लेख – कोरोना लसीकरणाची आवश्यकता

>> इकबाल शेख

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्या क्षेत्रांना फारसे नुकसान सहन करावे लागले नाही अशा क्षेत्रांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तडाखा दिला आहे. अशात लस घेण्यासाठी नवनवीन निमित्त शोधणाऱ्या लोकांबद्दल काय म्हणावे? लस घेतल्यानंतर साधारण, ताप अंगदुखी ही लक्षणे जाणवतात. अर्थात ती सगळ्यांनाच जाणवतात असेही नाही, परंतु केवळ या कारणांमुळे लस घेणे टाळणाऱ्या लोकांना शहाणपण कधी येणार? आपल्याला या देशातून कोरोना विषाणूला घालवायचे असेल तर योग्य विचाराने वागून आपला सहभाग सिद्ध करणे गरजेचे आहे. त्यासाठी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे.गेल्या दीड वर्षात कोरोना विषाणूचे नवे प्रकार जगभरात आढळून आले आहेत. हिंदुस्थानातही सध्या नवीन कोरोना विषाणूचे म्युटेशन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांचे आकडेही वाढत असल्याचे दिसून येत आहे. हा संसर्ग आटोक्यात येण्यासाठी जगभरातील वैद्यकीय तज्ञ, संशोधक, विषाणू तज्ञ आणि अनेक औषध कंपन्या संशोधन करत आहेत. इतिहासातील हा अकल्पित अध्याय असेच या परिस्थितीला म्हणावे लागेल. हे सगळे नकारात्मक घडत असताना कोरोनावरील लसींच्या संशोधनामुळे मात्र 2021 या वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला आशेचा किरण दिसला आहे. या लसीकरण मोहिमेच्या मदतीने आपण या संकटावर हळूहळू मात करू.

सध्या फायझर, ऍस्ट्रेझन्का, कोवॅक्सिन, कोविशील्ड, स्पुटनिक, जॉन्सन ऍण्ड जॉन्सन अशा अनेक कोरोनो लसी आता उपलब्ध होत आहेत. ज्यांच्याद्वारे या विषाणूच्या संसर्गाला आळा बसेल ही आशा आता प्रत्येकाला वाटत आहे. हिंदुस्थानात 21 जानेवारीपासून कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या लसींना परवानगी देण्यात आली. सुरुवातीच्या काळात केवळ फ्रंटलाइन वर्कर्सना लस उपलब्ध करून देण्यात आली होती. यानंतरच्या टप्प्यात फेब्रुवारी महिन्यापासून 60 वर्षांवरील नागरिक आणि 45 वर्षांवरील नागरिक ज्यांना मधुमेह, हृदयरोग, यकृत, किडनी याचे आजार आहेत अशा व्यक्तींना लस देण्यात येत आहे.

लसीकरणाच्या या मोहिमेत मुस्लिम टक्का नक्कीच कमी आहे, असे माझे निरीक्षण सांगते. महाराष्ट्र राज्य आणि मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार हेच निरीक्षण नोंदवले जाते. मी स्वतः, माझी पत्नी, भाऊ आणि त्याची पत्नी आम्ही सगळ्यांनी 8 मार्च रोजी गोरेगावच्या नेस्को कंपाऊंडमधील लसीकरण केंद्रावर जाऊन लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर 20 एप्रिल रोजी वांद्रेमधील भाभा हॉस्पिटलमध्ये दुसरा डोस घेतला. ही दोन्ही केंद्रे मनपाद्वारे संचालित होत आहेत.

या दरम्यान मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आमच्या जनसमुदायात लस घेण्याबाबत आणखी प्रबोधन होण्याची आणि समाजाने सकारात्मक दृष्टिकोन दाखविण्याची गरज आहे. सगळे मुस्लिम डॉक्टर जसे डॉ. जलील परकार, डॉ. जाहीर काजी, डॉ. शाहिद (व्हायरॉलॉजिस्ट), वैज्ञानिक, नोकरदार आणि इतर बुद्धिजीवी वर्गातील लोक लस घेण्याबाबत आग्रही आहेत. परंतु तरीही सुशिक्षित मुस्लिम समुदायातील शिक्षक, पत्रकार, लेखक, वकील, काही डॉक्टर्स आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्तीदेखील लस घेण्याबाबत फारशा उत्सुक नाहीत. एका 45 वर्षीय एमडीएस डॉक्टरना मी लस घेतल्याबद्दल विचारले असता त्याने न घेतल्याचे सांगितले. जे निश्चितच धक्कादायक होते. त्याने पुढे आपण लस का घेणार नसल्याचे सांगितले ते कारणही आश्चर्य वाटण्याजोगे होते. त्याच्या प्राध्यापकांनी लस घेतल्यानंतर तीनच दिवसात त्या प्राध्यापकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे साशंक होणे आपण समजू शकतो, परंतु लस घेतल्यामुळेच मृत्यू झाला याला  कोणते वैज्ञानिक कारण व वैज्ञानिक आधार असल्याचे मी त्यांना विचारले असता त्यांना स्वतःची चूक लक्षात आली. आपण लस जरूर घेऊ असे त्यांनी सांगितले.

मुळात अशा घटनांबाबत तुम्ही लोकांना जागरूक केले पाहिजे. तुमच्या योग्य मार्गदर्शनाची लोकांना गरज आहे, हे मी त्यांना पटवून दिले. लोकांच्या अशा नकारात्मक मानसिकतेमुळे या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग आणखी फैलावेल. कोरोनाच्या या भयंकर काळात अनेकांनी आपले नातलग, जीवलग गमावले आहेत. तेव्हा आपल्या एका छोटय़ाशा कृतीमुळे समाजात एखादी चांगली गोष्ट घडणार असेल तर त्यासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्या क्षेत्रांना फारसे नुकसान सहन करावे लागले नाही अशा क्षेत्रांना कोरोनाच्या दुसऱया लाटेने तडाखा दिला आहे. अशात लस न घेण्यासाठी नवनवीन निमित्त शोधणाऱया लोकांबद्दल काय म्हणावे? लस घेतल्यानंतर साधारण, ताप व अंगदुखी ही लक्षणे जाणवतात. अर्थात ती सगळ्यांनाच जाणवतात असेही नाही, परंतु केवळ या कारणांमुळे लस घेणे टाळणाऱया लोकांना शहाणपण कधी येणार?

मागच्या वर्षी झालेल्या कोरोना लाटेच्या संक्रमणासाठी तब्लिगी जमातीला दोषी धरण्यात आले होते. जे खरोखरच अनावश्यक होते. मात्र यावेळी आपल्याला या देशातून कोरोना विषाणूला घालवायचे असेल तर योग्य विचाराने वागून आपला सहभाग सिद्ध करणे गरजेचे आहे. त्यासाठी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

(लेखक मुंबईचे माजी सहायक पोलीस आयुक्त आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या