लेख – वाचनवृत्ती

>> दिलीप जोशी  

माणसांच्या जगातलं, अगदी आदिमानवापासूनचं संपर्काचं साधन म्हणजे भाषा. पृथ्वीवरच्या मानवसमूहांमध्ये हजारो भाषा स्थल-काल परिस्थितीप्रमाणे विकसित झाल्या. बोलण्यातून, संवादातून माणसं एकमेकांना समजू लागली, परंतु पहिली हजारो वर्षे बोलणं हे एकच परस्परांना जाणण्याचं महत्त्वाचं साधन होतं. आपली भाषा कळत नसलेल्याशी हावभावांतून ‘शब्देवीण संवाद’ व्हायचा. कधी आसपासच्या गोष्टींची जमतील तशी चित्रं रेखाटून आपलं म्हणणं पोहोचवण्याचा प्रयत्न केला जायचा, परंतु आपला संदेश ध्वनीशिवाय कसा सांगावा हे एकेका भाषेची लिपी तयार झाल्यावर सोपं झालं.

लेखन हा माणसाच्या बौद्धिक उत्क्रांतीमधला महत्त्वाचा शोध म्हणायला हवा. आवाजाचं विशिष्ट पद्धतीचं नोटेशन किंवा आरेखन करून त्याला उच्चाराची जोड देत ते समूहाला समजेल अशा पद्धतीने रूजवल्यावर लेखनाला गती आली. विशिष्ट पद्धतीच्या आकारातून आपल्या भाषेचे उच्चार कळू लागल्यावर दूरस्थ माणसाला काय सांगयचं ते एखाद्या पत्रातून समजून घेता येऊ लागलं. त्यानंतरच्या काळात म्हणजे तुलनेने काही ‘शे’ वर्षांपूर्वी छपाईचं तंत्र आलं आणि आपलं म्हणणं आपल्या भाषेत पिंवा आपल्याला लिहिता येणाऱया कोणत्याही भाषेत व्यक्त करणं सोपं होत गेलं. तरीसुद्धा जगात ‘साक्षरते’चं प्रमाण अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत केवळ बारा टक्के होतं. आता ते 65 टक्क्यांपर्यंत गेलं आहे.

त्यामुळे पूर्वी एखाद्याला ‘लिहिता-वाचता’ येत असेल तर ज्ञानी समजलं जायचं. वास्तविक अनेक प्रकारचं ज्ञान असलेल्यांना केवळ लिहिता-वाचता येत नाही म्हणून अज्ञानी ठरवणं चुकीचं होतं, पण तसं घडलं खरं. वाचता येण्याआधी लिहिता यावं लागतं आणि त्यासाठी अक्षरओळख लागते. सर्व समाजाला ती जास्तीत जास्त होते तिथे पत्र, वृत्तपत्र आणि पुस्तक, ग्रंथ यांचं प्रमाण वाढत जातं. मौखिक कथा-काव्य परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्याचा काळ फारच मोठा आहे, परंतु त्यात नेमकेपणा न राहण्याची शक्यता असतेच. लिखाणामुळे अभिव्यक्ती जशीच्या तशी पोहोचवता येते. त्यामुळे अगदी आमच्या आजीला ठाऊक असलेली पारंपरिक गाणी आज कुठे ‘लिहिलेली’ सापडत नाहीत. काव्यप्रतिभा असणाऱ्या ज्या निरक्षर व्यक्तींना त्यांच्या काळात लेखनिक लाभले त्यांचे दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध आहेतच.

