पूर्वीच्या काळी देशातील अनेक गावखेडी ही एकमेकांपासून लांब होती. दळणवळणाच्या साधनांची कमतरता, आधुनिक जगापासून काहीसे तुटलेले नाते यामुळे या गावांच्या विकासाला प्रचंड वेळ लागत होता. मात्र गेल्या काही दशकांपासून परिस्थिती प्रचंड बदलत चालली आहे. अनेक दुर्गम भागांतील गावेदेखील देशाच्या मुख्य प्रवाहात सामील झाली आहेत आणि वेगाने प्रगतीदेखील करत आहेत. शिक्षण, संस्कृती, कला, विज्ञान अशा अनेक प्रांतांत ही गावे भरारी घेत आहेत. अनेक गुणवंत विद्यार्थी, उद्योजक, संशोधक, सैन्य अधिकारी देशासाठी घडवत आहेत. कच्छमधील माधापरसारख्या गावाने तर आशियातील सर्वात श्रीमंत गाव अशी स्वतःची ओळखदेखील प्रस्थापित केली आहे.
एखाद्या गावाची श्रीमंती कशावरून ओळखायची? त्या गावात असलेले भव्य बंगले, शाळा, महाविद्यालये, मोठी आणि प्रगत हॉस्पिटल्स, स्विमिंग पूल? तसे असेल तर असे भव्यदिव्य काही तुम्हाला माधापरमध्ये बघायला, अनुभवायला मिळणार नाही. हे गाव आशियातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखले जाते ते एका वेगळ्याच कारणाने. साधारण 32 हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावातील लोकांनी बँकेत ठेवीच्या स्वरूपात तब्बल 7 हजार करोड रुपये जमा ठेवलेले आहेत. अर्थात प्रति गावकरी साधारण 15 लाख रुपये अशी ही जमा रक्कम आहे. एका अहवालानुसार इथे देशातील मातब्बर अशा प्रत्येक बँकेची शाखा आढळून येते. या एका गावात विविध बँकांच्या 17 शाखा कार्यरत आहेत.
हा इतका पैसा या शेतीसारखा प्रमुख व्यवसाय असलेल्या गावाने कमावला कसा? असा प्रश्न अनेकांना पडतो, तर याचे श्रेय जाते या गावातून बाहेर पडून परदेशात स्थायिक झालेल्या इथल्या नागरिकांना. इथल्या जवळपास प्रत्येक घरातील एक तरी सदस्य हा परदेशात नोकरीधंद्यासाठी स्थायिक झाला असून तेथे मिळणारा पैसा तो गावाला बचतीसाठी पाठवत असतो. ही बचत गावाला दिवसेंदिवस अधिक समृद्ध करत चालली आहे.