गाथेच्या शोधात – भारतीय बौद्ध इतिहासाचे सुवर्णपान

>> विशाल फुटाणे

कलबुर्गीतील सन्नटी व कानगनहल्ली हा परिसर भारतीय पुरातत्त्व इतिहासाचा मौन साक्षीदार आहे. इथे सापडलेले सम्राट अशोकाचे जगातील एकमेव असे शिल्प, स्तूप, अनेक शिलालेख यामधून मौर्य, सातवाहन आणि बौद्ध परंपरेचे इथले प्राचीन अस्तित्व अधोरेखित करतात.

भीमा नदीच्या शांत काठी उभे असलेले सन्नटीचे चंद्रलंबा मंदिर आज देवी उपासनेचे एक प्रसिद्ध शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते, परंतु या मंदिराच्या दगडांमध्ये दडलेला इतिहास त्याहून कितीतरी प्राचीन आणि थरारक आहे. कलबुर्गी जिह्यातील या छोटय़ाशा गावात उभे असलेले मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर भारतीय पुरातत्त्व आणि इतिहासाचा एक मौन साक्षीदार आहे. चंद्रलंबा देवी ही स्थानिक लोकांसाठी ग्रामदैवत असली तरी तिच्या मंदिराभोवती पसरलेली जमीन मौर्य, सातवाहन आणि बौद्ध परंपरेचे ठसे जपून ठेवते. इतिहासातील काही क्षण असे असतात की, ते अचानक उलगडतात आणि आपण हजारो वर्षांमागे फेकले जातो. सन 1986 मधील कलबुर्गी जिह्यातील सन्नती या गावी चमत्कारिक घटना घडली. या एका अनपेक्षित घटनेने भारतीय इतिहासाचा एक नवा अध्याय उजेडात आणला.

कलबुर्गी जिह्यातील सन्नटी आणि शेजारचे कानगनहल्ली दोन अगदी साधी गावे. भारताच्या पुरातत्त्व नकाशावर त्यांचे नावही नव्हते. या गावात प्रसिद्ध असे चंद्रलंबा मंदिर, देवळात दैनंदिन पूजाअर्चा चालू असताना मंदिरातील एक जुना दगडी छत अचानक कोसळला. गावकऱयांना सुरुवातीला वाटले फक्त एक दगड पडला, पण मंदिरातील पुजाऱयांनी त्याची आतील बाजू पाहताच सगळ्यांचे डोळे विस्फारले. त्या छताच्या दगडावर वर काही अनोळखी अक्षरे लिहिली होती. ती अक्षरे कोणालाच वाचता येत नव्हती.

बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि प्रशासनाने पुरातत्व खात्याशी संपर्क साधल्यावर समजले की, ते अक्षर प्राचीन ब्राह्मी लिपीतील आहेत. ASI तातडीने धावून आली. मंदिराचा जीर्णोद्धार सुरू झाला. गर्भगृहाखालील दगड हलवता हलवता आणखी एक शिलालेख सापडला. अधिक माहिती घेता घेता अनेक ग्रामस्थांनी अशी अनेक दगडे आमच्या पंचक्रोशीत असल्याचे सांगितले. अनेक ग्रामस्थांच्या घरातील चुलीभोवतालचे दगड, शेतातील बांधकामात वापरलेले तुकडे, मंदिरातील चौथऱयांतील विटा सगळ्या दगडांमध्ये कुठे बौद्ध प्रतीके, ब्राह्मी लिपी, अशोकाचे कोरलेले शिल्प दिसू लागले.