लिहिण्याची कला सुमेरियन, इजिप्शियन की आपल्याकडच्या ‘सिंधू’ संस्कृतीत सुरू झाली यावर मतमतांतरे असू शकतात. सिंधू संस्कृतीतली लिपी अजूनही उलगडलेली नाही. त्यामुळे काही भाषा जशा काळाच्या ओघात लुप्त होतात तसं काही लिप्यांचं झालं असेल, परंतु तरीही गेल्या दीड-दोनशे वर्षांत लेखन-वाचनाने प्रचंड वेग घेतला. लक्षावधी पुस्तपं छापली गेली. माणसाच्या व्यवहारातल्या, कल्पनेतल्या आणि संशोधनातल्या विषयांचा ठेवा या पुस्तकांनी जतन करून ठेवला. बहुभाषिक व्यक्तींनी एका भाषेतील पुस्तकं दुसऱ्या भाषेत आणली. अनेक पुस्तकांच्या जगातील अनेक भाषांमध्ये भाषांतरं झाली. यातून विविध मानवसमूहांचे आणि व्यक्तींचे विचार जगापुढे आले. प्राचीन काळी आपल्याकडे नालंदा, तक्षशिला तर इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया येथे हजारो पुस्तकांची संग्रहालये होती. या लेखात मुंबईच्या सेंट्रल लायब्ररीचा 1864 मधला फोटो (टाऊन हॉल) आहे.

हिंदुस्थानात गेल्या 50-60 वर्षांत साक्षरतेचे प्रमाण प्रचंड वाढलं. सध्या ते 70 टक्के इतकं आहे. यात केरळचा क्रमांक पहिला तर आंध्रचा शेवटचा. साक्षरतेची ‘युनेस्को’ची व्याख्या म्हणजे इतरांशी संवाद साधून आपलं म्हणणं मांडता व वाचून जाणता येईल एवढं लेखन-वाचनाचं ज्ञान. केवळ ‘सही’पुरती अक्षरओळख नव्हे.

ध्वनीविना संवादाचं माध्यम ग्रंथांनी उपलब्ध करून दिलं आणि निवांत वेळी माणसं आवडती पुस्तकं वाचू लागली. गेल्या सवा वर्षात कोविडने सर्वच आर्थिक व्यवहारांवर गदा आणली. त्यात प्रकाशन व्यवसायही आला, परंतु आतापर्यंत छापल्या गेलेल्या पुस्तकांचा ग्रंथालयातील किंवा व्यक्तिगत संग्रह पुस्तक वाचनाचा आनंद देऊ शकतो. एकटेपणाच्या काळात तर पुस्तकं ‘मित्र’ ठरतात. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी दुर्धर आजारातील एकटेपणा खिडकीबाहेरचा वर्षभर बदलता निसर्ग पाहून घालवला आणि त्यातून पुढे ‘ऋतुचक्र’ हे अप्रतिम पुस्तक तयार झालं.

‘वाचाल तर वाचाल’ वगैरे सुभाषितं आपण ऐकतोच. त्याचवेळी ‘वाचनाला वेळच मिळत नाही’ अशी तक्रारही कानी येते. गेल्या 23 एप्रिलच्या युनेस्कोच्या जागतिक पुस्तकदिनी ‘गोष्ट सांगा’ (शेअर अ स्टोरी) असं बोधवाक्य होतं. गोष्ट म्हणजे म्हणणं. ते परस्परांपासून दूर असताना लिखाणातून वाचनातच ‘शेअर’ करता येणार. ई-पुस्तकंही त्यासाठी उपयुक्त. मात्र आपल्याकडे स्वतःचं छोटंसं ग्रंथालय नव्हे, पण किमान विविध विषयांवरच्या पुस्तकांचं कपाट तरी असावं असं अनेकांना वाटेल तेव्हा पुस्तकदिनाला अधिक महत्त्व येईल. आवडतं पुस्तक कुठेही, केव्हाही वाचता येतं. प्रवासात बरोबर नेता येतं. इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर काही पाहण्यासाठी कृत्रिम पॉवर लागते. पुस्तक नैसर्गिक उजेडात आपण वाचू शकतो. शिवाय वाचता वाचता मध्येच थबकून त्यातल्या आशयाचं मनन करू शकतो. त्यावर स्वतंत्र विचार करू शकतो. त्यामुळे ‘वाचन’ ही आपल्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारी गोष्ट. ही सांस्कृतिक समृद्धी पैशांत मोजता येत नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या