाम होत असतो. सध्याच्या युगात शिक्षकांवरील जबाबदारी फार मोठी आहे.
डॉ. आंबेडकर शिक्षणासंबंधित बोलताना म्हणाले होते की, शिक्षक हा विद्यार्थीनिष्ठ असावा. विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा. ज्ञान समाजनिष्ठ असावे आणि समाज समतानिष्ठ असावा. शिक्षक जर विद्यार्थीनिष्ठ असेल तर कळय़ांचे फुलांत रूपांतर करू शकतो. पाठय़पुस्तकांबरोबर बाहेरील जगाचे पुस्तकही शिकवतो. चांगला विद्यार्थीनिष्ठ शिक्षक हा सहवासातून, संवादातून, आचरणातून, चारित्र्यातून मनाची श्रीमंती असलेला कर्तबगार विद्यार्थी घडवू शकतो.
शिक्षक इतर बाबतीत विद्वान असो वा नसो, आपल्याला जे शिकवायचे आहे त्या विषयात तो विद्वान असलाच पाहिजे. आपल्या विषयाच्या अनुषंगाने नवनवीन ज्ञान मिळवून, विभिन्न शैक्षणिक साहित्याचा अवलंब करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवले आणि आपली तासिका प्रसन्न चित्ताने शिकविण्यासाठी खर्च करील त्यांचे विद्यार्थी नक्कीच ऐकतात. या उमलत्या कळय़ामधील आंतरिक शक्तींचा सुगंध शिक्षकांनी दरवळून टाकला पाहिजे.




























