जगभरातील इतिहासकार कित्येक वर्षे अशोकाच्या प्रत्यक्ष शिल्पप्रतिमा शोधत होते, पण इथे एका सामान्य गावातील तुकडय़ांमध्ये ते अक्षरश विखुरलेले होते. कानगनहल्लीतील जुन्या विहीरीपाशी पुरातत्व खात्याने खोदकाम सुरू केले असता इथे प्राचीन भारतातील सर्वात भव्य बौद्ध महास्तूपांपैकी एक स्तूप सापडला. शिलालेखांमध्ये ज्याचा उल्लेख ‘अधोलोक महाचैत्य’ असा येतो. तीच ती रचना इथे प्रत्यक्ष सापडली. यानंतर या परिसरात सुरू झाला शोधांचा सिलसिला. या स्तूपातून 60 घुमटांचे अवशेष, 72 ढोलपट्टय़ा, गौतम बुद्धाच्या 12 हून अधिक प्रतिमा, असंख्य बुद्धपदे, अयाका स्तंभ, यक्ष सिंह स्त्राr शिल्पे, जातककथांची अप्रतिम शिल्पमालिका, सातवाहन मौर्य काळातील दगडी कथा आणि सुमारे 250 ब्राह्मी शिलालेख. या परिसराला कुणी बौद्ध केंद्र मानलेही नव्हते, पण सन्नटी आणि कानगनहल्लीने सिद्ध केले की, भीमा व कृष्णा काठी संपूर्ण बौद्ध नगरी होती व 1986 मध्ये तिचा ‘पुनर्जन्म’ झाला. ती जगासमोर आली. यातील भारतीय इतिहाच्या दृष्टीने महत्त्वाची वस्तू सापडली म्हणजे सम्राट अशोकाचे जगातील एकमेव असे शिल्प. या शिल्पावर ब्राह्मीमध्ये स्पष्ट कोरलेले ‘राया असोको’. त्याच्या भोवती राण्या आणि सेविका आहेत. इतिहासातील बाकी सर्व अशोकाच्या प्रतिमा कल्पित आहेत, पण कानगनहल्लीतील ही आकृती भारतातील एकमेव प्रमाणित अशोक प्रतिमा मानली जाते. सन्नटीतील मुख्य शिलालेखाचा मजकूर आजही मोहवतो. बाराआळीत ब्राह्मी लिपीतील लेखन आहे. याची भाषा प्राकृत असून या अक्षरांवर आजही दिसणारा ठळक असा ‘इयं धम्म लिपि देवानं पियेन…’

या वाक्याने शिलालेखातील उल्लेख हा अशोकाचाच असल्याचे स्पष्ट होते. शिलालेखाची दुसरी बाजू जौगड (ओडिशा) येथील स्वतंत्र शिलालेखाशी जुळणारी आहे, पण तरीही काही फरक आहेत. इथे नेहमीची उपाधी ‘देवानंप्रिय पियदसी’ नाही. चौदाव्या ओळीत ‘महा-मंत्र’ असा वेगळा उल्लेख आणि मजकूर अधिक प्रादेशिक शैलीत आहे. यावरून समजते की, अशोकाचे शिलालेख सर्व प्रांतांमध्ये एकसारखे नव्हते. काही ठिकाणी त्याने संदेशांची स्वतंत्र आवृत्तीदेखील दिली.

आज सन्नटी आणि कानगनहल्ली भारतीय बौद्ध इतिहासाचे सुवर्णपान ठरत आहेत. इथे अशोककालीन सांस्कृतिक, धार्मिक आणि कला, परंपरेचे वैज्ञानिक पुरावे जिवंत आहेत. इथे मौर्य सातवाहन संवादाची साक्ष दगडांवर कोरलेली आहे.

दगडावर काहीतरी लिहिलेलं आहे म्हणून चंद्रलंबा मंदिराचे गर्भगृह बांधताना गावकऱयांनी हे दोन शिलालेख जतन करून ठेवले ही गोष्ट आज अतिशय मोलाची वाटते. आज चंद्रलंबा मंदिर हे दोन कालखंडांना जोडणारे सेतू ठरते. एकीकडे जिवंत लोकपरंपरा आणि भक्ती, तर दुसरीकडे भूमीखाली झोपलेला बौद्ध व मौर्यकालीन इतिहास. श्रद्धा आणि इतिहास यांचा असा विलक्षण संगम क्वचितच पाहायला मिळतो. म्हणूनच चंद्रलंबा मंदिर हे केवळ देवस्थान न राहता, सन्नटीच्या प्राचीन वारशाचे प्रवेशद्वार बनले आहे. जिथे प्रत्येक दगड काहीतरी सांगतो आणि प्रत्येक शांततेत इतिहासाचा एक खोल श्वास दडलेला आहे.

(लेखक इतिहास व पुरातत्व संशोधक आहेत.)

[email protected]