
<<< डॉ. गजानन रत्नपारखी >>>
आज जागतिक हृदयदिन, म्हणूनच सर्वांना विशेषत तरुणाईला त्यांचे हृदय सुरक्षित कसे ठेवावे यासाठी लिखाणाचा हा प्रपंच करत आहे. हृदयविकार, हृदयविकाराचा झटका, हार्ट अॅटॅक, बायपास सर्जरी, अॅन्जिओप्लास्टी शब्द सर्वांना चांगलेच परिचयाचे झाले आहेत. सर्वसामान्यांनासुद्धा या आजाराबद्दल काहीना काही माहिती असतेच आणि सहसा सर्वसामान्य माणूस या आजाराला घाबरूनच असतो, पुष्कळदा मृत्यूचे कारण हे हृदयविकाराचा झटका हेच असते आणि या आजाराचे प्रमाण वाढतच चालले आहे.
हिंदुस्थानात दरवर्षी लाखो लोक हृदयविकाराच्या आजाराने बळी पडतात. पूर्वी हा आजार वयस्कर व्यक्तींमध्येच आढळत होता, पण आता या आजाराची पाळेमुळे तरुण पिढीपर्यंत आढळतात. किंबहुना हिंदुस्थानात 15 ते 50 या वयोगटात हार्ट अॅटॅक येणाऱ्यांचे प्रमाण 40 टक्के आहे.
प्रत्येक देश औद्योगिक प्रगतीच्या मागे झपाट्याने लागलाय, यात युवकांचा मोठा सहभाग आहे, पण औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे युवकाचे आहार-विहार, आचार-विचार बदलले. सुखसुविधा मिळण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत आहे. यशाच्या मागे प्रत्येक जण धावतो आहे. प्रत्येकाला यश मिळेलच याची शक्यता नसते व ज्यांना मिळाले त्याने ते समाधानी आहेतच असेही नाही. त्यामुळे मानसिक तणाव वाढत आहे. टार्गेट पूर्ण करण्याची टांगती तलवार कॉर्पेरेट संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे वेळेपेक्षा अधिक काम करणे, कामाच्या मोबदल्यात मिळणारे वेतन हे नेहमीच कमी वाटते. ऑफिसमधील ‘बॉस’ हा नेहमीच त्रासदायक वाटतो. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे नेहमीच तणावात असतात. नोकरी, कामाच्या जागी तणाव, धंद्यामधील नफा-तोटा, घरातील कटकटी, ताण या सर्वांचा विपरीत परिणाम हृदयावर होऊन अतिरक्तदाब आणि हृदयविकार होण्याची संभावना असते.
आहारामध्ये तेल, तूप, मसाल्याचे पदार्थ, तळलेल्या पदार्थाची रेलचेल, पिझ्झा-बर्गर संस्कृती, अधिक कॅलरीजची शीतपेये, अल्कोहोल यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढले आहे. अति शिजलेले, अति तळलेले आणि मांसाहाराचा अतिरेक यामुळे कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत आहे. फळे, पालेभाज्या, कडधान्ये, सॅलाडचा वापर कमी झाला आहे. ‘टिनफूड’ पॅकबंद डब्यातील अन्न हे नेहमीचेच झाले आहे.
शहरीकरणामुळे लोकांचे राहणीमान उंचावले. वाहनांमुळे चालण्याचा व्यायाम कमी झाला, धकाधकीच्या आयुष्यामुळे व्यक्तीला व्यायामाला, मैदानात खेळायला वेळ मिळत नाही. शहरीकरणामुळे सुखसुविधा वाढल्यात, पण मानसिक स्वास्थ्य हरवले. या सिमेंटच्या जंगलात मानव भावनाशून्य, हृदयशून्य झाला. त्यामुळे एकटेपणा, डिप्रेशन, काळजी, भीतीसारख्या नकारात्मक गोष्टींचा जन्म होतो. या सर्वच बाबी हृदयाविकाराला आमंत्रण देतात.
एकत्र कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तीमध्ये हृदयविकाराचे प्रमाण कमी असते. कुटुंबीयांशी असलेली जवळीक आणि त्यातून मिळणारा मानसिक आधार या गोष्टींमुळे Catecholamine/Adrenline सारख्या (हानिकारक) हार्मोन्सचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
आजच्या पिढीमध्ये तंबाखू, धूम्रपानाचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. धूम्रपान हे आरोग्याला अपायकारक आहे. हे युवकांना माहीत असूनसुद्धा ‘कळते पण वळत नाही’ या उक्तीप्रमाणे आजचा युवक धूम्रपानाच्या अधीन झाला आहे. ब्राऊन शुगर, कोकेन, मनी, हेरोईन यांसारख्या नशिल्या पदार्थांमुळे पण युवकाच्या आरोग्यावर व हृदयावर विपरीत परिणाम होतो. युवकांमध्ये मद्यपानाचे प्रमाण खूप वाढले आहे. ‘Social Drinking या गोंडस नावाखाली सुरू झालेले मद्यपान Antisocial कधी होते हे युवकांना कळतच नाही.
काही प्रचलित गैरसमज Two pegs a day keeps Doctors away, Wine is fine for यांच्यामुळे युवक संभ्रमित अवस्थेत नकळत मद्यपानाच्या व्यसनाकडे वळतो. दारू, बीयरमुळे वजन वाढते, रक्तदाब वाढतो. हृदयाच्या स्नायूंवर परिणाम होऊन स्नायू कमजोर होतात. त्यामुळे हृदयाचे आकारमान वाढून पम्पिंग क्षमता कमी होते त्याला ‘डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ म्हणतात.
मी स्वतः तब्बल 25 हजार हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. मात्र ही वेळच येऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आपण हिंदुस्थानी उच्च संस्कृतीपासून भरकटून विकृतीकडे चाललो आहोत. योग विलासापासून भरकटून भोग विलासाकडे जातो आहोत. आपण आचार-विचार, आहार-विहार याबद्दल चोखंदळ असले पाहिजे. आधीच अतिप्रमाणात अनुवंशिक असलेल्या हृदयविकाराला या सर्व व्यसनांनी आणि इतर बाबींनी झपाटय़ाने वाढायला हातभार लागतो. म्हणून युवकांनो जागे व्हा…व्यसनांविरुद्ध एक व्हा…नेक व्हा… हृदयविकार टाळा!
(लेखक प्रतिथयश आंतरराष्ट्रीय कार्डिओलॉजिस्ट आहेत.)